Maharashtra Mumbai Rains LIVE: मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत,  पालघरसह नाशिक आणि पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट

सद्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Jul 2022 10:26 PM
मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला

मुंबई महानगरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱया ७ तलावांपैकी तानसा तलाव आज (दिनांक १४ जुलै २०२२) रात्री ८.५० वाजता ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाला एकूण ३८ दरवाजे आहेत, त्यापैकी रात्री ९.५० पर्यंत ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

यवतमाळ - वणी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय दोन दिवस बंद

वणी तालुक्यात पावसाची सततधार सुरु असुन तालुक्यातील सर्व नदी-नोले-ओढे दुथडी भरुन वाहत आहे. वणी शहरातील शाळा व महाविदयालयात शिकणारे विद्यार्थी ग्रामीण भागातून ये-जा करत असल्याने अनुचीत प्रकार घडू नये म्हणून वणी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय ४८ तास बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.

वसईत दरड कोसळून झालेल्या अपघाताप्रकरणी चाळ माफियांवर गुन्हे दाखल, अद्याप कुणालाही अटक नाही

सईच्या राजीवली येथील वागराळपाडा प्रकरणात आता वाळीव पोलीस ठाण्यात जमिन मालक आणि चाळी बनवणा-या चाळ माफियांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून,  एम.आर.टी.पी.एक्ट अंतर्गत कारवाई ही करण्यात आली आहे.  काल  बुधवारी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून एकाच कुटुंबातील चार जण दबले गेले होते. त्यातील आई वंदना सिंग आणि ९ वर्षाचा मुलगा ओम सिंग यांना वाचवणयात आलं होतं.  तर वडील अमित सिंग आणि १४ वर्षाची मुलगी रोशनी अमित सिंग ही मयत झाली होती. चाळ माफियांनी येथे डोंगर खोदून, महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता चाळी वसवल्या होत्या. याबाबत एबीपी माझाने वेळोवेळी बातमीच्या द्वारे प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला होता. माञ प्रशासनाने यासाठी कोणतीही कारवाई केली नव्हती.  बुधवारच्या घटनेनंतर पालिकेने तेथील ३४ चाळी तोडल्या. तर पालिकेच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त निलम निजाई यांच्या तक्रारी वरुन, नवीन सर्वे नंबर १४६ हिस्सा नंबर १ चे जमिन मालक मेरी फेलिक्स ग्रासीअस तसेच मितवा रियालिटी तर्फे अजीत रायसाहब सिंह उर्फ मन्टु सिंग तसेच अनधिकृत बांधकाम करणारे शैलेंद्र निषाद, रतनेश पांडे, अनिलकुमार दुबे यांच्या विरोधात भा.दं.वि कलम ३०४, आणि एम.आर.टी.पी. ५२,५३,५४ अन्वये दोन गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. अजूनतरी पोलिसांनी कुणालाही अटक केली नाही. 

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग बंद, पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे निर्णय गुजरातकडे जाण्याचा बेत करू नये, प्रशासनाचा आवाहन

मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नवसारी आणि चिखली या ठिकाणी पुराचे पाणी आल्यामुळे संपूर्ण महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील गुजरात हद्दीवर गुजरात कडे जाणारे सर्व गाड्या थांबवण्यात येत आहेत. सध्या तरी गुजरात कडे जाण्याचा बेत कुणीही आखू नये अशा सूचना पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ यांनी दिल्या आहेत. 

नांदेड जिल्ह्यात गेल्या 48 तासात सरासरी 184 मि.मी. पाऊस,आता पर्यंत 575.40 मिलिमीटर पावसाची नोंद.

नांदेड जिल्ह्यात गेल्या 48 तासात सरासरी 184 मि.मी. पाऊस,आता पर्यंत 575.40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे 34 प्रकल्प तुडुंब,विष्णुपुरी प्रकल्पाचे 6 दरवाज्यातून 56997 क्यूसेक पाण्याचा विसर्ग ,तर पुराच्या पाण्यात वाहून दोन जणांचा मृत्यू झालाय. 


