नागपूर : बिहार हे देशातलं सगळ्यात गरीब राज्य आहे, पण आपला नंदुरबार जिल्हा हा बिहारहुनही गरीब ठरला आहे. एकंदरीत पाहिलं तर  महाराष्ट्रातील गरिबांचे प्रमाण हेच 14.9 टक्के आहे पण नंदुरबारमध्ये अर्ध्याहून अधिक लोक हे गरीब आहेत. चक्क 52.12 टक्के लोक हे गरीब असून महाराष्ट्रातला सर्वाधिक गरीब असणारा जिल्हा हा नंदुरबार ठरला आहे. गरिबीवरचा निती आयोगच्या अहवालातून हा  रिपोर्ट आला आहे. 


देश पातळीवर विचार केला तर बिहारमध्ये 52 % गरिबी आहे, तर नंदुरबारमध्ये 52.12 % गरीब आहे.  देशातील सगळ्यात कमी गरीब जिल्हे हे केरळमध्ये आहेत.  कोट्याममध्ये 0%, एरणाकुलम 0.1% तर कोळिकोड हे 0.26% गरिबी आहे एकंदरीत देशात 25.01% नागरिक गरीब असल्याचे आढळून आले आहे. तर महाराष्ट्र मध्ये 14.85% आहे. 


निती आयोगाने सध्याच्या दरडोई वापर आणि खर्चावर आधारित गरिबांच्या मापनाची पद्धत बदलली आहे.  यंदाचे हे आकडे नवीन निकषांवर आधारित असून यात आरोग्य शिक्षण,  पिण्याचे पाणी,  शाळा,  बँक खाते तसेच इतर राहणीमानाची संबंधित अशा बारा घटकांचा घटकांवर आधारित माहिती एकत्र करून मग त्याचं विश्लेषण करण्यात आले आहे. 


महाराष्ट्रातील सर्वाधिक गरीब असणारे जिल्हे 



  • नंदुरबार -  52.12 %

  •  धुळे -  33.23%

  • जालना - 29.41% 

  • हिंगोली - 28.05%

  •  नांदेड - 27.48%


महाराष्ट्रात असे देखील जिल्हे आहेत जिथे तुलनेत गरिबी खूपच कमी आहे.  राज्यातला सर्वात कमी गरीब असणारे शहर म्हणजे राजधानी मुंबई आहे.


सर्वात कमी गरीब असणारे जिल्हे



  •  मुंबई - 3.59%

  •  मुंबई उपनगर - 4.65%

  • पुणे - 5.29 % 

  • नागपूर - 6.72 %

  • भंडारा - 8.19 %


महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी  हे चित्र  अत्यंत दुर्दैवी आहे. विकासाचा असमतोल, जगण्यासाठी लागणाऱ्या सामान्य साधनसामग्रीचा अभाव, गरिबीमुळे लहान मुलांना सुद्धा सोसावे लागणारे हाल, शालेय शिक्षणावर त्याचा होणारा परिणाम, कुपोषण, स्थलांतर .. हे सगळे या गरिबीचे परिणाम आहेत. त्यामुळे ह्या रिपोर्टकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे, केंद्रासाठीच नव्हे तर राज्यासाठी सुद्धा हे गरजेचे आहे.