Uddhav Thackeray : अदानी (Adani) यांच्यावर होणाऱ्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे असं वक्तव्य शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलं. कोणत्याही घोटाळ्याची न्यायालय किंवा संयुक्त संसदीय समितीसमोर चौकशी होणे हे सर्वसामान्यांच्या आकलनाच्या बाहेरचे आहे. त्यांना निष्पक्षपाती चौकशी अपेक्षित असते असंही ठाकरे म्हणाले. लोकसत्ताच्या लोकसंवाद या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी  शिवसेनेतील बंड, ठाकरे गटाची भविष्यातील वाटचाल, विरोधकांची एकजूट, अदाणी प्रकरणासह सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रोखठोक मत व्यक्त केलं.


ज्यांना प्रश्न विचारले ते उत्तर का देत नाहीत


हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी उद्योग समूहाबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले. अशा वेळी या उद्योग समूहाच्या कारभाराबद्दल सर्वसामान्यांना प्रश्न पडले आहेत, त्यात मीसुद्धा असल्याचे उद्ध ठाकरे म्हणाले. ज्यांना प्रश्न विचारले आहेत ते उत्तर का देत नाहीत, असाच प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असल्याचे ठाकरे म्हणाले. उत्तर दुसऱ्याने किंवा अन्य कोणी तरी देण्यापेक्षा ज्याला प्रश्न विचारला आहे त्यानेच ते दिले पाहिजे. ज्यांना प्रश्न विचारले आहेत त्यांच्याकडे माहिती नसल्यास संबंधितांकडून माहिती घेऊन त्यांनी उत्तर द्यावे. प्रश्न विचारणारा एक, ज्याला विचारला तो दुसरा, उत्तर देणारा तिसरा आणि ऐकणारा चौथा हे सगळे संशयाचे धुके वाढवणारे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.  


फूलवाल्याची घासूनपुसून चौकशी होते मग अदानींचा तर लाखो कोटींचा मामला


देशाची आर्थिक बाजू भक्कम करायला उद्योगपती पाहिजेत. पण या उद्योगांमध्ये राबणाऱ्या कामगाराच्या घामाचा पैसा असतो. आपल्या पैशाचे काय होते समजण्याचा त्याला अधिकार आहे. एखाद्या उद्योगात भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) किंवा अन्य सरकारी उपक्रमाने पैसे गुंतविले असले आणि तो उद्योग बुडत असल्यास या उद्योगाचे भवितव्य काय, हे लोकांना समजण्याचा अधिकार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कोणत्याही घोटाळ्याची न्यायालय किंवा संयुक्त संसदीय समितीसमोर चौकशी होणे हे सर्वसामान्यांच्या आकलनाच्या बाहेरचे आहे. त्यांना निष्पक्षपाती चौकशी अपेक्षित असते. यामुळे अदानींवर होणाऱ्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. अगदी साधे उदाहरण म्हणजे आमच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या कन्येच्या विवाहाच्या वेळी फूलवाल्याची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. साध्या फूलवाल्याची घासूनपुसून चौकशी होत असेल तर अदानींचा लाखो कोटींचा मामला आहे, त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. 


 


महत्त्वाच्या बातम्या:


Rahul Gandhi-Uddhav Thackeray Meet : आतापर्यंत ठाकरे-गांधींच्या किती भेटी, मातोश्रीवर राहुल गांधी येणार, ठाकरेंना किती फायदा होणार?