Nashik YCM News : नाशिक (Nashik) मुक्त विद्यापीठाकडून (Open University) बीए च्या परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrpati Shiwaji Maharaj) राजनीतीला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा व मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्व स्पष्ट करा असे प्रश्न विचारण्यात आल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. नाशिक स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या बीए अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्ष परीक्षेत मनुस्मृती संदर्भातील आणि छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांच्या संबंधाविषयी प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नावर ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (AISF) या विद्यार्थी संघटनेने आक्षेप नोंदवत निवेदनासह अभ्यासक्रमाची होळी केली आहे.
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पदवी परीक्षेत (BA Exam) राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्र. 2(अ) व प्रश्न क्र.3 (ई) या प्रश्नांवर एआयएसएफने आक्षेप नोंदविला आहे. दरम्यान विद्यापीठाने या प्रश्नामधून संविधान विरोधी मनुस्मृतीचा उद्दातीकरण तसेच छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एआयएसएफने केला आहे. यासंदर्भात विद्यापिठाचे विद्यार्थी सेवा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांना निवेदन देत राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
एआयएसएफने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तसेच छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची भेटच झाली नसल्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 16 जुलै 2018 दिलेल्या निकालाचा दाखलाही या निवेदनातून देण्यात आला आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मनुस्मृती संदर्भात केलेले विवेचन घटनाविरोधी असल्याचे नमूद केले असल्याचे संघटनेचे राजाध्यक्ष विराज देवांग यांनी सांगितले. महाराष्ट्रात मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मनुस्मृती संदर्भात केलेले विवेचन घटनाविरोधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सातत्याने चुकीचा इतिहास सांगून बदनामी केली जात आहे. या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने संविधान विरोधी मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा असा प्रश्न पत्रिकेत उल्लेख करत विद्यापीठामार्फत मनुस्मृतीचे उदात्तीकरण करण्यात आले आहे, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी लिहिण्यात आलेल्या खोट्या इतिहासाला अभ्यासक्रमात स्थान देण्यात आले आहे, याचा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) महाराष्ट्र राज्य कौन्सिल तीव्र निषेध करते. संविधान विरोधी मनुस्मृती तसेच शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहिणारी अभ्यासक्रम समिती रद्द करावी, सदर अभ्यासक्रमातील इतिहास द्रोही तसेच घटनाविरोधी लिखाण तात्काळ मागे घेऊन, प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाने जाहीर माफी मागावी अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान या प्रश्नांवर विद्यापीठाचे मूल्यांकन विभागप्रमुख डॉ. सज्जन थुल म्हणाले की, प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्यास कोणता प्रश्न काढला ते माहीत नसते. त्यामुळे झालेल्या प्रकारात पेपर सेट करणाऱ्या प्राध्यापकांना विचारणा करून विद्यापीठ कारवाई करी, मूल्यांकन विभाग यापुढे अशी चूक होणार नाही, याची दक्षता घेईल, असे ते म्हणाले.