Nashik Chhagan Bhujbal : उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी देखील गंभीर आरोप केले आहेत. यावेळी छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सुहास कांदे यांना प्रत्युत्तर देत सुहास कांदे माझ्यासाठी पक्ष सोडला सांगतात, माझा काय सबंध आहे, यांनी माझ्यासाठी पक्ष सोडला, मग बाकीच्यांनी कोणासाठी सोडला? असा उलट प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा पार पडली. यावेळी सुरवातीलाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (Shivsena) आमदार सुहास कांदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावर लागलीच सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर देत म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नार्कोटेस्ट (Narco Test) करा म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतले हे कळेल. त्याचबरोबर कांदे यांनी भुजबळांवर देखील धारेवर धरले. यावर भुजबळांनी कांदे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, सुहास कांदे यांच्यावर चर्चा करणार नाही, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे आहेत. सुहास कांदे माझ्यासाठी पक्ष सोडल्याचे सांगतात, यात माझा काय सबंध आहे. कांदे यांनी माझ्यासाठी सोडला, मग बाकीच्यांनी कोणासाठी सोडला? हे 40 लोक गेले, संपूर्ण देशाला माहिती आहेत. महाविकास आघाडीच्या सभा होत आहेत, लोकशाही विरोधात काम चालू आहे. सत्तेतील लोकांना बाहेर काढावे, यासाठी सभा होणार असून निवडणूक जवळ येत आहेत, राहिलेले दीड वर्ष निघून जाईल, उद्या निवडणूक घ्या, आम्ही तयार आहोत, त्यांच्या मागे महाशक्ती असल्याने त्यांनी आव्हान स्वीकारले पाहिजे, असे आवाहन देखील भुजबळ यांनी केले.
सावरकरांविषयी महाराष्ट्राला प्रेम, ठाकरे गटाची भूमिका योग्यच : छगन भुजबळ
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सभेविषयी भुजबळ म्हणाले की, मालेगांवची सभा उत्स्फूर्त होती, प्रतिसाद प्रचंड होता, शिंदेंच्या विरोधात लोक बोलत होते. यशस्वी सभा झाली. तर उद्धव ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणार नाही, म्हणत राहुल गांधी यांचे कान टोचले. यावर भुजबळ म्हणाले की, सावरकर यांची नाशिक जन्म भूमी आहे. सावरकर यांच्याविषयी प्रेम आहे, सावरकर यांच्यांबाबत बोलू नका हे सांगितले. राहुल गांधी यांना सहज शक्य आहे, दोघांना अडचण होणार नाही. उद्धव यांचे बोलणे चुकीचे नाही, महाशक्ती विरोधात लढताना छोट्या गोष्टी टाळल्या, तर मोठा जनसमुदाय आपल्यासोबत येऊ शकतो. एकत्र लढूया, लोकशाही अस्ताला जात असल्याने देशभरात लढू, राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई चुकीचे आहे. प्रत्येकाचे तोंड कुठल्या ना कुठल्या प्रकारे बंद करण्याचे काम सुरू आहे, कुटुंबियांना त्रास देतात, याला लोकशाही कशी म्हणणार?
पर्यावरणाला धक्का न लावता उद्योग करा...
दरम्यान नाशिकमधील पांजरपोळ जागेवरून पर्यावरण प्रेमी आणि राजकीय नेत्यांमध्ये वाद सुरु आहे. यावर भुजबळ म्हणाले की, पर्यावरणाला धक्का न लावता उद्योग करा. पर्यावरण, वन पर्यटन वाढीसाठी, आयटीला चालना देण्यासाठी काही उद्योग येत असतील तर ते करायला हरकत नाही. मात्र धूर फेकणारे कारखाने नाशिकजवळ येऊ देणार नाही, असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.
सुहास कांदे काय म्हणाले....
आम्ही हिंदुत्वासाठी सरकार बदललं. ज्या बाळासाहेबांना शिव्या दिल्यात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. मग आम्ही कोणाकडे पाहायचं? ज्यांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवली. ज्यांना आम्ही निवडणुकीत पराभूत केलं. त्यांच्यासोबत बसायचं आणि ज्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली, त्यांच्या विरोधात बसायचं, हे उद्धव ठाकरेंना कसं आवडलं, हे आम्हाला माहीत नाही. म्हणूनच आम्ही उद्धव ठाकरेंना सोडून गेलो."