नवी दिल्ली :  हरिद्वार इथे झालेल्या धर्मसंसदेवरुन  (Dharma Sansad) सध्या चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. धर्मसंसदेत वक्त्यांनी केलेल्या भडकावू आणि चिथावणीखोर भाषणांवरुन विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'हिंदुत्ववादी नेहमीच द्वेष आणि हिंसा पसरवतात, त्याची किंमत मात्र, हिंदू-मुस्लिम-शिख-ईसाईंना मोजावी लागते. पण आता नाही'! असे ट्वीट करत राहुल गांधीनी हिंदुत्ववाद्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.
 
धर्मसंसदेमध्ये दिलेल्या भाषणांबाबत राहुल गांधी यांनी दोन हॅशटॅगसह ट्विट केले आहे.  काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस (TMC) सह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हरिद्वारमधील 'धर्म संसद' हे 'द्वेषपूर्ण भाषण संमेलन' म्हणून संबोधले आहे. तसेच त्याचा निषेधही केला आहे. या परिषदेत सहभागी असलेल्या वक्तव्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जितेंद्र नारायण त्यागी यांच्यासह  इतर अनेकांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. जितेंद्र नारायण त्यागी यांनी नुकतेच इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. जितेंद्र नारायण त्यागी यांच्यावर 'धर्म संसद'मध्ये कथित द्वेषपूर्ण भाषणे दिल्याचाही आरोप आहे. धर्मसंसदेतील हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जमियत उलेमा-ए-हिंदने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले आहे. जमियत उलेमा-ए-हिंदने आपल्या पत्रात म्हटले आहे की, या परिषदेत सहभागी असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे.


हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसदेवरुन एमआयएमचे खासदार असद्दुदीन ओवेसी यांनी देखील केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. धर्मसंसदेतील वक्त्यांनी मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराचं समर्थन करत भडकावू आणि चिथावणीखोर भाषणे दिली आहेत. याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या धर्ससंसदेत भाजप सरकार देखील सामील असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून, यामध्ये असणाऱ्या दोषींवर कारवाई होईल असे ओवेसी यावेळी म्हणाले. लोक उघडपणे हिंसेचे समर्थन करत असताना सरकार काहीच करत नसल्याचे देखील ओवेसी म्हणालेत. या धर्मसंसदेत केलेल्या भडकावू भाषणाविरोधात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे. या धर्मसंसदेत ज्यांनी ज्यांनी भडकावू आणि हिंसेचे समर्थन करणारी वक्तव्य केली आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिंसाचारासाठी प्रवृत्त करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे. 


उत्तराखंड हरिद्वारमध्ये 17 पासून 19 डिसेंबरपर्यंत धर्म संसदेचं (Dharma Sansad) आयोजन करण्यात आलं होतं. या धर्म संसदेत साधू-संतांनी हिंदुत्वासंदर्भात केलेल्या वादग्रस्त भाषणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या धर्म संसदेतील वक्त्यांनी कथितरित्या मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराचं समर्थन केलं आणि 'हिंदू राष्ट्रा'साठी संघर्ष पुकारण्याचं आवाहन केल्याचं सांगण्यात येतंय. माजी लष्करप्रमुख, कार्यकर्ते आदींनी या वादग्रस्त भाषणाचा तीव्र निषेध करत कारवाईची मागणी केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: