Marathwada Rain Update : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असून, दुपारी ऊन आणि संध्याकाळी अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) गारपीट होत असल्याचे पाहायाला मिळत आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आज मराठवाड्यातील (Marathwada) लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेला अवकाळी पावसाने राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र कोकण आणि विदर्भातील अवकाळी पावसाचे वातावरण दोन दिवसांत निवळणार असल्याचा अंदाज असून, उर्वरित राज्यात मात्र येत्या 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव अशा एकूण 18 जिल्ह्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर या आठवड्यात उन्हाचा कडाकाही कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी एक आठवडा अवकाळी पावसाच्या संकटाची भीती कायम असणार आहे.
बीड जिल्ह्यात पुन्हा गारपीट...
बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सकाळी कडक ऊन, दुपारी ढग दाटून येत असून सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह तालुक्यातील कुठल्या ना कुठल्या भागात जोरदार पाऊस होऊन गारपीट होत आहे. तर शनिवारी देखील पुन्हा बीड जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाली आहे. तर शनिवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान अचानक झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे जिल्ह्यातील दौलावडगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये पिकांना मोठ्याप्रमाणावर फटका बसला आहे. तर पिंपळगाव घाट, देऊळगाव घाट, हरेवाडी, मराठवाडी येथील अनेक शेतकऱ्यांनी कांदा बियाण्यासाठी तयार केलेले गोट वाया गेल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सोबतच जनावरांसाठी खाद्य म्हणून तयार केलेले मका आणि कडवळ तसेच काही ठिकाणी डाळिंबाच्या बागांचे या गारपीटीमुळे मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहे.
बागायतदारांची चिंता वाढली...
सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी धावपळ करत रब्बीचे पीक काढून घेतले. मात्र सद्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बागायतदारांना बसताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे द्राक्ष बागांना मोठा फटका बसताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई मिळावी अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
Photo : बीडमधील अरणविहीरा येथे गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान