Parli APMC Election : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी (Market Committee Election) आज मतदान पार पडत आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनचं मतदानाला सुरुवात झाली आहे. बीड (Beed) जिल्ह्यातही बाजार समितीच्या निवडणुकीची चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील परळी कृषी उत्पन्न बाजार समितीकडं (Parli APMC Election) संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण या निवडणुकीच्या निमित्तानं मुंडे बहिण-भावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) हे दोन्ही नेते परळीच्या मतदान केंद्रावर तळ ठोकून बसल्याचे पाहायला मिळालं.
बाजार समितीची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. मात्र, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्येसुद्धा मुंडे बंधू भगिनींची मोठी प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र परळीत पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे दोन तासापासून मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी परळी शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मतदान केंद्रावर तळ ठोकून बसले आहेत. तर दुसरीकडे पंकजा मुंडेसुद्धा मतदान केंद्रावर तळ ठोकून बसल्या आहेत. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची एक हाती सत्ता होती. मात्र, आता या निवडणुकीत नेमका काय निकाल लागणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
आमच्या विचारांच्या ताब्यात बाजार समित्या येणार : पंकजा मुंडे
बीड जिल्ह्यातील बाजार समित्या या आमच्या विचारांच्या ताब्यात येतील असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी पंकजा मुंडे यांनी परळी शहरात असलेल्या मतदान केंद्रावर हजेरी लावली. तसेच आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तर दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील मतदान केंद्रावर तळ ठोकला. त्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघेही वेगवेगळ्या मंडपात परळीच्या मतदान केंद्रावर बसल्याचे पाहायला मिळाले. धनंजय मुंडे डाव्या बाजूला तर पंकजा मुंडे या उजव्या बाजूला बसले होते.
बीड वगळता इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असाच संघर्ष
बीड जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांसाठी आज मतदान होतं असून, या सहा बाजार समित्यांपैकी बीड बाजार समिती वगळता इतर सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष पाहायला मिळत आहे. परळीमध्ये मात्र पुन्हा एकदा पंकजा मुंडे समर्थक विरुद्ध धनंजय मुंडे समर्थक असा मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळं या परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूनं लागणार हे पाहणं महत्वाचं टरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: