NCP chief Sharad Pawar : राज्यभरात पोस्टर लावताना शरद पवारांचा फोटो लावा, असे आदेश अजित दादांचे कार्यकर्त्यांना दिले होते. त्यावर आज शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी माझे फोटो लावू नयेत, अशी तंबी शरद पवारांनी दिली आहे.  त्याशिवाय अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या कोणतेही नेत्याचा फोटो फ्लेक्सवर वापरायचा नाही, असे आदेश शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.  


माझ्या विचारधारेशी गद्दारी करणाऱ्यांना माझे छायाचित्र वापरण्याचा अधिकार नाही, अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. अजित पवार यांनी काही आमदारांना हाताशी घेत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार आणि आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. शपथविधी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छांच्या होर्डिंगवर शरद पवार यांचे  फोटो लावण्याचे आदेश दिले होते.  आज शरद पवार यांनी आपल्या शैलीत अजित पवारांना खडसावले आहे. माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना फोटो वापरण्याचा अधिकार नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. 
 





अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांचे फोटो लावू नका - 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांचे फोटो प्लेक्सवर लावू नका, असा आदेश शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. पक्षातून निघून गेलेल्या नेत्यांविरोधात मैदानात उतरून जोरदार लढाईची तयारी शरद पवार यांच्याकडून सुरु आहे. आता कोणतेही परिस्थितीमध्ये माघार न घेता आगामी निवडणुकांना अजित पवार गटाविरोधात सामोरे जायचं, असा निर्णय पवारांनी घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. आठ तारखेला नाशिकपासून सुरु होणाऱ्या दौऱ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे कार्यकर्त्यांना पवारांनी आदेश दिलेत.  


कार्यकर्त्यांचा विरोध -


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना होर्डिंगवर शरद पवार यांचे  फोटो लावण्याचे आदेश दिले..मात्र कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध केला आहे. शरद पवार यांना त्रास देणाऱ्या अजित पवार यांनी शरद पवारांचा फोटो पोस्टरवर लावू नये, त्यांना नैतिक अधिकार नाही, अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.


दरम्यान, अजित पवार यांनी आज नव्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे.