Sanjay Raut Press Conferance : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पत्रकार परिषद घेणार आहेत. आज दुपारी 4 वाजता शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan) ही पत्रकार परिषद होणार आहे. याआधीही संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोप केला होता. तसेच, भाजप नेत्यांकडून केंद्रीय यंत्रणांचा होणाऱ्या गैरवापरावरही संजय राऊतांनी बोट ठेवलं होतं. मागच्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि नील सोमय्यांना (Neil Somaiya) तुरुंगात टाकणार असल्याचंही राऊत म्हणाले होते. तसेच मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावरही राऊतांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वतः ट्वीट करुन पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली. याआधी राऊतांनी 15 फेब्रुवारीला शिवसेना भवनात दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत भाजपसह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या निशाण्यावर भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या होते. तसेच, पत्रकार परिषदेनंतर जेव्हा-जेव्हा संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला, त्या-त्या वेळी त्यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. एवढंच नाहीतर, लवकरच हे पिता-पुत्र तुरुंगात जाणार असल्याचा दावाही संजय राऊतांनी वारंवार केला आहे. त्यामुळं आता आज ते कोणता बॉम्ब फोडणार? कोणते नेते त्यांच्या निशाण्यावर असणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 


संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं छापा टाकला होता. हा छापा जवळपास चार दिवस सुरु होता. त्यामुळं केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या कारवायांवर संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचं पितळ उघडं करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. 


केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना


गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत. एवढंच नाहीतर काही नेत्यांवरही केंद्रीय यंत्रणांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 


माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या ताब्यात असून सीबीआयकडूनही त्यांची चौकशी सुरु आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनाही ईडीनं ताब्यात घेतलं असून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यापूर्वी शिनसेना नेते प्रताप सरनाईक आणि आमदार अर्जुन खोतकर यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली होती. याव्यतिरिक्त अनिल परब, संजय राऊत, किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकर यांसारख्या मोठ्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा लागल्या आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरीही तपास यंत्रणांचं धाडसत्र सुरु होतं. त्यामुळे आता राऊत आजच्या पत्रकार परिषदेत कोणता खुलासा करणार? कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :