Maharashtra Monsoon: राज्यात मनसोक्त बरसलेल्या मान्सूनने (Maharashtra Monsoon Update) रविवारी निरोप घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असून मान्सून परतल्याने आता दिवाळीत पाऊस नसणार आहे. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी (Monsoon Withdraws Entirely From Maharashtra ) परतला आहे. तसेच महाराष्ट्रासह देशातून देखील मान्सून परतला  आहे. 


 यंदा पावसाने जून ते ऑक्टोबर असा चार महिने मुक्काम केला आणि गेल्या बारा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा राज्यात झाली. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस झाला आहे. मान्सून परतला असला, तरी पुढील दोन दिवस वातावरणातील स्थानिक घटकांमुळे पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या 24 तासांत कोकणातील  एक दोन ठिकाणे वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद नाही. 


राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला  या पावसानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.. राज्याने गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक सक्रीय मान्सून यंदा अनुभवला. दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरील मान्सून राज्यातून बाहेर पडतो. यंदा हा देखील विक्रम मोडून मान्सून 23 ऑक्टोबरला राज्यातून बाहेर पडला आहे. तसेच  संपूर्ण देशातून मान्सून बाहेर पडल्याची माहिती  हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.


राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस


राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत 123 टक्के पाऊस झाला आहे. सरासरीच्या तब्बल 23 टक्के अधिक पाऊस जास्त झाला आहे. गेल्या 50 ते 60 वर्षात बंगालच्या उपसागरात जास्त वादळे निर्माण होत होती, पण गेल्या काही वर्षांपासून अरबी समुद्रात वादळाचे प्रमाण वाढलं आहे. तसेच कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे परिणाम सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे राज्यासह किनारपट्टीच्या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त वाढल्याचे दिसून येत आहे.


परतीचा पाऊस लांबण्याची विविध कारणे


परतीचा पाऊस लांबण्याची विविध कारणे आहेत. समुद्राचं वाढलेलं तापमान, कमी दाबाचा पट्टा, तसेच ला निना या कारणानं परतीचा पाऊस हाहाकार करत असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी दिली आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात बांधकामे जास्त झाली आहेत. त्यामुळं तापमान सुद्धा जास्त असते, त्यामुळं त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टे तयार होतात. तसेच आजूबाजूने वाहणारे वारे हे शहरी भागाच्या दिशेने वाहताना दिसून येतात. वातावरणातील बदलही दिसून येतात. त्याचाही परिणाम स्थानिक पातळीवर होताना दिसतो असे पन्हाळकर यांनी सांगितलं.