Nashik Priya Berde : प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे (Priya Berde) यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उपस्थितीत नाशिक येथे बेर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कोरोनाच्या काळात त्यांनी सिनेसृष्टीतील अनेक मंडळींना मदत केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचे कारण मात्र अद्यापही समोर आले नाही.
नाशिकमध्ये (Nashik) दोन दिवसीय भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीच्य समारोपप्रसंगी प्रिया बेर्डे यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबर इतरही सिनेसृष्टीतील कलाकार दिग्दर्शक निर्मात्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बेर्डे यांनी 2020 मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता अवघ्या दोन वर्षातच बेर्डे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे यांनी भाजपत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. प्रिया बेर्डे यांच्यासह गिरीश परदेशी, दिग्दर्शक मधुरा जोशी, विद्या पोकळे, मनिषा मुंडे, वेदांत महाजन, दत्तात्रय जाधव यांच्यासह आणखी काही दिग्गज कलाकारांनी आज भाजप पक्षात प्रवेश केल्याचे समजते.
नाशिकमध्ये भाजप कार्यकारणीच्या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी त्यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमातच प्रिया बेर्डे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. 2020 मध्ये प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित पुण्यात प्रिया बेर्डे यांचा पक्ष प्रवेश झाला होता. मात्र, अवघ्या दोनच वर्षांत प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. नाशिक येथे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी प्रिया बेर्डे यांचे स्वागत केले.
यावेळी प्रिया बेर्डे म्हणाल्या की, राष्ट्रवादीमध्ये राजीनामा देऊन मला चार महिने झालेले आहेत. कलाकारांसाठी काम करायचं होतं. त्यांच्यासाठीच काम करत राहणार आहे. आता भारतीय जनता पक्षामधले जे वरिष्ठ नेते आहे ते मला कुठली जबाबदारी देतात ते बघूया. पण आता प्रवेश केलेला आहे. फक्त कलाकारांसाठी आणि कलाकारांच्या प्रेमासाठी काम करणार आहे आणि जेव्हा काही गोष्टी कलाकारांच्या बाबतीत त्यांच्यासमोर मांडल्या. तेव्हा त्यांनी पूर्णपणे कलाकारांना, तंत्रज्ञांना आणि फक्त चित्रपट नाही तर नाट्यकलाकार, लोक कलावंत, तमाशा कलावंत जे पूर्णपणे उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे, त्यांच्यासाठी काम करण्याचा त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिलं आहे. त्यानुसार विचार करून हा निर्णय घेतल्याचे बेर्डे म्हणाल्या.
कोण आहेत प्रिया बेर्डे?
प्रिया बेर्डे या मराठी चित्रपट सृष्टी गाजवणारे सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आहेत. प्रिया बेर्डे यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’ असे एक सो एक हिट चित्रपट त्यांनी दिले. ‘बेटा’, ‘हम आपके है कौन’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. कोरोना काळात प्रिय बेर्डे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. प्रिया बेर्डे यांनी कोरोना काळात अनेक कलाकारांना मदतीचा हात दिला होता. कोरोना काळात सिनेसृष्टीतील कलाकारांना केलेल्या मदतीमुळे प्रिया बेर्डे त्यावेळी चर्चेतही आल्या होत्या. यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रवादीनंतर आता त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे.