Aurangabad News: सणाचा राजा समजला जाणारा दिवाळी सारखा सण तोंडावर असतांना देखील, रेशन दुकानात धान्य मिळत नसल्याने एका गावातील ग्रामस्थाने चक्क पोलीस ठाणे गाठत झोपो आंदोलन केल्याची घटना औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावात समोर आली आहे. हे आंदोलन पाहून पोलीस देखील काही वेळेसाठी आश्चर्यचकित झाले होते. अखेर पोलिसांनी त्या व्यक्तीची समज काढत परत पाठवले. पण या घटनेची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 


दिवाळी सण असल्याने आपल्या घरात गोडधोड पदार्थ तयार करण्याची धामधूम सर्वच घरात पाहायला मिळते. तर सर्वसामान्य व्यक्तीची दिवाळी गोड व्हावी यासाठी सरकार स्वस्तात अनेक पदार्थ रेशन दुकानात उपलब्ध करून देतात. मात्र औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव येथील नारायण कचरू खरात जेव्हा रेशन दुकानात सामान आणण्यासाठी गेले तर त्यांना संबंधित रेशन दुकानदाराने रेशन दिले नाही. गेल्या दोन महिन्यापासून चकरा मारून देखील रेशन मिळत नसल्याने खरात हतबल झाले होते. दिवाळी सारखं सण असताना देखील रेशन मिळत नसल्याने खरात यांनी रेशन दुकानदाराकडे विनंती केली, पण काहीच फायदा झाला नाही. 


थेट पोलीस ठाण्यात झोपो आंदोलन...


अनेक प्रयत्न करून देखील रेशन मिळत नसल्याने कचरू खरात यांनी थेट बिडकीन पोलीस ठाणे गाठले. तसेच मला रेशन मिळत नसल्याने रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र असा गुन्हा दाखल करता येत नसल्याची माहिती देत पोलिसांनी खरात यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण खरात काहीच आयकून घेत नव्हते. त्यामुळे पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याने खरात यांनी पोलीस ठाण्यातच झोपो आंदोलन सुरु केले. तब्बल तीन तास खरात यांचे आंदोलन सुरूच होते.  तर पोलिसांना आपली व्यथा सांगतान त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. 


पोलिसांची महसूल विभागाला माहिती...


रेशन मिळत नसल्याने खरात हे तब्बल तीन तास पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडून होते. त्यामुळे अखेर बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी तहसीलदार शंकर लाड यांना फोन करुन घटनेची माहिती दिली. यावेळी तहसीलदार लाड यांनी संबधित व्यक्तीची माहिती पाठवण्यास पोलिसांना सांगतिले. सायंकाळी 6 वाजता खरात यांची पोलिसांनी समजूत काढली. त्यानंतर ते निघून गेले. मात्र या घटनेची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.