Maharashtra Monsoon : राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. अशातच हवामान विभागाकडून (Meteorological Department) मान्सूनबाबत एक बातमी आली आहे. महाराष्ट्रातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 22 ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे.
बंगालच्या उपसागरा लगतच्या भागात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्यामुळं मान्सून पश्चिम-वायव्य दिशेकडं सरकणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र डिप्रेशनमध्ये तर 23 ऑक्टोबर रोजी डीप डिप्रेशनमध्ये परावर्तित होणार आहे. त्याचे 24 ऑक्टोबरपर्यंत सीतरंग चक्रीवादळात रुपांतरीत होत आहे. 25 ऑक्टोबरला ओडिशा किनारपट्टीला लागून पश्चिम बंगाल-बांगलादेश किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
परतीचा पाऊस लांबण्याची विविध कारणे
परतीचा पाऊस लांबण्याची विविध कारणे आहेत. समुद्राचं वाढलेलं तापमान, कमी दाबाचा पट्टा, तसेच ला निना या कारणानं परतीचा पाऊस हाहाकार करत असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी दिली आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात बांधकामे जास्त झाली आहेत. त्यामुळं तापमान सुद्धा जास्त असते, त्यामुळं त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टे तयार होतात. तसेच आजूबाजूने वाहणारे वारे हे शहरी भागाच्या दिशेने वाहताना दिसून येतात. वातावरणातील बदलही दिसून येतात. त्याचाही परिणाम स्थानिक पातळीवर होताना दिसतो असे पन्हाळकर यांनी सांगितलं.
राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस
राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत 123 टक्के पाऊस झाला आहे. सरासरीच्या तब्बल 23 टक्के अधिक पाऊस जास्त झाला आहे. गेल्या 50 ते 60 वर्षात बंगालच्या उपसागरात जास्त वादळे निर्माण होत होती, पण गेल्या काही वर्षांपासून अरबी समुद्रात वादळाचे प्रमाण वाढलं आहे. तसेच कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे परिणाम सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे राज्यासह किनारपट्टीच्या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त वाढल्याचे दिसून येत आहे.
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ
मागील आठ दिवसापासून राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात नदी नाले दुधडी भरुन वाहत आहेत. या पावसानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. तर दुसरीकडं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. रस्त्याचं देखील मोठं नुकसान झालं आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु आहे. अशातच परतीच्या पावसाचा जोर वाढल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: