Nitesh Rane on Rahul Kanal IT Raid : यशवंत जाधव यांच्यापाठोपाठ शिवसेनेच्या (shivsena) दुसऱ्या नेत्याच्या घरी आयकर विभागानं धाडी टाकल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकरची छापेमारी करण्यात आली आहे. कनाल यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली असून विरोधी पक्षातून तसेच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रश्न उपस्थित करत राहुल कनाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत.  काय म्हणाले नितेश राणे?


मुंबईतील नाईट लाईफ गॅंगचा सदस्य


राहुल कनाल हा मुंबईतील नाईट लाईफ गॅंगचा सदस्य असून कॅफे बांदरा नावाचा तो एक रेस्टॉरंट चालवतो. पण त्याठिकाणी अनधिकृत व्यवहार सुरू असतात. कोरोना काळात कोवीड सेंटर निघाले. यामध्ये देखील त्याचा हस्तक्षेप आहे. राहूल कनाल यांना थेट शिर्डी संस्थानचे विश्वस्त म्हणूनच का पाठवलं? कोण आहे त्याच्यामागे? त्याच्यावर एवढी कृपादृष्टी कशासाठी? १२ आमदारांच्या यादीत देखील राहुल कनालचे नावही सुचवले होते,. राहूल कनालकडे एवढा पैसा आला कुठून? यावर योग्य तपास झाला पाहिजे.  असे नितेश राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 


आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय


पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय तसेच शिर्डी संस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहे. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी सुरु आहे. आज आयकर विभागानं मुंबईत आणि पुण्यात छापेमारी सुरु केली आहे. आयकर विभागाचं एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी आलं आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की, नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. तसेच हे धाडसत्रं किती दिवस चालेल याचीही काही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, ही छापेमारी कोणत्या प्रकरणाशी निगडीत आहे, हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राहुल कनाल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयकर विभागानं काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. जवळपास चार दिवस हे धाडसत्र सुरु होतं. अशातच आता शिवसेनेच्या आणखी एका नेता आयकर विभागाच्या रडारवर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेत्याच्या घरी आयकर विभागानं धाड मारल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 


कोण आहेत राहुल कनाल?