Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस यांची सत्तेत येण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र या सत्तेच्या राजकारणात शेतकरी भरडला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यांच्या पळून गेलेल्या आमदारांची तर दुसरीकडे राज्यातील शेतक-यांना दडी मारलेल्या पावसाची प्रतीक्षा आहे.


सत्तेच्या राजकारणात शेतकऱ्यांचे मरण
हवामान अंदाज विभागाने जुन महिण्यात चांगला पाऊस येणार असल्याचे भाकीत केल्याने शेतक-यांनी सुरवातीलाच सोयाबिन, कापूस तसेच इतर पिकांची पेरणी केली. दुसरीकडे पावसाने मात्र दडी मारल्याने अनेकांचे बियाणे जमिनीतच खराब झाले. यानंतर अनेकांनी आता दुबार पेरणी केल्यानंतर पावसाची प्रतिक्षा करीत आहे. जून महिना संपण्याच्या मार्गावर असतांनाही पाऊस मात्र दडी मारुन बसला आहे. शेतक-यांनी पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने आता सरकारने शेतक-यांना बियाण्यांची मदत देण्याची मागणी करीत आहे. 


मुख्यमंत्र्यांना पळालेल्या आमदारांची, तर शेतक-यांना पावसाची प्रतिक्षा


पेरणी केलेल्या तसेच दुबार पेरणी केलेल्या काही शेतकऱ्यांनी ही दुबार पेरणी सुध्दा वाया जाते की काय? अशी भीती व्यक्त केली आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी संकटात असतांना राज्यात मात्र भोंग्यापाठोपाठ आता सत्ता परिवर्तनाची लढाई सुरु आहे. राज्याचे कृषीमंत्री सुध्दा गुहवाटी येथे फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये मुक्कामाला गेले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्वच विभागाचे मंत्री, नेते फक्त सत्ता परीवर्तनाच्या लढाईत उतरले आहे. त्यांच्या खर्चाचा 10 टक्के रक्कम जरी शेतकऱ्यांसाठी खर्च केला तर शेतकऱ्यांची दुबार आणि तिबार पेरणी खर्च निघेल. तर दुसरीकडे ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहेत, पण वीज वितरण कंपनी या भोंगळ कारभारामुळे शेतीला पाणी सुद्धा येऊ शकत नाही.


राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट


राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघायला कुणालाच वेळ नाही. सुरुवातीला भोंग्याचे राजकारण तापविण्यात आले त्यापाठोपाठ राज्यसभा तसेच विधाण परिषदेच्या निवडणूकीचे वातावरण तापले आणि आता सत्ता परिवर्तनाचा नाच सुरु झाला. या सर्व परिस्थितीने राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था मात्र बिकट झाली आहे. शेतक-यांना पीककर्ज मिळाले कि नाही, त्यांच्या पिकविमा उतरला कि नाही, बियाणे अथवा खत त्यांना मिळाले कि नाही यासंदर्भात कुणीच दखल घ्यायला तयार नाही. राजकारण्यांच्या या दुर्लक्षीत धोरणामुळे आता शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


....अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन


राज्यातील अस्थिरता संपण्याची शक्यता दिसून येत नाही. सत्ता परिवर्तनाची लढाई सोडून शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यात यावे. पावसाने दडी मारल्याने मोठया प्रमाणात दुबार आणि तिबार पेरणीची वेळ शेतक-यांवर आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना मोफत बियाणे उपलब्ध करुन देण्यात यावे अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला