Kolhapur Girgaon : कोल्हापूर (Kolhapur Girgoan) शहराच्या तिन्ही बाजूने महापुराच्या पाण्याने वाताहत होत असल्याने हाकेच्या अंतरावरील दक्षिण बाजूकडील गावांमधील जमिनींना सध्या चांगलाच भाव आला आहे. वर्ग दोनच्या जमिनी बिगरशेती करून साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून जमिनी मिळवून त्यावर कोट्यवधी रुपये कमावण्याचा गोरखधंदा चांगलाच फोफावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून सैनिक टाकळीनंतर सर्वाधिक सैन्य देशाला देणाऱ्या सैनिक गिरगावमध्ये ग्रामपंचायतीच्या पठारवरील जागेवर (Girgaon plateau) ग्रामपंचायत सदस्यांना दमदाठी करून कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुण्यातील कुख्यात मुळशी पॅटर्न आता कोल्हापूरमध्येही रंगू लागला आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. 


तलाठ्यांकडे ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार देऊनही अक्षम्य दुर्लक्ष, सर्कल, तहसिलदारांना तक्रार करूनही लक्ष न दिल्याने तसेच गट क्रमांक 1499 मधील मिळकतधारकांनी ग्रामपंचायत सदस्यांनाच दमदाठी केल्याने हतबल होण्याची वेळ आली आहे. 6 ऑक्टोबरपासून पंचायतीकडून काम थांबवण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु असताना कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांकडून उपोषणाचा इशारा देऊनही काम थांबवण्यात आलेलं नाही. 


गिरगावच्या पठारावर दमदाठी करून उत्खनन 


गिरगावच्या पश्चिमेला बी. के. पाटील हायस्कुलला लागून गिरगावचे विस्तीर्ण पठार आहे. गिरगाव ग्रामपंचायतीची (Girgaon Gram Panchayat) जवळपास 4 हेक्कर गायरान जमीन आहे. या जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागाकडून 10 हजार रोपे लावण्यात आली आहेत. या जमिनीचा गट क्रमांक 1466 आहे. याच गटक्रमांकातील जमिनीवर थेट ग्रामपंचायत सदस्यांना दमदाठी करून तसेच स्थानिकांचा विरोध डावलून आतापर्यंत 18 फुट उंच, 60  फुट रुंद आणि 360 फुट लांबी असे 5184 ब्रास बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले आहे. बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन केल्यास एका ब्रासला 2400 रुपये दंड ठोठावला जातो. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर उत्खनन झाले आहे. 


तलाठ्यांकडे तक्रार करूनही अक्ष्यम दुर्लक्ष


शासकीय जमिनीवर उत्खनन होत असल्याने ग्रामपंचायत सदस्यांकडून तलाठ्यांना सांगून काम थांबवण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. मात्र, तलाठ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आणि कोणताही आदेश तक्रार केल्यापासून काढला नसल्याने कोट्यवधी रुपयांचे उत्खनन पठारच्या जमिनीवर सुरु आहे.


ग्रामस्थांसह ग्रामपंचायतने जाब विचारल्यानंतर तलाठ्याला जाग 


उत्खनन दिवसागणिक वाढतच चालल्याने शनिवारी ग्रामस्थांनी तलाठ्याला चांगलेच फैलावर घेत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्यास सांगितले. सरपंच महादेव कांबळे, माजी उपसरपंच जालिंदर पाटील, ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, पोपट सुतार, उत्तम पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, सैनिक संघटनेचे शशिकांत साळोखे तसेच शेतकरी आणि तरुणांनी बेकायदेशी झालेलं उत्खनन दाखवून दिले. यावेळी गौणखनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्राॅली तसेच रोलरला नंबर प्लेट नसल्याचेही दिसून आले. त्यामुळे हा गोरखधंदा किती बेकायदेशीर सुरु आहे याचा अंदाज येतो. 


शासकीय जमिनीत उत्खनन करून सपाटीकरण!


गिरगाव ग्रामपंचायतीच्या पठारला लागूनच असलेल्या वर्ग दोनची जमिन असलेल्या गट क्रमांक 1499 मिळकतीमध्ये सपाटीकरण सुरु आहे. सपाटीकरणासाठी लागणारा मुरुम हा गिरगाव ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गट क्रमांक 1466 उत्खनन करून वापरण्यात आला आहे. तसेच बेकायदेशीरपणे मुरुमची वाहतूक करून विक्री करण्यात आल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे. 


सखोल चौकशी करून कारवाई करावी 


गिरगावचे सरपंच महादेव कांबळे यांच्यासह सदस्यांनी तक्रार करूनही दखल न घेण्यात आल्याने या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली. तलाठ्यांना आज जाब विचारल्यानंतर बेकायदेशीर उत्खनन झाल्याचा पंचनामा केल्याचे ते म्हणाले. रुपेश पाटील म्हणाले, गावातील सरकारी जमिनीवर उत्खनन सुरु असताना तलाठ्यांनी दुर्लक्ष करणे त्यांना पाठीशी घालणे, ही गंभीर बाब आहे. गावाच्या चारी बाजूने उत्खनन सुरु असून यामध्ये महसूल यंत्रणा सामील असल्याचा आरोप त्यांनी केला. तलाठी सुरेंद्र इंद्रेकर यांनी 5184 ब्रास बेकायदेशीर उत्खनन झाले असून त्याचा पंचनामा केल्याचे सांगितले. 


ग्रामपंचायतीने मोजणीला विरोध करूनही दमदाठीने उत्खनन 


गट क्रमांक 1499 मधील मिळकतधारकांनी मोजणी केल्यानंतर या मोजणीला गिरगाव ग्रामपंचायतीकडून कडाडून विरोध केला होता. तरीही शासकीय बळाचा वापर तसेच लाखो रुपयांच्या पैशाची भीती ग्रापपंचायतीला दाखवून बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले आहे. 


वर्ग दोनच्या जमिनी करून वर्ग एक करून पैसे कमावण्याचा गोरखधंदा


गेल्या काही दिवसांपासून वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याची साखळीच महसूल विभागात कार्यरत आहे. त्यामुळे या गोरखधंद्यातून अनेक जमीन माफिया तयार झाले आहेत. वर्ग दोनमधील जमिनी नाममात्र दरात खरेदी केल्यानंतर ती वर्ग एक करून गुंठेवारीमध्ये विकून कोट्यवधी रुपये कमावण्याचा धंदाच सुरु आहे. 


कोल्हापूरच्या दक्षिणेला जमीन व्यवहार जोरात


कोल्हापूरला महापुराने वेढले असताना केवळ दक्षिणेकडील बाजूस कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नव्हते. अन्य तिन्ही बाजूंनी शहर व्यापल्याने कोल्हापूर शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पाचगावमध्येही जागा शिल्लक नसल्याने जमीन माफियांकडून आता कळंबा, गिरगाव, कंदलगाव, कणेरीवाडी, कणेरीमधील गावांमधील जमिनींवर डोळा आहे. त्यामध्येही या सर्व गावांच्या तुलनेत गिरगाव उंचावर असल्याने आणि संपूर्ण कोल्हापूरचा नजारा दिसत असल्याने जमीन माफियांनी आपले जाळे पसरण्यास सुरुवात केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या