Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणी काही थांबत नाहीत. आधी गायरान जमीन प्रकरण, त्यानंतर कृषी महोत्सवाच्या नावाने पैसे गोळा केल्याचा आरोप. या आरोपांमुळं आधीच अडचणीत आसलेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, अब्दुल सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करत थेट सीबीआयकडे (CBI) दोन वेगवेगळ्या तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली (Mahesh Shankarpalli) यांच्यासह एकूण पाच जणांनी एकत्रित तक्रारी दाखल केल्या आहेत.


जमीनी बळकावल्याचा सत्तार यांच्यावर आरोप


कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. कारण त्यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. सत्तार यांच्याविरोधात जी तक्रार दाखल करण्यात आली यामध्ये तब्बल 1 हजार 400 पानांची तक्रार आहे. तक्रारीत एकूण 28 मुद्दे मांडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी 200 पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे. अब्दुल सत्तारांच्या विरोधात आजपर्यंत झालेल्या तक्रारींचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. सत्तार यांनी जमीन कशा बळकावल्या याचे पुरावे या तक्रारीत असल्याचा दावा देखील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी केला आहे.


गायरान जमीन आणि कृषी महोत्सव प्रकरणावरुन विरोधक आक्रमक


वाशिम जिल्ह्यातील (Washim District) एका गायरान जमिनीचं प्रकरण आणि कृषीप्रदर्शनासाठी पैसे गोळा करण्याच्या आरोपावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे चांगलेच अडचणीत आले आहेत. तर हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. वाशिम जिल्ह्यातील मौजे घोडबाभूळ येथील गायरानासाठी आरक्षित असलेल्या 37  एकर जमीन नियमित करण्याच्या आदेशावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सत्तार यांना नोटीस पाठवली आहे. तर सिल्लोड येथील कृषी महोत्सवासाठी राज्यभरातून 15  कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश सत्तार यांनी कृषीविभागातील अधिकाऱ्यांना दिल्याचा देखील आरोप झाला आहे. या सर्व प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताना पाहायला मिळाले. तर विरोधी पक्षाकडून सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली.   


महत्त्वाच्या बातम्या:


Abdul Sattar: गायरान जमीन अन् कृषीप्रदर्शन प्रकरण सत्तारांना भोवणार? कृषीमंत्री म्हणतात, मी सभागृहातच उत्तर देणार...