पंढरपूर : पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. पोलिओ लसीकरणादरम्यान पंढरपूर तालुक्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका बाळाच्या पोटात प्लास्टिक तुकडा उडून गेला आहे.


या प्रकरणी सुपरवायझरसह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या खुलाशानंतर त्यांच्यावर कारवाईचा निर्णय होणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रेपाळ यांनी सांगितले.


दोन दिवसापूर्वी भाळवणी येथे माधुरी बुरांडे यांच्या एक वर्षांच्या बाळाला लस देताना छोटासा प्लास्टिक टोपणाचा तुकडा थेट बाळाच्या पोटात गेला होता. यानंतर तातडीने बाळाला बालरोग तज्ज्ञाकडे नेऊन उपचार करण्यात आले होते . आता बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याचादावा डॉक्टरांनी केला असला तरी निष्काळजीपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी या बाळाच्या आईने केली आहे.


2 फेब्रुवारीपर्यंत चालणार पोलिओ लसीकरण मोहीम


31 जानेवारीपासून देशात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिनी 30 जानेवारीला राष्ट्रपती भवनात काही मुलांना पोलिओ थेंब देऊन या मोहिमेची सुरूवात केली. या मोहिमेअंतर्गत 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना पोलिओ थेंब देण्यात येणार असून ही मोहीम 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पोलिओ निर्मुलनाच्या पुढाकारानंतर 1995 मध्ये पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. पोलिओ लसीकरण मोहीम ज्या रविवारी सुरु झाली त्याला राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून ओळखले जाते.


संबंधित बातम्या :



पोलिओ लसीकरणादरम्यान 12 बालकांना सॅनिटायझर पाजलं, यवतमाळमधील घटना