Uddhav Thackeray On Pune By Election: पुणे पोटनिवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे.  कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि चिंचवडमधून भाजपच्या अश्विनी जगताप यांनी विजयाचा झेंडा फडकवला आहे. दरम्यान यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. तर यावरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. मतदार वेगळा विचार करू शकतात हे समोर आले असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तर वापरा आणि फेका ही भाजपची नीती भाजपला भोवली असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच पोटनिवणुक जिंकले याचा आनंद आहे. तसेच जर कसबा इतक्या वर्षानंतर बाहेर पडू शकतो, तर देश देखील बाहेर पडू शकतो, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. 


भाजपवर टीका! 


दरम्यान याचवेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर देखील टीका केली आहे. येणाऱ्या काळात देखील महविकास आघाडी सोबत बघायला मिळेल. भाजपच्या विरोधात मतदान करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे.  भाजपला जोपर्यंत गरज होती तोपर्यंत त्यांनी वापर केला. तर याच भाजपने टिळकांचा देखील वापर केला आणि आता सोडून दिले. गिरीश बापट यांचा फोटो पाहिला असता त्यांना ऑक्सिजनच्या नळ्या लावून आणले होते. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे देखील असेल केले, त्यांच्या मुलाला संधी दिली नव्हती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 


VIDEO : Uddhav Thackeray : भाजपने टिळकांच्या घराण्याचा वापर केला आणि बाजूला सारलं, ABP Majha



निवडणूक आयोगाबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल दिलासादायक : उद्धव ठाकरे


तर सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल दिलासादायक आहे, निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक प्रक्रिया बदलली पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर बेबंदशाही रोखण्याची गरज आहे, त्या दृष्टीने विचार केला तर आजचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं देखील ठाकरे म्हणाले. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणूक आयोगावर आता किती विश्वास ठेवायचा हे ठरवावे लागेल. सर्वोच्च न्यायालयात जी केस सुरू आहे, त्यावर देखील याचे परिणाम उमटतील. तर निवडणूक आयोगावर दबाव असेल तर बघावे लागेल, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. 


संजय राऊत यांच्याविषयी उद्धव ठाकरे म्हणाले की...


विधीमंडळाला चोरमंडळ म्हणणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सत्ताधारी आक्रमक झाले असून हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहेत. याविषीय विचारलं उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी संजय राऊत यांना बोलावेन आणि विचारेन की त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं?" तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्गारलेल्या देशद्रोही या शब्दावरुनही उद्धव ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला. मुख्यमंत्री कोणाला देशद्रोही म्हणाले हे त्यांनी सांगावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


प्रकाश आंबेडकरांच्या भेटीवर प्रतिक्रिया! 


दरम्यान याचवेळी उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या बैठकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आमची युती झाली आहे, त्यामुळे अश्या भेटीगाठी होत राहणार. आम्ही हुडी वगैरे घालून भेटत नाही, दिवसा ढवळ्या भेटतो. तर प्रकाश आंबेडकर आलेले आहेत, आत बसले आहेत, तुमचे झाले की त्यांच्याशी माझी बैठक होईल. योग्य वेळ आली की, आम्ही सर्व जाहीर करू असे ठाकरे म्हणाले.