Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा विशेष दीक्षांत समारंभ आज पार पडला. सुप्रसिद्ध तबला वादक पद्मभूषण झाकीर हुसेन (zakir hussain) यांना एल.एल.डी. व उद्योजक शशिकांत गरवारे (shashikant garware) यांना डी.लिट. ही मानद पदवी आज विशेष दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशिकांत गरवारे यांना या समारंभात प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही. त्यांच्या वतीने त्यांच्या मुलीने मानद पदवी स्वीकारली. दीक्षांत समारंभामध्ये राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मान्यवरांना पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान चर्चेचा विषय ठरला म्हणजे उदय सामंत आणि राज्यपाल यांच्या राजकीय कोपरखळ्या..! दोघांनी आपल्या खास शब्दशैलीत चिमटे काढले आहेत.
मंत्री उदय सामंत म्हणाले...राज्यपाल महोदय असताना मी येतो की नाही...
राज्यपाल महोदय असताना मी येतो की नाही, असा कुलगुरूंना वाटत होते, पण शिक्षण क्षेत्र पुढे नेण्यासाठी राज्यपालांच्या नेतृत्वाखाली सदैव मी काम करायला तयार आहे. एक कार्यकर्ता म्हणून मी काम करायला तयार आहे, त्यामुळे राज्यपाल असतील तेंव्हा उदय सामंत कार्यक्रमला येतील. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रासाठी एक कोटींची तरतूद करून कोनशिलेचे उद्घाटन करून दिड वर्ष उलटली, मात्र तिथे अद्यापही काम सुरू झालेले नाही, त्यामुळे तातडीने हे काम सुरू व्हावं यासाठी आपण एकत्र येऊन काम करू असे उदय सामंत आपल्या भाषणात म्हणाले.
राज्यपालांच्या नेतृत्वाखाली शैक्षणीक दृष्टिकोनात महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे
मंत्री उदय सामंत म्हणाले, विद्यापीठाच्या लोकांच्या मनामध्ये अशी शंका असेल, ज्या ठिकाणी राज्यपाल येतात तिथे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री येणार नाहीत, त्यामुळे आजच्या उपस्थितीमध्ये कुलगुरू प्र-कुलगुरू यांच्या मनातील गैरसमज दूर झाला असेल. राज्यपालांच्या नेतृत्वाखाली आम्हाला शैक्षणीक दृष्टिकोनात महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. राज्यपालांनी यांच्या भाषा मध्ये काय मत मांडलं त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही. राज्यपालांचा आदर ठेवून मी काही सूचना केल्या आहेत.
राज्यपाल फक्त नावाला असतो, बाकी सगळं काम सरकार, मंत्री करतात
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, राजनीती मध्ये आलेला प्रत्येकाला वाटतं की मी सगळ्यांच्या पुढे जाऊ आणि बाकी सगळे मागे राहावं, मात्र, शिक्षक यांचं तसं नसतं, त्यांना वाटतं आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा, पुढे जावं, निष्ठा, नियमांचे पालन, शिस्तमुळे आपली प्रतिभा विकसित केली जाऊ शकते. राज्यपालांचा काम, रोल तर मर्यादित असतो. राज्यपाल फक्त नावाला असतो, बाकी सगळं काम सरकार, मंत्री करतात. ते काम करताय, महाविद्यालय उभं करताय त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत अजून ताकदीने ते काम करतील असे सांगत राज्यपालांनी उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या.
कुलगुरू निवड प्रक्रिया- राज्यपालांची भेट घेणार
उदय सामंत म्हणाले, आम्हाला नव्या कायद्यानुसारच कुलगुरूंच्या निवडप्रक्रिया करायच्या आहेत. याबाबत मी राज्यपालांची भेट घेणार आहे. अनेक विद्यापीठांचे कुलगुरु नेमण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आता नव्या कायद्यानुसार हे कुलगुरू या निवडीची प्रक्रिया व्हावी अशी इच्छा आमची आहे त्यामुळे मी राज्यपालांची भेट घेणार
ऑफलाइन परीक्षा
ऑफलाइन परीक्षा संदर्भात विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांमध्ये काही संभ्रम आहेत. मी सांगितले आहे की, शेवटच्या वर्षाच्या परीक्षा या लवकरात लवकर व्हायला हव्यात आणि इतरच्या परीक्षा येत्या 15 जुलैपर्यंत पूर्ण व्हाव्यात. असे सामंत म्हणाले
लता दीदी असताना महाविद्यालय सुरू करू शकलो नाही
कलिना कॅम्पस समोर उच्च शिक्षण विभागाच्या जागेवर 28 सप्टेंबरला लता दीदीच्या जयंतीच्या दिवशी भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय देशातलं पहिलं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू होईल, हे मी आश्वस्त करतो, आम्हाला दुःख वाटत की, आम्ही हे महाविद्यालय लता मंगेशकर असताना सुरू करू शकलो नाही. असं सांगत उदय सामंत यांनी खंत व्यक्त केली आहे.