Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या  भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर अवघ्या दहा दिवसांत राज ठाकरे यांची ठाण्यात आज दुसरी सभा होत आहे. ही सभा ठाण्यातील गडकरी रंगायतनसमोरील डॉ. मूस रोड इथे राज ठाकरे यांची ही सभा होणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे ठाण्याकडे रवाना झाले आहेत.  या सभेत कट्टर मनसैनिक वसंत मोरे आणि नाशिकचे मनसे नेते  सलीम शेख  यांच्या भाषणाची देखील उत्सुकता आहे. 

Continues below advertisement


वसंत मोरे यांच्या आजच्या भाषणाची उत्सुकता


गेल्या आठवड्यापासून चर्चेत असणारे वसंत मोरे  आजच्या सभेत  राज ठाकरे यांच्या भाषणाआधी भाषण करणार आहे.  वसंत मोरे सभेत काय आणि कोणत्या विषयावर बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.


 मनसे नेते सलीम शेख आज ठाण्यातील सभेत भूमिका मांडणार 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यांबाबतच्या भूमिकेला नाशिकचे मनसे नगरसेवक सलीम शेख यांनी पाठिंबा दर्शवलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखल देत शेख यांनी राज यांच्या भूमिकेला समर्थन दिलं. यानंतर सलीम शेख यांना धमकीचे फोनही आले. या विरोधाला झुगारुन सलीम शेख आज ठाण्यातील सभेत भूमिका मांडणार आहेत.


उत्तर सभेत राज ठाकरे काय बोलणार?


 मनसेनं या सभेला उत्तर सभा असं म्हटलंय. या सभेचा दुसरा टीझर मनसेकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एखादी सभा घेऊन बोलतात आणि गायब होतात असे विधानं शरद पवार यांनी करत मनसेच्या थेट वर्मावर बोट ठेवलं होतं. त्यामुळें हाच गैरसमज खोटा ठरवण्याची तयारी केल्याचे लगेच जाहीर झालेल्या ठाण्याच्या सभेवरून दिसत आहे.  आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे अध्यक्ष आणखी काय बोलतात याविषयी राज्यभरात नक्कीच उत्सुकता आहे.