सातारा : साताऱ्यातील माणचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मायणी इथल्या छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी संस्थेची आणि सदस्यांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार जयकुमार गोरे हेच या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासह संस्थेच्या सचिव आणि आमदार पत्नी सोनिया गोरे, अरुण गोरे, शैलजा साळुंखे, स्मिता कदम आणि महम्मद खान या सहा जणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडूज पोलिसांनी स्मिता कदम यांना अटक केली आहे. आप्पासाहेब देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ही संस्था आणि यातील प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर संबंधितांनी पहिली बॉडी बरखास्त करत धर्मदाय आयुक्त कार्यालयात जमीन मिळकतीच्या अनुषंगाने पीटीआर उतारे मिळवण्यासाठी कागदपत्रे सादर केले. या कागदपत्रांमध्ये स्थानिक दैनिकात जाहिरात दिल्याची खोटी प्रतही धर्मदाय आयुक्त कार्यालयास सादर केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीच्या आधारावर आमदार जयकुमार गोरे यांच्यासह सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


आमदार जयकुमार गोरे यांच्यावर याआधी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या नावे खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या गुन्ह्यात सातारा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून त्यावरील पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे.


भाजप आमदार जयकुमार गोरेंची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव, मृत व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रं तयार केल्याचा आरोप


मायणी गावातील एका जमिनीसंदर्भात बोगस कागदपत्रं तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (विरळी), महेश पोपट बोराटे (बिदाल) यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात एका तलाठ्याचाही समावेश असून तो फरार आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली आहे. 


यापूर्वी या गुन्ह्यामध्ये संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. दरम्यान याप्रकरणी जयकुमार गोरे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी वडूज सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळल्यानंतर गोरे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली आहे.