Buldhana News Latest Updates : बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचा एक व्हिडीओ सध्या जिल्ह्यात जोरदार व्हायरल (MP Prataprao Jadhav Video Viral) होत आहे. यामुळे मात्र प्रतापराव अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोनगाव येथे एका कार्यकर्त्यांच्या घरी ईद निमित्त शिरखुर्माचा आस्वाद घेताना गप्पांच्या ओघात खासदारांनी 'अंदर की बात' सांगितली खरी पण त्याठिकाणी बसलेल्या एकाने हा व्हिडीओ तयार केला. मेहकर तालुक्यातील डोनगाव येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत संख्याबळ नसताना शिवसेनेचा सरपंच कसा झाला? असा प्रश्न अनेकांना पडला होता. याचे उत्तर आता खुद्द प्रतापराव जाधवांनी दिलं असून एक सदस्य कमी पडत असताना माजी मंत्री सुबोध सावजी यांचे चिरंजीव व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांना चार लाख रुपये देऊन एक सदस्य दिल्याचं या व्हिडीओत खासदार प्रतापराव जाधव हे तिथं बसलेल्या कार्यकर्त्यांना सांगत असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओचं आता जिल्ह्यात अनेकांनी स्टेटस ठेवल्याचं दिसून येत आहे.



व्हिडीओतील संभाषणात काय आहे


बाजूचा कार्यकर्ता - मेंबरला नाही भेटले का मंग पैसे. 


प्रतापराव - नाही नाही....मेंबरला नाही भेटले. शैलेशनं घेतले. अन् त्यानं एक माणूस इकडं बोलावून घेतला. उपसरपंचाचे त्यांचे त्यांचे कायम रहायले. 


बाजूचा कार्यकर्ता - सरपंचाकडून भेटले वाटतं त्याइले पैसे....?


प्रतापराव - हं. चार लाख रु. (बारीक आवाजात ) येरही. सरपंच त्याईला आखाड्याचा होऊ द्यायचा नव्हता त्याइले. त्यामुळं पैसे घेतले.


दुसरा कार्यकर्ता - यात आपला फायदा झाला....


(बराच वेळ इतर चर्चा..........)


एक कार्यकर्ता - आपलं त जमा सारखा विषयच नव्हता नं. खरं त त्या काळे बाईनं ऑब्जेक्शन घेतलं न. त्याचा बदला घेतला त्याईनं...!


एकच हशा. 


29 एप्रिल रोजी डोनगाव सरपंच पदाची निवडणूक झाली होती. 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे 09 , शिवसेनेचे 08 सदस्य होते. त्यामुळे शिवसेनेचा सरपंच होणार नाही हे निश्चित होतं. असं असताना गुप्त मतदानात अनपेक्षित निकाल लागल्याने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा एक सदस्य फितूर झाल्याचं उघड झालं आणि शिवसेनेच्या रेखा पांडव या सरपंचपदी निवडून आल्या आहेत.


सावजींनाच आखाडे गटाचा सरपंच होऊन द्यायचा नव्हता -खासदार प्रतापराव जाधव 


खासदार प्रतापराव जाधव यांनी याबाबत बोलताना म्हटलं आहे की,  डोनगाव ग्रामपंचायत जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. मागच्या वेळी यंदा सरपंचपदाच्या निवडणुकीत 17 सदस्यांपैकी 9 सदस्य सावजी गटाचे असताना त्यांना 8 मतं मिळाली. एक मत कमी झालं म्हणून सुबोध सावजी यांनी हिंदू सदस्यांना हनुमानाचा शेंदूर काढायला लावला तर मुस्लिम सदस्यांना कुराणाची शपथ दिली आणि दलित सदस्यांना डॉ बाबासाहेबांची शपथ दिली. काही लोकांना त्यांनी भारलेले तांदूळ खायला लावले. या निवडणुकीत आखाडे गटाचे पाच आणि सावजी गटाचे चार असे 9 सदस्य त्यांचे होते. तर शिवसेनेचे 8 सदस्य होते. तरीही शिवसेनेला 9 मतं मिळून सरपंचपद शिवसेनेला मिळाले. सावजी आणि आखाडे गटाचे वैर आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळं त्यांना आखाडे गटाचा सरपंच होऊन द्यायचा नव्हता. त्यामुळं त्यांनीच एक सदस्य फोडला. उपसरपंच मात्र त्यांच्या गटाचा झाला, त्याला 9 मतं मिळाली. आखाडे गटाला सरपंचपद मिळू द्यायचं नाही म्हणून त्यांनी ही खेळी केली. ही चर्चा सुरु असताना कुणीतरी तो व्हिडीओ काढला आणि व्हायरल केला, असं खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. 


काय म्हणाले शैलेश सावजी


खा.प्रतापराव जाधव यांनी ज्यांच्यावर चार लाख रुपये घेण्याचे आरोप केले ते काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी प्रतापराव जाधव यांना आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे. डोनगाव येथील विठ्ठल मंदिरात येऊन हेच आरोप पुन्हा करण्याचं आव्हान दिले आहे.  आज शैलेश सावजी हे 11 वाजता या मंदिरात प्रतापराव जाधव यांची वाट बघणार आहेत. या संदर्भात त्यांनी खासदार जाधव यांना मेसेज देखील केला आहे.