नांदेड जिल्ह्यात 13 व 14 जुलै  रोजी गेल्या 48  तासात सरासरी  184 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 575.40 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर ह्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील  34 प्रकल्प तुडुंब भरले असून विष्णुपुरी प्रकल्पाचे 6 दरवाज्यातून 56997 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान या अतिवृष्टीने हजारो हेक्टरा वरील पिके बाधित झाले असून पुराच्या पाण्यात वाहून जाऊन नांदेड व भोकर तालुक्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात गुरुवार 14 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गेल्या  24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे तर कंसात एकूण पाऊसाची तालुका निहाय नोंद आहे.


 नांदेड- 48.20 (576.50), बिलोली-88.60 (602.40), मुखेड- 45.30(525.60), कंधार-44.50 (591.70), लोहा-43.40 (549.30), हदगाव-74.60 (534), भोकर- 109 (661.10), देगलूर-39.10 (493.80), किनवट-48.90 (552.30), मुदखेड- 107.10 (746.60), हिमायतनगर-112 (780.20), माहूर- 57.50 (482.60), धर्माबाद- 62 (572.80), उमरी- 107.90 (700.90), अर्धापूर- 78.50 (568.50), नायगाव- 83.70 (535.40) मिलीमीटर आहे.

पालघर - सूर्या नदीवरील गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर पालघर जिल्ह्यातील या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेला पाहायला मिळते. जिल्ह्यातील मोठी पाणी क्षमता असलेलं  धामणी धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं असून या धरणाचे पाच ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास या दोन्ही धरणा मिळून सूर्य नदी पात्रात,,43873 कयुसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून मोठा पूर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना कडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास 125 घरांचं नुकसान झालं असून जिल्ह्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. तसेच आज हाईट हाईट असल्यामुळे समुद्र खवळलेला असून समुद्राला उधाण आलंय. त्यामुळे उंच लाटा उसळत असून त्या किनाऱ्यावर धडकत आहेत. त्यामुळे पश्चिम किनारपट्टी वरील सातपाटी मुरबे डहाणू या भागात काही ठिकाणी समुद्राच्या लाटांचे पाणी शिरला आहे. नदीला पूर आल्यामुळे तलासरी उंबरगाव रस्त्यावरील झरी खाडी हा पूल पाण्याखाली गेला असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

हिंगोली जिल्ह्यात सुध्धा जोरदार पाऊस
हिंगोली जिल्ह्यात सुद्धा आज पावसाने हजेरी लावली आहे. हलक्या स्वरूपाच्या असणाऱ्या या पावसाने दुपारनंतर मात्र दडी मारली दुपारनंतर जिल्ह्यात पडणारा पाऊस थांबला आहे. 

या पावसामुळे कयाधू नदी दुसरी करून वाहत आहे. परिणामी समजा हिंगोली रोड वरून नदीचे पाणी वाहत असल्याने दहा ते बारा गावांचा हिंगोली शहराशी संपर्क तुटला आहे. 

पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या नद्या ओढ्या लागत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. 
Pune : पिंपरी चिंचवडमध्ये पावसाला सुरुवात

सकाळ पासून ब्रेक घेतलेल्या पावसाने पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गेल्या अर्ध्या तासापासून संततधार सुरु आहे.

तानसा धरण ओसंडून वाहण्याची शक्यता

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२८.१७ मी. इतकी असून . तानसा धरण आसंडुन (overflow) वाहण्याची पातळी १२८.६३ मी. इतकी आहे. तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असुन धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण लक्षात घेता तानसा धरण लवकरच भरुण वाहण्याची (Overflow) शक्यता आहे.


तरी तानसा धरणाखालील व तानसा नदीलगतच्या, आजुबाजुच्या परिसरातील गावांना, रहीवाश्यांना तानसा धरण भरून वाहण्याची (Overflow) कल्पना देण्यात आली असून सावध राहण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित सर्व शासकिय यंत्रणा, तहसिल कार्यालय, पोलिस यंत्रणा व सर्व संबंधित अधिकारी यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी दिले.

यवतमाळ जिल्ह्याल अतिवृष्टीचा तडाखा, 26 हजार हेक्टर शेतीचं नुकसान

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या सह दिवसापासून चौफेर पाऊस सुरु आहे. या पावसाने अक्षरशः जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्याच्या 55 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने 26 हजार हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले. यात सर्वाधिक शेतीचे नुकसान उमरखेड तालुक्यात 23 हजार हेक्टर वर झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर हे पीक पाण्याखाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली.



कोकण रेल्वे मार्गावर मातीचा भराव, मांडवी एक्सप्रेस अडकली खेड स्थानकात

कोकण रेल्वे मार्गावर मातीचा भराव आल्याने मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात अडकली आहे. अंजणी आणि चिपळूण दरम्यान रेल्वेमार्गावर माती आली आहे. इतरही गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या आहेत. मांडवी एक्स्प्रेसचे इंजिन काढून मदतकार्यासाठी नेण्यात आले आहे.



मालेगाव नुसतं धाडस पडले महागात, पुराच्या पाण्यात उडी मारणारा तरुण बेपत्ता

Nashik Rain : पोहण्यासाठी पुराच्या पाण्यात उडी घेऊन नुसतं धाडस करण तरुणाला चांगलेच महागात पडल्याची घटना मालेगावात समोर आली आहे. मुसळधार पावसाने गिरणा नदीला पूर आला असून, याच पुराच्या मालेगावात गिरणा पुलावरून जवळपास 25 फूट उंचावरुन किल्ला भागात राहणाऱ्या एका 23 वर्षीय  तरुणाने पोहण्यासाठी उडी मारली. मात्र त्याची ही स्टंटबाजी त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे.  सायंकाळपासून हा तरुण बेपत्ता असून मालेगावच्या अग्निशमाक दलाकडून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान मालेगावच्या ठिकाणी असलेल्या पुराच्या पाण्यात अनेकजण पोहण्याचे धाडस करतात, प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

पाऊस आणि नैसर्गीक आपत्तीमुळे 1 जूनपासून आत्तापर्यंत 93 जणांचा मृत्यू

पाऊस आणि नैसर्गीक आपत्तीमुळे 1 जूनपासून आत्तापर्यंत 93 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक आणि नागपूर जिल्ह्यात मृत्युची संख्या सर्वाधिक आहे. पुढील दोन दिवसात पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण , नागपुर आणि पुणे जिल्ह्यात ही मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा इशारा आहे. 

Chandrapur Rains : 22 ट्रक ड्रायव्हर्सला पोलिसांनी केले रेस्क्यू

चंद्रपूर : पुरात अडकलेल्या 22 ट्रक ड्रायव्हर्स ला पोलिसांनी केले रेस्क्यू. घुग्गुस-भोयेगाव मार्गावर आज पहाटे करण्यात आले रेस्क्यू, भोयेगाव पुलावर पाणी असल्यामुळे थांबले होते ट्रक, मात्र काल रात्री अचानक वर्धा नदीचे पाणी वाढल्याने थांबलेल्या ट्रकांना मागच्या बाजूने देखील पडला वेढा, पोलीस विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीम ने सर्व ट्रकचालकांना बोटीच्या मदतीने काढले बाहेर.

चंद्रपूरमध्ये पुरात अडकलेल्या 22 ट्रक ड्रायव्हर्सला काढले बाहेर

चंद्रपूरमध्ये पुरात अडकलेल्या 22 ट्रक ड्रायव्हर्सला पोलिसांनी रेस्क्यू केले आहे. घुग्गुस-भोयेगाव मार्गावर आज पहाटे रेस्क्यू करण्यात आले. भोयेगाव पुलावर पाणी असल्यामुळं ट्रक थांबले होते. मात्र काल रात्री अचानक वर्धा नदीचे पाणी वाढल्याने थांबलेल्या ट्रकांना मागच्या बाजूने देखील पाण्याचा वेढा पडला होता. पोलीस विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीमने सर्व ट्रक चालकांना बोटीच्या मदतीने काढले बाहेर.

यवतमाळ जिल्ह्यातील गौळ बुद्रुक गावाला पुराचा वेढा

Yavatmal rain : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गौळ बुद्रुक गावचा संपर्क तुटला आहे. गावाला पुराचा वेढा बसला आहे. शेकडो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, जीव धोक्यात टाकून ग्रामस्थांचा पुरातून वाट काढत आहेत.

