मुंबई: विक्रात निधी प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना मुंबई सत्र न्यायालयानं दणका दिला आहे. किरीट सोमय्यांपाठोपाठ त्यांचे पुत्र नील सोमय्यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
आयएनएस विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्यांचा अटकपूर्वी जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं सोमवारी फेटाळला होता. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय राऊतांनी काय आरोप केले होते?
शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं होतं. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबतही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयानं दिली असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा असं आव्हानही राऊत यांनी केलं. सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचा याची त्यांनी माहिती असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सोमय्या पिता-पुत्रांना चौकशीसाठी समन्स
किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना काल पोलीस ठाण्यात हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी बजावलं होतं. मात्र सोमय्या पिता-पुत्र काल चौकशीला हजर राहणार नाहीत अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती. आयएनएस विक्रांत बचावसाठी जमवलेल्या निधीप्रकरणी सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावलं होतं. यासाठी त्यांना शनिवारी सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु, ते चौकशीला हजर राहू शकले नाहीत.
सोमय्या यांच्या वकिलांनी काल याबाबत माहिती देताना सांगितले होते की, 'आम्हांला एफआयआरची प्रत आज मिळाली. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज किरीट सोमय्या दिल्लीत आहेत. नील सोमय्या यांचेही ठरलेले कार्यक्रम आहेत. त्यामुळे आज किरीट सोमय्या आणि नील सोमय्या चौकशीसाठी हजर राहू शकणार नाहीत. आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पत्रं दिलं आहे. 13 एप्रिलनंतर कधीही सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी हजर राहतील.'