Sameer Wankhede : शाहरुखच्या पोराला अडकवायला गेले आणि स्वत:च अडकले; CBI नंतर आता ED कडून समीर वानखेडेंना तगडा झटका
Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होताना दिसत असून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ED case On Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या (Sameer Wankhede) अडचणीत वाढ होताना दिसत असून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांच्या विरुद्ध 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट' (PMLA Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर, ईडीने काही लोकांना समन्स देखील पाठवले आहेत, ज्यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी होणार आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले. यानंतर ते लाच प्रकरणात अडकले. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काही लोकांची चौकशीही केली आहे. ज्यांना समन्स पाठवण्यात आले आहेत, त्यापैकी काही एनसीबीशी संबंधित आहेत. याशिवाय काही खासगी लोकांचाही समावेश असून, त्यांची चौकशी केली जाणार आहे. तपास यंत्रणेने या सर्वांना चौकशीसाठी मुंबईतील ईडी कार्यालयात बोलावले आहे.
नार्कोटिक्स एनसीबीच्या 3 अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले
ईडीने आज समीर वानखेडेविरोधात गुन्हा दाखल करत मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी नार्कोटिक्स एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अभिनेता शाहरुख खानने मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात सीबीआयच्या पहिल्या एफआयआरच्या साहाय्याने ईडीने वानखेडेविरोधात गुन्हा दाखल केला होता. समीर वानखेडे यांना सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळताच त्यांनी प्रथम उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आपल्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, अशी विनंती केली. सीबीआयच्या खटल्यातील दंडात्मक कारवाईतून उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता.
आर्यन खान प्रकरण काय आहे?
समीर वानखेडे हे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आले होते. एनसीबीनं 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीनं या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.
एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी आर्यन खानची निर्दोष सुटका झाली. दरम्यान समीर वानखेडे यांच्या तपास प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. भ्रष्टाचारासह त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करत त्यांची चौकशी सुरू केली होती. ज्यानंतर एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटीने गेल्या वर्षी 27 मे 2023 रोजी आर्यन खानला क्लीन चिट देत सांगितले होते की, वानखेडेंनी आरोप केल्यानुसार आर्यन कोणत्याही मोठ्या ड्रग डीलिंग रॅकेटचा भाग नाही.