Maharashtra New Governor Ramesh Bais : भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या जागी रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात करण्यात आले आहे. ते लवकरच पदभार स्विकारणार आहेत. झारखंडचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांचा कार्यकाळही वादग्रस्त राहिला आहे. हेमंत सोरेन सरकारच्या दूरदृष्टी आणि निर्णयांवर सात ते आठ वेळा राज्यपाल रमेश बैस यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांची राजकीय कारकिर्द वादग्रस्त ठरली होती.  
 
हेमंत सोरेन आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी अनेकदा राज्यपालांवर टीकास्त्र सोडलेय. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नवीन जबाबदारी स्विकारताना रमेश बैस यांच्यापुढे मोठी आव्हाने असणार आहेत. राज्यपाल रमेश बैस यांच्यासाठी महाराष्ट्राची नवी जबाबदारी सोपी जाणार नाही. कारण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामुळे महाराष्ट्रातील विरोधाकांनी सत्ताधांऱ्यांना आधीच धारेवर धरले होते. 
 
रमेश बैस यांच्यापुढे कोणतं मोठं आव्हान असेल ?


उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना राज्यपाल नियुक्त 12 नावांची यादी राजभवनात पाठवण्यात आली होती. पण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारच्या काळात दिलेली यादी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजभवनाने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण नवीन राज्यपाल रमेश बैस यांना यावर निर्णय घ्यावा लागेल.  राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा निर्णय सर्वात आधी घेण्याचं आव्हान रमेश बैस यांच्यापुढे असणार आहे.


झारखंड सरकार आणि राज्यपाल रमेश बैस यांच्यातील वाद -


झारखंड सरकारसोबत राज्यपाल रमेश बैस यांचा गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. झारखंड विधानसभेने मंजूर केलेले 'झारखंड वित्त विधेयक-2022' दोन दिवसांपुर्वीच रमेश बैस यांनी राज्य सरकारकडे परत पाठवले. तिसऱ्यांदा त्यांनी हे विधेयक परत पाठवले आहे. यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष दिसून आला होता. झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहाता रमेश बैस यांनी अनेकदा सोरेन यांच्या निर्णायाला विरोध केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गेल्या वर्षी राज्यपाल बैस यांना न सांगताच त्यांचा प्रधान सचिव बदलण्यात आला होता. त्यामुळे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि बैस यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला होता. झारखंड राज्याच्या 22 व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस यांनी उपस्थिती दर्शवली नव्हती. या कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे होते. झारखंड राज्याच्या 22 वर्षाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं होतं. रमेश बैस आणि झारखंड सरकार असा वाद विकोपाला गेला होता, त्याचवेळी त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता ते महाराष्ट्रात कसं काम करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. 


महत्त्वाच्या बातम्या:


 Ramesh Bais: कोश्यारींना रिप्लेस करणारे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल रमेश बैस कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती


Bhagat Singh Koshyari : अखेर कोश्यारींची उचलबांगडी! 3 वर्ष, 5 महिने आणि 12 दिवसांचा प्रवास संपला