तापी नदीवरील हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आले

जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणायच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानं पाण्याचा विसर्ग वाढत आहे.


 

19 तासानंतर नरसिंह मंदिरात अडकलेल्या 15 भाविकांना सुखरुप काढलं बाहेर

Bhandara Rain : तब्बल 19 तासांच्या प्रयत्नानंतर माडगी येथील नरसिंह मंदिरात अडकलेल्या 15 भाविकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. राज्य आपत्ती दलामार्फत भाविकांची सुखरुप सुटका करण्यात आली. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील माडगी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात असलेल्या नरसिंह मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविक गेले होते. यावेळी नदीचे पाणी वाढल्यानं 15 भाविक मंदिरातच अडकले होते.



Nagpur Rains : वाहून गेल्याने 24 तासांत दहा जणांचा मृत्यु

Nagpur : गेल्या 24 तासात नागपूर जिल्ह्यामध्ये सततधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत आहे. 18 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गेल्या 24 तासात दहा जण वाहून गेल्याने मृत्युमुखी पडले आहे.

Mumbai Rains : मुंबईत धुंवाधार पावसाला सुरुवात; दक्षिण मध्य मुंबईसह उपनगरांमध्ये तुफान पाऊस

Mumbai Rains : मुंबईत धुंवाधार पावसाला सुरुवात; दक्षिण मध्य मुंबईसह उपनगरांमध्ये तुफान पाऊस 





Nashik Rain : नाशिक शहरात पावसाचा जोर कमी, जिल्ह्यात मात्र संततधार सुरूच 

Nashik Rain : नाशिक शहरात सकाळपासून पावसाने उघडीप दिली असून जिल्ह्यातील काही भागात मात्र संततधार सुरूच आहे. काल सायंकाळी गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने पुन्हा एकदा गोदावरीला पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

मुंबईत आज आणि उद्या यंदाच्या मान्सूनमधील सर्वात मोठी भरती, आज 12.30 वाजता 4.82 मीटर उंचीच्या लाटा

मुंबईत आज आणि उद्या यंदाच्या मान्सूनमधील सर्वात मोठी भरती, आज 12.30 वाजता 4.82 मीटर उंचीच्या लाटा

वाई तालुक्यातील जोर गावात उच्चांकी पाऊस, 24 तासात तब्बल 421 मिलिमीटर पावसाची नोंद

Satara rain : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जोर गावात उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. जोर गावात गेल्या 24 तासात तब्बल 421 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. आठ दिवसापूर्वी अशाच पद्धतीच्या मुसळधार पावसाची नोंद झाली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं प्रशासकीय यंत्रणा हडबडली आहे. गेल्या वर्षी अशाच पद्धतीची अतिवृष्टी याच गावांमध्ये झाली होती. त्यामुळं माय लेक पुरात वाहून गेली होती.

नाशिकमध्ये 8 ते 11 जुलैदरम्यान तब्बल 294.7 मिमी पावसाची नोंद

नाशिकला पावसाने चांगलंच झोडपून काढल आहे. आठ ते अकरा जुलै या चारच दिवसात तब्बल 294.7 मिमी पाऊस कोसळला होता. तर ग्रामीण भागातही अतिवृष्टी झाल्याने याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. बाजार समितीमध्ये फळभाज्यांची 50 टक्के तर पालेभाज्यांची आवक जवळपास 70 टक्क्यांनी कमी झाल्याने भाज्यांचे दर 25 ते 30 टक्क्यांनी महागले आहेत. 

गेल्या २४ तासात रायगड जिल्ह्यात सरासरी 101.61 मिमी पावसाची नोंद

Raigad rain : गेल्या २४ तासात रायगड जिल्ह्यात सरासरी 101.61 मिमी पावसाची नोंद झाली आहे. माथेरानमध्ये सर्वाधिक 243 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पनवेल 170 मिमी, कर्जत 164 , महाड 134, पोलादपूर 133 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

चंद्रपूर शहरात शिरलं इरई नदीचं पाणी, पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु

चंद्रपूर शहरात इरई नदीचं पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या शेजारी असलेल्या रहमत नगर, राजनगर आणि सहारा पार्क मध्ये 10 ते 15 फूट पाणी असल्याने येथे मोठ्या प्रमाणात लोकं अडकून पडले आहे. पुरात अडकलेल्या या लोकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन च्या टीमने सुखरूप बाहेर काढायला सुरुवात केली आहे. बोटींच्या मदतीने या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. 



