मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतणे समीर भुजबळ यांचे जप्त केलेले पासपोर्ट त्यांना तूर्तास परत करा, असे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं अंमलबजावणी संचलनायल (ईडी)ला दिले आहेत. इंग्लंडला जाण्यासाठीचा व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भुजबळांनी पासपोर्ट देण्याची मागणी कोर्टाकडे केली होती.


मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळ यांच्यासह पंकज व समीर भुजबळ यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. यात त्यांना पासपोर्ट तपासयंत्रणेकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. अटीला अनुसरून भुजबळ कुटुंबियांनी साल 2018 मध्येच त्यांचे पासपोर्ट ईडीकडे जमा केले होते. मागील पाच वर्षात न्यायालयानं घालून दिलेल्या कोणत्याही अटींचा आम्ही भंग केला नसल्यानं आता हे पासपोर्ट परत करण्याचे आदेश ईडीला देण्यात यावेत, अशी विनंती करणारा अर्ज भुजबळ कुटुंबियांकडून कोर्टाकडे करण्यात आला होता. त्या अर्जावर सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. ज्यात भुजबळ कुटुंबिय पासपोर्ट मिळाल्यानंतर फरार होण्याचा दावा करत भुजबळांच्या अर्जाला ईडीने जोरदार विरोध केला होता.


मात्र ईडीचा दावा न्यायालयानं फेटाळून  लावला. भुजबळ कुटुंबियांना जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या होत्या. त्या अटीला अनुसरून भुजबळ कुटुंबियांनी 2018 मध्ये त्यांचे पासपोर्ट ईडीकडे जमा केले होते. त्यानंतरही त्यांना परदेशात प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु त्या सवलतीचा त्यांनी कधीही गैरवापर केलेला नाही, असं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं ईडीला भुजबळ कुटुंबियांचे पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले आहेत. 


संबंधित बातम्या :


Pravin Darekar : एका सेकंदात राष्ट्रपती राजवट लावावी, भाजपची मागणी, तर छगन भुजबळ म्हणाले...


Chhagan Bhujbal : "भाजपचं असं आहे, मुँह में राम बगल में छुरी!" छगन भुजबळांचा भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा 


'गृहमंत्र्यांना 100 कोटी कोण देतं? मीही गृहमंत्री होतो', छगन भुजबळांकडून अनिल देशमुखांची पाठराखण