Kasaba By-Elections : तब्बल 28 वर्षांनी भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा मतदारसंघात (Kasaba Bypoll Election Result) काँग्रेसनं मुसंडी मारत विजय निश्चित केला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं (Congress) गुलाल उधळला आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aaghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला आहे. तसं पाहायला गेलं तर कसब्यात भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. दिग्गजांच्या प्रचारानंतरही हेमंत रासने यांचा कसबा पोटनिवडणुकीत पराभव झाला आहे. दरम्यान, कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून विजयी जल्लोष साजरा केला जात आहे. गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांकडून कसब्यात जल्लोष साजरा केला जात आहे.
भाजपच्या ताब्यात असलेले कसबा आणि चिंचवड मतदारसंघ आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झाले होते. त्यासाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली होती. तेव्हापासूनच पुणे पोटनिवडणूक चर्चेत होती. भाजपकडून पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र महाविकास आघाडी निवडणूक लढवण्यावर ठाम होती. तेव्हापासूनच पुणे पोटनिवडणूक चुरशीची होणार हे जवळपास निश्चितच होतं.
अख्खं मंत्रिमंडळ प्रचाराला, तरीही कसबा भाजपच्या हातून निसटलाच
चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पुण्यात हजेरी लावली होती. अख्खं मंत्रिमंडळ प्रचाराला आलं होतं. मात्र, त्याचा फारसा फायदा हेमंत रासनेंना झाल्याचं पोटनिवडणुकीत दिसलं नाही. तब्बल 28 वर्षांनी भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतला आहे.
कसब्यात प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपच (BJP) जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. या रोड शोनंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला होता. तर दुसरीकडे धंगेकरांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीनेही सर्व ताकद पणाला लावली होती. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी प्रचाराला हजेरी लावली होती. आदित्य ठाकरेंचा रोड शोदेखील झाला होता. दरम्यान, दोन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला होता.
कसब्यात कसा झाला प्रचार?
कसबा मतदारसंघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले होते. शेकडो नेते, कार्यकर्ते आणि कसबेकरांच्या उपस्थित भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोड शोनंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला होता. पुण्याचा विकास करणारा भाजप पक्ष आहे. त्यामुळे हेमंत रासने यांनाच मतदान करा, असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्यासोबतच महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीदेखील प्रचार रॅली आयोजित केली होती. त्यांनी देखील मीच जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धंगेकरांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले होते. आदित्य ठाकरेंचा रोड शो झाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसनं हिसकावला; कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय