Maharashtra Breaking News 4 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Aug 2022 10:14 PM
छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूटला एनआयएने केली अटक

डी गँगशी संबंध असल्याने सलीम फ्रूटला अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी एनआयएने अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. एनआयएने काही महिन्यांपूर्वी डी कंपनीशी संबंध असल्याप्रकरणी आरिफ भाईजान आणि त्याचा भाऊ शब्बीर या दोघांना अटक केली होती.

जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सुप्रीम कोर्टाच्या सुणावणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुणावणीबाबत ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. घटनात्मक पेचाबद्दल मुख्यमंत्री उज्वल निकम यांचे मार्गदर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री आजारी असल्यानं आज नंदनवन बंगल्यातच त्यांचा मुक्काम असणार आहे. आज आमदारांच्या गाठीभेटी आणि शासकीय बैठका केल्या होत्या. 

Cabinet Expansion : उद्या होणारा राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर, सूत्रांची माहिती

Maharashtra Political Crisis : उद्या होणारा राज्य मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


 



लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस, नदीला पूर आल्याने सावरगाव तेली गावचा संपर्क तुटला 

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला आहे. सावरगाव तेली या गाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या गावाचा संपर्क गेल्या दोन तासांपासून तुटलेला आहे. यामुळे शेतात काम करणारे मजूर व शाळेतील विद्यार्थी पुलावर अडकून पडले होते. सावरगाव तेली येथील पूल लहान असल्याने अनेकदा हा पूल पाण्याखाली गेलेला आहे. अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी गावकरी करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत पूल झालेला नाही.



मंत्रिमंडळ विस्तारासाठी मोर्चे काढावे लागतील : सतेज पाटील 

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जी खाती मागत आहेत ती भाजपाला द्यायची नाहीत. त्यामुळे काँग्रेस किंवा इतर पक्षातील आमदार फुटणार आहेत, असं सांगून एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप  काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलाय. साताऱ्यात  झालेल्या पत्रकार परिषादेत ते बोलत होते.  


मंत्रिमंडळ आणण्यासाठी मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. एकीकडे अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी पाऊस नाही. अशा परिस्थितीत दोघांकडून सरकार चालवणे योग्य नाही. सध्या तारीख पे तारीख सुरू आहे. त्यात कोर्ट काय निर्णय देते आहे त्याची काळजी असावी. शिवाय कोणाला कोणती  खाती द्यायची यावरून वाद असू शकतो. शिंदे गटात पहिल्यांदा आलेल्या 20 आमदारांना मंत्री पदे द्यायची की नंतर आलेल्या 20 जणांना यावर देखील वाद सुरू असू शकतो. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होत नसेल, असे सतेज पाटील म्हणाले. 

 उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शिवसैनिकांना अटकपूर्व जामीन मंजूर

शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे आणि शिवसेना पुणे शहरप्रमुख  गजानन थरकुडे यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

Nagpur SBI : एटीएममधून पैसे चोरणाऱ्या एका आरोपीला अटक

नागपूरः वर्धा रोडवरील रामदासपेठमधील स्टेट बँकेच्या एटीएममधून सुमारे सहा लाखांची रोकड चोरी करणाऱ्यांपैकी एका आरोपीला पोलीसांच्या एटीएस पथकाने अटक केली आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पुण्यात तक्रार 

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही तक्रार करण्यात आली आहे. पुण्यात उदय सामंत यांच्यावर जो हल्ला करण्यात आला होता तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी काल केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पडळकरांविरोधात तक्रार केली. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक गळ्यात भगवा घालून शिवसेनेच्या नावाने घोषणा देत आहेत. उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यात शिवसैनिक नव्हते तर  ते राष्ट्रवादीचे लोक आहेत, असे पडळकर यांनी म्हटले होते.  

Nashik Rain : नाशिक शहरात पावसाचे जोरदार कमबॅक, नागरिकांची धावपळ

Nashik Rain : गेल्या दोन दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने आज सायंकाळी नाशिक शहरात जोरदार हजेरी लावली. यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. 

Varsha Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून पुन्हा समन्स

Varsha Raut Summoned : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे.  

वर्षा बंगल्यावर शिंदेंच्या नावाची पाटी लागली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर राहायला जाणार? 

वर्षा बंगल्यावर अखेर एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर लवकरच राहायला जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.   


एकनाथ शिंदे 2014  पासून मलबार येथील नंदनवन या शासकीय निवासस्थानातून आपला कारभार चालवत आहेत. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे वर्षा या निवासस्थानी राहायला जाणार का? असा सवाल विचारला जातोय कारण अखेर एक महिन्यानंतर वर्षा निवासस्थानाला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावली गेलीय. तसेच वर्षा बंगल्याची रंगरंगोटी देखील पूर्ण झाली आहे. 

सावंतवाडीजवळ कारीवडे-उभागुंडा येथे एसटी बस आणि कंटेनर यांच्यात अपघात, अनेक विद्यार्थी जमखी, काही काळ वाहतूक ठप्प

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी कोल्हापूर मार्गावर कारीवडे-उभागुंडा येथे एसटी बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात एसटीतील काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात कारीवडे-उभागुंडा परिसरात घडला. अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्यातच असल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यात दोन्ही गाड्याचे नुकसान झाले असून बस सावंतवाडी ते बावळाट अस प्रवास करीत होती. यावेळी समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनरने समोरुन धडक दिली. त्यामुळे काही विद्यार्थी आणि वयोवृद्ध प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती; पक्षश्रेष्ठींसोबत करणार चर्चा

Maharashtra Politics:  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत फडणवीस चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे 

संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, 8 ऑगस्टपर्यंत पुन्हा ईडी कोठडी

मला जिथे ठेवलंय तिथे व्हेन्टिलेशन नाही, हृदयविकाराचा त्रास असल्यानं श्वास घेण्यास मला त्रास होतोय, राऊतांची कोर्टाकडे तक्रार

Sanjay Raut : संजय राऊतांना घेऊन ईडीचे अधिकारी कोर्टाकडे रवाना

Sanjay Raut : सुनावणीसाठी जाताना संजय राऊतांची ईडी अधिकाऱ्यांशी बाचाबाची

Sanjay Raut : संजय राऊत यांना विशेष न्यायालयानं सुनावलेली 4 दिवसांची ईडी कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे. न्यायालयात हजर करण्यासाठी ईडी अधिकाऱ्यांसोबत जाण्यापूर्वी संजय राऊतांची ईडी अधिकाऱ्यासोबत बाचाबाची झाली. संजय राऊत गाडीत बसण्यापूर्वी त्यांचे बंधू सुनिल राऊत, जावई आणि इतर काही लोकांशी हात मिळवत होते. त्यानंतर ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं, यावरुन त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहे. 

Sanjay Raut : संजय राऊतांची ईडी कोठडी आज संपणार, थोड्याच वेळात विशेष न्यायालयात सुनावणी

गोंदियात जमिनीच्या वादातून भावकीत झालेल्या भांडणात कुऱ्हाडीने हल्ला; तीन जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Gondia News : जमिनीच्या वादातून भावकीत झालेल्या भांडणा कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना गोंदिया तालुक्यात घडली. यामध्ये तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. आता याच मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गोंदिया तालुक्यातील तुमखेडा इथला असून नागपुरे कुटुंबात झालेल्या शेत जमिनीच्या वादादरम्यानचा असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर या घटनेत एक जण गंभीर जखमी असल्याचे समोर आलं आहे.


 

 
लोकमान्य टिळकांचे रत्नागिरीतील जन्मस्थळ काल्पनिक, अभिनेते शरद पोंक्षे यांचा दावा; टिळकांच्या जन्मस्थळावरुन नवा वाद होण्याची शक्यता
Ratnagiri News : राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक यांचा जन्म दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे झाला. मात्र रत्नागिरी शहरातील ज्या घरात लोकमान्य टिळकांचा जन्म झाला असे सांगण्यात येते ते ठिकाण काल्पनिक असल्याचा दावा सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला आहे. तालुक्यातील चिखलगाव येथील लोकसाधनेच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यामुळे आता लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळावरुन नवा वाद होण्याची शक्यता आहे. 
उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचं शिष्टमंडळ पोलीस महासंचालकांची भेट घेणार, शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याचा दावा

Mumbai News : माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात झालेल्या हल्ल्यात शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. या प्रकरणी शिवसेनेचे शिष्टमंडळ आज दहा वाजता राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेणार आहे. यावेळी नीलम गोऱ्हे, अरविंद सावंत, सचिन अहिर, वरुण सरदेसाई उपस्थित असणार आहेत.

