ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तरसभा आहे. गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावर केलेल्या भाषणाचे पडसाद अद्यापही कायम असताना उत्तरसभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनसमोरील डॉ. मूस रोड इथे राज ठाकरे यांची ही सभा होणार आहे. रात्री साडेसातच्या सुमारास राज ठाकरे बोलायला सुरुवात करतील.


खरंतर राज ठाकरे यांची ठाण्यातील उत्तरसभा ही 9 एप्रिल रोजी होणार होती. परंतु तलावपाळी या ठिकाणी सभा घेण्याचा प्रस्ताव मनसेने पोलिसांना दिला होता. पण या ठिकाणी 9 तारखेला होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे ही सभा आता 12 तारखेला म्हणजेच आज होणार आहे.


दरम्यान या उत्तरसभेत राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी 200 बाईक्स असतील. तसंच मनसैनिक 60×40 फुटांचा हनुमानाचा झेंडा पालघरवरुन आणणार आहेत. तर नाशिकमधून शेकडो कार्यकर्ते सभेसाठी ठाण्यात येणार आहेत.


अमेय खोपकर, संदीप देशपांडे यांचं ट्वीट


मनसे चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी देखील राज ठाकरेंच्या उत्तरसभेबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "उत्तरसभा म्हणजे हिशेबाचा दिवस, आज राजसाहेब करारा जवाब देणार, आज ठाण्यात राजगर्जना घुमणार आणि भ्रष्टवादी महाखिचडीची तंतरणार, चलो ठाणे." 






 


तर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील ट्वीट करुन उत्तरसभेसंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात राज ठाकरे यांची वाक्ये ऐकू येतात. ती अशी की, "वारं खूप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलंच आहे." 


 






उत्तर सभेत राज ठाकरे काय बोलणार?
या उत्तर सभेतील भाषणात राज ठाकरे मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा, शरद पवार, एसटी आंदोलन अशा अनेक मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता आहे. गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात मशिदींवरील भोंग, मदरशांमधील गैरप्रकार याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलंच तापलेलं आहे. शिवाय त्या भाषणात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता. गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास धरल्याचं स्पष्ट झालं आहे.आता या उत्तरसभेत राज ठाकरे कोणता मुद्दा मांडणार हे पाहावं लागेल.


महत्वाच्या बातम्या: