Nana Patole On bhagat singh Koshyari :  भाजपने भगतसिंह कोश्यारींकडून महाराष्ट्राची बदनामी करुन घेतली आणि कोश्यारींनी संपूर्ण कार्यकाळात पक्षपातीपणा केला, अशी टीका कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी कोश्यारींवर केली आहे. ते पुण्यात बोलत होते.  राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर सगळ्या विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत त्यात नाना पटोले (nana patole) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 


ते म्हणाले की, भाजपने कोश्यारींकडून महाराष्ट्राची बदनामी करुन घेण्याचं काम केलं. बदनामी करण्याचं काम पूर्ण झालं असं भाजपला वाटलं असेल म्हणून भाजपने आता भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यांनी सर्व महापुरुषांच्या कामाचा आणि त्यांचा अपमान केला. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला. त्यात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी एवढ्या लहान वयात विवाह कसा केला, या वक्तव्याने त्यांनी केलेला सावित्रीमाईंचा अपमान मी आणि महाराष्ट्र कधीच विसरु शकणार नाही, असंही ते म्हणाले. 


भगतसिंह कोश्यारींसारखा पक्षपाती राज्यपाल भाजपने महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी महाराष्ट्राला दिला होता. एका सर्व्हेनुसार महाविकास आघाडीचे 38 खासदार आता महाराष्ट्रात निवडून येणार आहे.त्यात सगळ्यात मोठा वाटा राज्यपालांचा आहे. हे लक्षात आल्यावर भाजपने  आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुर्ची कायम राहिली पाहिजे यासाठी भाजपने केलेला हा प्रयत्न आहे. स्वत:ला महाशक्ती समजणारं नरेंद्र मोदींचं सरकार यांनी महापुरुषांना बदनाम करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा विरोध महाराष्ट्राच्या जनतेने केला त्याचप्रमाणे आता भाजपला खाली उतरवायचं असेल आणि महागाई कमी करायची असेल तर भाजपला सत्तेतून काढावं लागणार आहे, अशी भावना जनतेच्या मनात रुजवणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.


राजीनामा स्वीकारायला फार उशीर झाला- सुप्रिया सुळे


भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्यासाठी फार उशीर केला आहे. त्यांना कधीच या पदावरुन हटवण्यात यायला हवं होतं. राज्यपालांनी नेहमी महापुरुषांचा अपमान केला. त्यामुळे त्यांना या पदावरुन फार पूर्वीच हटवण्यात यायला हवं होतं. भाजप सरकारकडून अनेक दिवसांनी एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा रोष आणि विरोधीपक्षाने मांडलेली भूमिकेमुळे भाजपला राजीनामा मंजूर करावा लागला. कोश्यारींना आम्ही कायम मान दिला. राज्यपाल पदावर बसणाऱ्या माणसाने संविधानाच्या चौकटीत राहून काम करावं.मात्र त्यांनी त्या उलट केलं. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान सातत्याने केला. त्यामुळे भाजपच्या निर्णयाचं स्वागत आहे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.


महत्त्वाच्या बातम्या:


Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल