Sharad Pawar Or Ajit Pawar :   पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या गटासोबत राहायचं यावरुन चांगलीच गोची झाली आहे. पुणे हा पवार कुटुंबीयांचे होम ग्राऊंड असल्याने या पदाधिकाऱ्यांचा (Sharad Pawar) शरद पवार, अजित पवार  (Ajit Pawar )आणि सुप्रिया सुळेंसोबत (Supriya Sule) थेट संपर्क आहे. त्यामुळे निर्णय घेण्यास अवघड जात असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 


राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्याध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांच्या बैठकीला पुणे जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यातील तालुकाध्यक्ष उपस्थित नव्हते आणि जेवढे होते त्यांच्यामधे देखील एकवाक्यता होऊ शकली नाही. एकीकडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पाठिशी उभा राहण्याचा  एकमुखी निर्णय घेण्यात आल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमधील चलबिचल उठून दिसणारी आहे.


प्रदीप गारटकर काय म्हणाले?


जिल्हा राष्ट्रवादी म्हणून आम्ही एकत्र आहोत. 4 ते 5 तालुका अध्यक्षांशी उपस्थितीत नाहीत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. राज्यात अनपेक्षित घटना घडल्या आहेत. जिल्यातील इतर तालुक्यातील अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून रात्री निर्णय घेऊ. शरद पवार श्रीकृष्ण यांच्या रूपात आहेत आणि अजित दादा अर्जुनाच्या रूपात आहेत आमचा मात्र अभिमन्यू झाला आहे. आम्ही शरद पवार यांच्या गटात की अजित पवारांच्या गटात या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. काही आमदार आणि खासदार यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याची भूमिका ठरवू. उद्या पुणे जिल्ह्यातील लोकं अजित दादा यांच्या बैठकीला जातील तर काही लोकं शरद पवार यांच्या बैठकीला जातील. त्यांच्याशी संविस्तर चर्चा करुन पुढचा निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्याध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितलं आहे.
 


दिलीप मोहिते पाटील संभ्रमात



शपथविधीचे साक्षीदार आमदार दिलीप मोहिते उद्या शरद पवारांच्या की अजित पवारांच्या बैठकीला हजर राहणार, हे अद्याप ठरलं नाही. मात्र त्यांना शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटातून फोन येत आहेत. मात्र आज रात्री ते जनतेशी संवाद साधूनच ठरवणार, असं दिलीप मोहिते पाटलांनी सांगितलं आहे. मी कोणाच्या दबावाला बळी पडणार नसल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


पुणे शहराध्यक्ष शरद पवारांसोबत...


पुणे शहर राष्ट्रवादीने शरद पवारांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय बैठकीनंतर घेतला आहे.  त्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.