Maharashtra Government Cabinet Expansion : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाबाबत चर्चा रंगल्या आहेत. या नवनिर्वाचित मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे मंत्रिमंडळाचा लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार 19 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. या दिवशी भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. 


शिंदे मंत्रिमंडळाचा लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार 19 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटानं 20 मंत्रिपदांची मागणी केली आहे. पण त्यांना 15 मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला दोन्ही बाजूंचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. 


दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. एरव्ही आम्हाला मार्गदर्शन करणारे राज्यपाल आता कुठे गेले? असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला आहे. तसेच, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे गट फुटेल, असं म्हणत खैरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. 


मंत्रिमंडळ कार्यालयाप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नेमणुकांची प्रतिक्षा 


मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन बारा दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही मुख्यमंत्री कार्यालय सुरू झालेलं नाही. राज्यातील नागरिकांना त्यांच्या समस्यांवर दाद मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आशेचा किरण असतं. पण गेल्या 12 दिवसांपासून मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारीच उपस्थित नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे दाद मागायची असेल तर जायचं तरी कुठं असा सवाल उपस्थित होतोय. मंत्रिमंडळाच्या विस्ताराप्रमाणेच मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नेमणुकांचीही अजूनही प्रतीक्षा आहे.