Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) नामांतराच्या समर्थनार्थ आणि विरोधात अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने विभागीय आयुक्त कार्यालयात हरकतीचा अक्षरशः पाऊस पडतोय. दोन्ही बाजूने अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे. तर विभागीय आयुक्त कार्यालयात होणारी गर्दी पाहता पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज सकाळपासून लाखो अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहेत. 


नामांतराबाबत अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने विभागीय आयुक्त कार्यालयात मोठ्याप्रमाणावर विरोधात आणि समर्थनात अर्ज दाखल होत आहे.  दरम्यान सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने देखील आज विभागीय आयुक्त कार्यालयात नामांतराच्या समर्थनार्थ अर्ज दाखल करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वी सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या कार्यालयातून नामांतराच्या समर्थनार्थ भरलेले दीड लाख अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यासाठी कार्यकर्ते घेऊन निघाले आहेत. समर्थनार्थ भरलेले दीड लाख अर्ज वेगवेगळ्या तीन गाड्यामधून घेऊन जाणार असल्याची माहिती सकल हिंदू एकत्रीकरण समितीचे राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे.  यासाठी एक-एक हजारचे वेगवेगळे गठ्ठे तयार करण्यात आले असून, ज्यात एकूण दीड लाख लाख अर्ज असल्याची माहिती देखील जंजाळ यांनी दिली आहे. 


विभागीय आयुक्त कार्यालयात हे सर्व दीड लाख अर्ज आज दाखल करण्यात येत असून, सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने हे सर्व अर्ज भरून घेण्यात आहे.  तसेच अजूनही नामांतराच्या समर्थनार्थ भरलेले अर्ज दाखल होत आहे.  ते देखील आजच्या आज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती जंजाळ यांनी दिली आहे. विशेष म्हणजे आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नामांतराविरोधात आणि समर्थनार्थ भरलेले अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करता येणार आहे. 


भाजपकडून दीड लाख अर्ज भरण्यात आले... 


औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले असून, याच नामांतराच्या समर्थनार्थ भाजपकडून देखील अर्ज भरण्यात आले आहेत. भाजपच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकारी यांनी विशेषमोहीम राबवून तब्बल दीड लाख नामांतराच्या समर्थनार्थ अर्ज भरून घेतले असल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. तर भरलेले हे सर्व दीड लाख अर्ज घेऊन भाजपचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी स्वतः अतुल सावे यांनी आपल्या डोक्यावर अर्जाचा भरलेला बॉक्स घेऊन तो विभागीय आयुक्त कार्यालयातील आवक-जावक विभागात जमा केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar: नामांतराविरोधात आक्षेप दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस, गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त