बुलढाणा जिल्ह्यातील कोराडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला, कोराडी नदीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यातील कोराडी मध्यम प्रकल्प आज सकाळी 100 टक्के भरला आहे. या प्रकल्पातून 3.09 द.ल.घ.मी. पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळं कोराडी नदीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना व गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.



परभणीत पुराच्या वेढात अडकलेल्या वानरांची सुटका

Parbhani rain : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी गावाच्या शिवारात थुना नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्याने 25 ते 30 वानरांचा कळप झाडावर अडकला होता.  याबाबत एबीपी माझा ने पाठपुरावा केल्यानंतर आज सकाळी स्थानिक काही गावकरी व प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन या वानरांना बाहेर काढले आहे. भुकेलेल्या वानरांना भाकरी आणि इतर खाद्य खाऊ घातले आहे.



इचलकरंजीत पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ, शेती पाण्याखाली

कोल्हापूरमधील इचलकरंजी येथे पंचगंगा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. इचलकरंजी येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात पुराचे पाणी गेले आहे.  NDRF चे जवान बोटीसह तैनात आहेत.

लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, गेल्या 24 तासात तब्बल 234 मिलिमिटर पावसाची नोंद

लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. यंदा लोणावळ्यात आणखी एक उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 234 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. काल दहा तासातच 170 मिलिमिटर पाऊस बरसला होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. गेल्या 72 तासात 667 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.



यवतमाळ जिल्ह्यातील संततधार पावसाने अडाण नदीला पूर, यवतमाळ- दारव्हा मार्गाचा संपर्क तुटला

यवतमाळ जिल्ह्यातील संततधार पावसाने अडाण नदी दुथडी भरुन वाहत आहे. अडाण नदी ओसंडून वाहत असल्याने बोरी अरब गावाजवळील पर्यायी पूल पाण्याखाली गेला आहे.  त्यामुळं यवतमाळ- दारव्हा मार्गाचा संपर्क तुटला आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक झाली ठप्प झाली आहे.



चंद्रपूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 6 लोकांना रेस्क्यू करण्यात यश

चंद्रपूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 6 लोकांना रेस्क्यू करण्यात यश आलं आहे. विसापूर-कोलगाव येथील एका साईटवर 6 लोक अडकले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने आज सकाळी एअर बोटच्या मदतीने सर्व लोकांना रेस्क्यू केलं आहे.



नंदुरबार जिल्ह्यातील तापी आणि पूर्णा नदींना पूर, हातनूर धरणाचे 45 दरवाजे उघडले

मध्यप्रदेश आणि विदर्भात होणाऱ्या मुसळधार पावसामुळं नंदुरबार जिल्ह्यातील तापी आणि पूर्णा नदींना पूर आल्यानं हातनूर धरणाचे 45 दरवाजे उघडले आहेत. त्यामुळं नंदूरबार जिल्ह्यात तापी नदीवरील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेज मधील पाण्याची पातळी वाढत असल्यानं या धरणातून मोठ्या प्रमाणात तापी नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. सारंगखेडा येथील बॅरेजचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर प्रकाश येथील पाच दरवाजे पूर्ण तर तीन दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आल्याने तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. काल दुपारनंतर सुरु झालेल्या पावसाने जिल्ह्यात आज विश्रांती घेतल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.



यवतमाळ जिल्ह्यातील निळोणा धरण ओव्हर फ्लो

Yavatmal rain : यवतमाळ जिल्ह्यातील निळोणा धरण ओव्हर फ्लो झालं आहे. त्यामुळं यवतमाळकरांची चिंता मिटली आहे. हे  धरण त्यांच्या क्षमतेच्या 100 टक्के भरुन ओव्हर फ्लो झाले आहे. मागील 6 दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे.  धरण भरल्याने यवतमाळकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जीवन प्राधिकरणाचे यवतमाळ शहरात 40 हजारावर ग्राहक असून त्यांना दोन दिवस आड पाणी पुरवठा या धरणातून करण्यात येतो. हे  धरण ओव्हर फ्लो झाल्याने  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.



परभणी जिल्ह्यात सातव्या दिवशी संततधार सुरु, दुधना धरणाचे 6 दरवाजे उघडले

Parbhani Rain : परभणी जिल्ह्यात सातव्या दिवशी संततधार पाऊस  सुरु आहे. यामुळं लोअर दुधना धरणाचे 6 दरवाजे उघडले आहेत. तसेच गोदावरीवरील 4 बंधाऱ्यांचे 8 दरवाजे उघडले आहेत. दुधणा धरणातून 7071 क्युसेक्सने पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दुसरीकडे गोदावरी वरील ढालेगावं,मुदगल,तारुगव्हाण आणि दिग्रस या 4 बंधाऱ्यांचे 8 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील दुधना आणि गोदावरी या दोन्ही प्रमुख नद्यांना पाणी आले आहे. दोन्ही नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाऊस सातत्याने सुरुच असल्याने हा विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो. येलदरी प्रकल्पातील पाणी साठ्यातही वाढ झाली असून पाणीसाठा हा 60.10 टक्के गेला आहे. 

चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात इरई नदीचे पाणी शिरलं

Chandrapur Rain : चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात इरई नदीचे पाणी शिरले आहे. रहमतनगर, राजनगर आणि सहारा पार्क या भागातल्या अनेक घरांमध्ये इरई नदीच्या पाण्याचा शिरकाव झाला आहे. महानगरपालिकेच्या पथकाने रहमतनगर परिसरातून 15 ते 20 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. इरई धरणाचे सर्व म्हणजे 7 दरवाजे अजूनही 1 मीटरने सुरु असल्यानं नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.



चंद्रपूरमधल्या रहमत नगर, राजनगर आणि सहारा पार्क या भागातल्या अनेक घरांमध्ये इरई नदीचे पाणी शिरले

Chandrapur Rain : चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात इरई नदीचे पाणी शिरले आहे. रहमत नगर, राजनगर आणि सहारा पार्क या भागातल्या अनेक घरांमध्ये इरई नदीच्या पाण्याचा शिरकाव झाला आहे. महानगरपालिकेच्या पथकाने रहमतनगर परिसरातून 15 ते 20 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. इरई धरणाचे सर्व म्हणजे सात दरवाजे अजूनही एक मीटरने उघडे सल्याने नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.

धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाचे 8 दरवाजे 1 मीटरने उघडले, 16 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु

धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाचे 8 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले आहेत. या धरणातून 16 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळं पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे 80  गावांचा संपर्क तुटला

नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे 80  गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे दोन दिवस शाळा बंद आहेत. आज 14 जुलै रोजीही अतिवृष्टीमुळे शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाचे दिले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात 76.46 टक्के पाणीसाठी, 7 दरवाजे उघडले

अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठं असलेल्या मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाचे 7 दरवाजे 45 सेमी ने उघडण्यात आले आहेत. धरणाच्या परिसरात पाऊस सुरु असल्यानं धरण 76.46 टक्के भरले आहे. 


 

धुळ्यातील अक्कलपाडा धरणाचे आठ दरवाजे एक मीटरने उघडून 16 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, पांझरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Dhule Rain : धुळ्यातील अक्कलपाडा धरणाचे आठ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून यातून 16 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वाशिम जिल्ह्यातील रात्रभर जोरदार पाऊस, खरीप पीक धोक्यात येण्याची शक्यता

वाशिम जिल्ह्यातील रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने आसेगाव पेन येथील पैनगंगा नदी दुधडी भरुन वाहत आहे. या पावसामुळं अनेक शेतात पाणी साचले आहे. पाऊस असाच सुरुच राहिला तर खरीप पीक धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 



जायकवाडी धरणात 52 टक्के पाणीसाठा, औरंगाबाद आणि जालनासह 300 खेड्यांचा पाणी प्रश्न सुटला

जायकवाडी धरणात 52 टक्के पाणीसाठा झाला आहे. औरंगाबाद आणि जालनासह 300 खेड्यांचा पाणी प्रश्न वर्षभरासाठी मिटला आहे. अजूनही धरणात
78 हजार 399 क्यूसेक एवढी आवक सुरू आहे.

