MIT SUNIL KARVE : अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीसाठी वांद्रे येथील एमईटीची निवड केली होती. उद्या (5 जुलै) होणाऱ्या अजित पवारांच्या बैठकीला एमआयटीमधून विरोध होत आहे. एमईटीचे ट्रस्टी सुनिल कर्वे यांनी अजित पवार यांच्या बैठकीला विरोध दर्शवला आहे. एमआयटीमध्ये राजकीय कार्यक्रम होऊ नयेत, अशी भूमिका सुनिल कर्वे यांनी घेतली आहे. 


बुधवारी एमईटीमध्ये होणाऱ्या अजित पवारांच्या बैठकीला एमईटीचे ट्रस्टी  सुनिल कर्वे यांनी विरोध केला आहे. धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहून एमईटीच्या जागेवर राजकीय बैठका होऊ नये म्हणून पत्र लिहलं आहे. अजित पवारांनी वांद्रे येथील एमईटीमध्ये एनसीपीच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक मंगळवारी सकाळी 11 वाजता बोलवली आहे.  या बैठकीच्या आधीच विरोध सुरु झाला आहे. 


एमईटीचे ट्रस्टी सुनिल कर्वे यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी त्यांनी एमईटीमध्ये होणाऱ्या अजित पवार यांच्या या बैठकीला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. शैक्षणिक ठिकाणी राजकीय बैठका नकोच. छगन भुजबळ यांनी येथे कायम अशा बैठका घेतल्या आहेत. एमईटीचा पाहिजे तसा वापर केला जातो, यामुळे जे नुकसान होतं त्याला कोण जबाबदार ? असा सवाल सुनिल कर्वे यांनी उपस्थित केला. 


छगन भुजबळ यांनी येथे 10 व्या माळ्यावर बंगला तयार केला आहे. फर्नीचर तयार केलेय. तेलगीच्या स्कॅमपासून सर्व तिथे चालले आहे. संस्थेत काम केलय, त्यांनी ही याला विरोध केला आहे, असे कर्वे म्हणाले. एमईटीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ही शैक्षणिक संस्था आहे, याचं पावित्र राखायला हवं. धर्मादाय आयुक्त हे थांबवू शकतात, असे कर्वे यांनी सांगितलं. मी जर त्या कर्मचा-यांसोबत बैठक घेतली तर त्यांच्यावर ते कारवाई करतील. विरोध करणा-या कर्मचा-यांविरोधात कारवाई करतील, असेही कर्वे म्हणाले. 


अजित पवार आणि शरद पवार यांनी 5 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. त्यामुळे अजित पवार की शरद पवार असा पेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे.. अजित पवार यांनी एमईटी वांद्रे येथे आमदार, खासदार, जिल्हाअध्यक्ष यांच्यासह सर्वच पदाधिकाराऱ्यांना बोलवले आहे. तर शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक बोलवली आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 


सुनिल कर्वेंशी संस्थेचा संबध नाही - एमईटी


सुनिल कर्वे आमच्या संस्थेत कोणत्याही अधिकृत पदावर नाही. तो व्यक्ती संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही आमच्या संस्थेची जागा ही खाजगी कार्यक्रमासाठी देतो असतो त्याचे रीतसर भाडे घेतले जाते. उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वीचारणा केली होती. त्यानुसार आम्ही त्यांच्याकडून रीतसर भाडे घेऊन परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेची देखील परवानगी आम्ही घेतली आहे अन्य देखील ज्या ज्या यंत्रणांची परवानगी आवश्यक असते त्याची परवानगी संस्थेने घेतली आहे..आमची संस्था ही महाराष्ट्रातील एक नामांकित संस्था आहे याला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (भुजबळ नॉलेज सिटी) यांनी सांगितले.