Nashik Civil Hospital : सलग तीन वेळा दर्जेदार रुग्णसेवेच्या बळावर कायाकल्प पुरस्कार मिळवणारे, नाशिकची (Nashik) मान देशभरात उंचावणारे नाशिकचे सिव्हिल हॉस्पिटल (Civil Hospital) मात्र स्वतः व्हेंटिलेटर असल्याचे चित्र आहे. आजही रुग्णालय आवारात एक चक्कर मारली तर परिसर कचराकुंडी असल्याचे दिसून येईल. एकीकडे चांगल्या रुग्णसेवेसाठी पन्नास लाखांचे बक्षीस मिळवणारे सिव्हिल हॉस्पिटल मात्र स्वच्छतेच्या बाबतीत सपशेल नापास झाले आहे.
आपल्या घराच्या आजूबाजूला जर स्वच्छता असली तर आपले कुटुंब निरोगी असते. त्यामुळे घरातील व्यक्ती नेहमीच परिसर स्वच्छ (Clean) ठेवण्याला प्राधान्य देत असतात. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यासह इतर अनेक भागातून डॉक्टरांच्या विश्वासावर रुग्ण नाशिक जिल्हा रुग्णालयात येत असतात. मात्र इथल्या भोंगळ आणि अनागोंदी कारभारामुळे हे रुग्णालय नेहमी चर्चेत आहे. रोज हजारो रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. मात्र येथील परिसरच आजारी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णाला बरे वाटण्यापेक्षा रुग्ण अधिकच खालावतो, अशीच काहीशी परिस्थिती सिव्हिल हॉस्पिटलची झाल्याचे दिसून येते.
सद्यस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून परिसराला ऑक्सिजनची (Oxyejn) गरज असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी कचरा, बायोमेडिकल वेस्ट, उघड्या गटारीचे चेंबर, जाळलेला कचरा अशी स्थिती हॉस्पिटल आवारात आहे. यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत हॉस्पिटलच व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उपचार घेण्यास येणाऱ्या रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे वास्तव आहे.
सामान्य नागरिकांचा रोष... पण
नाशिक जिल्ह्यातील हजारो गोर गरीब, कष्टकरी लोकांना आरोग्य सेवा देण्याचे काम जिल्हा रुग्णालय करत असते. मात्र अलीकडच्या वर्षांत जिल्हा रुग्णालय नागरिकांच्या डोक्यात बसले आहे. येथील कर्मचाऱ्यांची अरेरावी, प्रशासनाचा भोंगळ कारभार, डॉक्टरांची अनास्था या सर्वांमुळे दाखल रुग्ण वैतागले आहेत. विशेष म्हणजे डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या आधारामुळे रुग्णाला हायसे वाटते, क्रित्येकदा फरकही पडतो. मात्र येथील वातावरण दूषित झाल्यामुळे कमी आजारपण असलेला रुग्ण देखील मरणावस्थेत जात असल्याचे चित्र आहे. एकीकडे कोटींचा पुरस्कार घेणारे जिल्हा रुग्णालय मात्र आपल्या अनागोंदी भोंगळ कारभारामुळे जनसामांन्यांच्या नजरेतून उतरत चालल्याचे चित्र आहे.