वाशिम जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस

वाशिम जिल्ह्यात रात्रभर सर्वदूर जोरदार पाऊस बरसला आहे. मात्र अद्याप कोणत्याही नदी काठच्या गावांचा संपर्क तुटला नाही किंवा नुकसान नाही.

दुर्घटना घडल्यानंतरही सांड नदीच्या पुरातून वाहन काढण्याचे धाडस

नागपूर जिल्ह्यातील नांद गावाजवळ पुरातील पाण्यातून वाट काढताना स्कॉर्पिओ वाहून जाऊन 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, त्यानंतरही काही ठिकाणी वाहन चालक पुरातून वाहन काढण्याचे धाडस करताना दिसत आहेत. मौदा तालुक्यातील तारसा गावाजवळून वाहणाऱ्या सांड नदीच्या पुलावर पाणी वाहत आहे. या पुलावरुन वाहणाऱ्या पाण्यातून जिवावर उदार होऊन काही दुचाकीस्वार पुराच्या पाण्यातून वाहने चालवत आहेत.



रत्नागिरीतील अणूस्कुरा घाटात दरड कोसळली, घाट वाहतुकीसाठी बंद

Ratnagiri Landslide : रत्नागिरी जिल्ह्यातील अणूस्कुरा घाटात दरड कोसळली. परिणामी घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यापैकी अणूस्कुरा घाट आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे.

वसई दरड दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 6 लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Vasai Landslidse : वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी 2 लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी 6 लाख मदत केली जाईल. याशिवाय जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, वसई, विरारमध्ये सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी

Palghar Rain : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्याला आज दिवसभर रेड अलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्यातील वसई विरारसह सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेजांना आज सुट्टी जाहीर केली आहे. पालघर जिल्हाधिकारी डॉ माणिकराव गुरसल यांनी तसे पत्रक काढले आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट असला तरी आज सकाळच्या वेळेत मात्र जिल्ह्यासह वसई, विरार नालासोपाऱ्यात रिमझिम पाऊस सुरु आहे. शहरात सध्या कुठेही पाणी साचलेले नाही. आभाळ पूर्ण भरुन आलेले आहे. त्यामुळे दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी गावाजवळ पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प

नंदुरबार जिल्ह्यातील नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील  विसरवाडी गावाजवळील पूल पुन्हा पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांनी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली आहे. नवापूर तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नदी नाल्यांचा पाणी पातळी वाढली आहे. 



बुलढाणा जिल्ह्यात मुसळदार पाऊस, खडकपूर्णा प्रकल्प 50 टक्के भरला

गेल्या 24 तासात बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर, संग्रामपूर, नांदुरा तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. तर इतर तालुक्यात गेल्या 36 तासापासून मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील जलाशयापैकी सर्वात मोठा असलेला खडकपूर्णा प्रकल्प 50 टक्के भरला असून इतरही जलाशयाची पातळी झपाट्याने वाढत आहे. अमरावती , अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पावसाचा परिणाम म्हणून पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे. नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



वैतरणा नदीत बहाडोली इथे 13 कामगार अडकले, बचावकार्य सुरु

Palghar rain : मुंबई-वडोदरा महामार्गाच्या फ्लाय ओव्हर ब्रीजच काम सुरु आहे. हे काम सुरु असताना अचानक पूर आल्यानं वैतरणा नदीत बहाडोली येथे 13 कामगार अडकले आहेत. हे सर्व जण स्किल्ड वर्कर असल्याचे सांगण्यात येत आहे. NDRF च्या टीम ला पाचारण करण्यात आलं असल्याची माहिती तहसीलदार सुनील शिंदे यांनी दिली आहे. त्यांना बाहेर काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहे.  

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Updates LIVE : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी पूरससृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे.


आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा


दरम्यान, राज्यात आज  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


शाळांना सुट्टी


ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही मुंबईच्या शाळांबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे.


 पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट


पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदूरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 


राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.