औरंगाबाद घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

Aurangabad News : औरंगाबाद घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. डॉक्टरला मारहाण झाल्याने 350 डॉक्टर संपावर गेले होते. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने आणि घाटी प्रशासनाने यापुढे हल्ले होऊ नयेत म्हणून सकारात्मक पाऊल उचलल्याने संप मागे घेण्यात आला. घाटीची रुग्ण सेवा आजपासून पूर्ववत झाली आहे.

चंद्रपुरात काल दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात काल (3 ऑगस्ट) दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून दोन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. भद्रावती तालुक्यातील चिचोर्डी शेतशिवारात वीज पडून काशीनाथ चालखुरे (वय 55 वर्षे) या गुराख्याचा मृत्यू तर विकास डाखरे (वय 30 वर्षे) हा जखमी झाला. तर जिवती तालुक्यातील शेडवाही येथे अनिल सोयाम या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.

बुलढाण्यात अकरावीच्या प्रवेशासाठी दहा हजारांची लाच स्वीकारली, लाचखोर मुख्याध्यापकासह चार कर्मचाऱ्यांना एसीबीकडून अटक

Buldhana News : भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुलढाणा येथील इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश देण्याकरता विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकासह चार जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलं असून या चौघांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी (3 ऑगस्ट) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भारत विद्यालय बुलढाणा इथे ही कारवाई करण्यात आली. प्रल्हाद धोंडू गायकवाड-मुख्याध्यापक, गजानन सुखदेव मोरे-वसतिगृह कार्यवाहक, जितेंद्र प्रल्हाद हिवाळे-मजूर, राहुल विष्णू जाधव-लेखापाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तक्रारदाराच्या मुलाला अकरावीत प्रवेश देण्यासाठी मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांच्या वतीने वसतिगृह कार्यवाहक गजानन मोरे याने पंधरा हजाराच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती दहा हजारात सौदा पक्का केला. आरोपी जितेंद्र प्रल्हाद हिवाळे याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रवृत्त केले तर आरोपी लेखापाल राहुल विष्णू जाधव याने मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरुन तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच स्वीकारली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चारही आरोपींना रंगेहाथ अटक केली. दरम्यान भारत विद्यालय हे अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असतं आणि त्यामुळे हे एक षडयंत्र असल्याचं भारत विद्यालयाचे उपाध्यक्ष उदय देशपांडे यांनी म्हटलं आहे.

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर महत्वाची सुनावणी


राज्यातील सत्तासंघर्षावर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असताल त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद झाला. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून वारंवार बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा पुढे केला. तर शिंदे गटाने वारंवार आपण अद्यापही पक्षातच असून सदस्यत्व सोडलं नसल्याचा दावा केला. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने यावेळी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांना लेखी युक्तिवाद नव्याने तयार करण्यास सांगत आज म्हणजेच गुरुवारी सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं. शिंदे सरकार आणि विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटिसीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज एकत्रित सुनावणी होणार होणार आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं.


संजय राऊतांची कोठडी आज संपणार, आज पुन्हा कोर्टात सुनावणी


ईडीच्या अटकेत असलेल्या खासदार संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली होती, पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलंय, आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा सवाल उपस्थित केला. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. 


पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा संबंध असून प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला. प्रवीण राऊत फक्त मोहरा होता, खरे सूत्रधार संजय राऊत हेच होते, आमच्याकडे याचे पुरावे आहेत असा दावा ईडीने केला आहे. तसेच राऊतांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. संजय राऊत यांना जर बेल मिळाली तर ते पुन्हा धमकाविण्याचं किंवा त्यापुढे जाऊन कृत्य करु शकतात, तसेच राऊत यांचे परदेश दौरे बिझनेसमन आणि विविध लोकांकडून पुरस्कृत केले जातात, याचं नेमकं कारण काय? असा सवाल करत प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत होते, ते कशासाठी? असा सवालही ईडीने उपस्थित केला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.