Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा 14 जून रोजी वाढदिवस असतो. राज ठाकरेंच्या वाढदिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रसैनिक हे शिवतिर्थावर येत असतात. मात्र यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रसैनिकांना एक आवाहन केलंय. यावेळी शुभेच्छा द्यायला येताना कुणीही पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन येऊ नका. तर येताना एखादं झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन या असं आवाहन राज यांनी केलं. तसंच या शैक्षणिक वस्तू या गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जातील असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलंय.    


काय म्हणाले राज ठाकरे आपल्या पत्रात?


राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले, दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण या वर्षीपासून माझा तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे. 


वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा 14 जून ला  वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी राज ठाकरेंना भेटायला हजारो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येतात. मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा होतो. कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात येते


प्रत्येक शहरात नाका तिथे शाखा


प्रत्येक शहरात नाका तिथे शाखा हा उपक्रम सुरु करण्याची सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जनसंपर्क वाढावा म्हणून राज ठाकरेंनी नाका तिथे शाखा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. 


हे ही वाचा :


Sharad Pawar Threat Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून एकाला अटक; आरोपीला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी