नांदेड : महाराष्ट्र राज्यातील बांधकाम मंत्र्याच्या भोकर विधानसभा मतदारसंघातील चिदगिरी ग्रामपंचायतमध्ये वनविभागाच्या मनरेगा व सामाजिक वनीकरण यांच्या विविध कामात बोगस मजूर दाखवून चक्क शासनाला लाखों रुपयाचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. एवढेच नाही तर शासनाच्या मनरेगा योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या ह्या महाभागांनी चक्क मयत व शासकीय सेवेतील लोकांच्या नावेही लाखों रुपये उचलून गंडा घातल्याचे उघड झालंय. या प्रकरणी भोकर पोलिसात दोघा जणांविरोधात फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आलेत.
भोकर तालुक्यातील चिदगिरी येथे मनरेगा आणि वनविभागाच्या कामावर बोगस मजूर दाखवून शासनाच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. या बोगस मजूर दाखवणाऱ्या व कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या या महाभागांनी मजुरांच्या यादीत गावातील मयत व्यक्ती, शासकीय नोकरदार, डॉक्टर एवढेच नाही तर चक्क एका पोलीस उपनिरीक्षकांचे देखील नाव टाकून बिले उचलण्यात आली आहेत. अशा प्रकारे गावभरातील नागरिकांची नावे मनरेगा मजूरांच्या यादीत टाकून लाखो रुपये उचलल्याची बिले आता ग्रामस्थांच्या माथी मारण्यात आली आहेत. अनेक शासकीय नोकरदारांची, डॉक्टरांची,पोलीस अधिकाऱ्यांची नावे मनरेगा मजुरात टाकून बिले उचलण्यात आल्याचे तर अद्याप काही जणांना तर माहीत पण नाही.
आरोपी रमेश चव्हाण व मनोज चव्हाण यांनी गावातील नागरिकांना शासकीय योजना मिळवून देतो असे सांगून गावातील अनेकांची ओळखपत्र, अंगठ्याचे ठसे व कागदपत्र जमवले आणि शासकीय कामात भ्रष्टाचार केलाय. परंतु या नागरिकांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ अद्याप मिळालाच नाही.मात्र त्यानंतर त्याची नावे मनरेगा आणि वन विभागाच्या कामावर मजूर म्हणून नोंद करण्यात आली आहेत. तर यातील बालाजी इंगोले या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या खात्यात तब्बल वीस लाख रुपये मनरेगा अंतर्गत जमा करून उचलण्यात आल्याचा आरोप त्यांनी संबंधितांवर केलाय.
तर गावातील शिवराम पांचाळ या गृहस्थाच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांची नावे मनरेगा मजुरांच्या यादीत टाकून लाखों रुपयांची बिले उचलण्यात आली आहेत. शिवराम हे व्यवसायाने सुतार असून गेल्या अनेक वर्षांपासून आपला परंपरागत व्यवसाय मोठया नेटाने करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. सुतारकाम करणाऱ्या शिवराम यांच्या कुटुंबातील त्यांच्या वृद्ध आई, वडील ,पत्नी ,भाऊ अशा सर्वांच्या नावे मनरेगा मजूर दाखवून बिले उचलल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या प्रकरणात गावातील नागरिक बोगस मनरेगा मजूर दाखवून व त्यांची बँक खाते उघडून त्यावर आलेली रक्कम आरोपी उचलून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार भोकर पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय .या प्रकरणाचा पुराव्यानिशी भांडाफोड डॉ. मोहन चव्हाण व तंटामुक्ती अध्यक्ष प्रवीण चव्हाण यांनी केली आहे. याच प्रमाणे नांदेड जिल्ह्यातील मजूर हिंगोली जिल्ह्यातही दाखवून अशाच पद्धतीचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार त्याही जिल्ह्यात वन विभागात झाला असल्याचा आरोप डॉ. चव्हाण यांनी केलाय. सदर मनरेगा भ्रष्टाचार हा पाच पन्नास लाखाचा नसून 50 ते 60 कोटी रुपयांचा असून यात अनेक मोठे अधिकारी व बडे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधित बातम्या :