Maharashtra Breaking News LIVE Updates : शरद पवारांवर आरोप करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Apr 2022 10:36 PM
Pune News Update : अंत्यसंस्कार करताना डिझेलचा भडका उडाला, 11 जण भाजले

पुण्यातील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना मृतदेहावर डिझेल टाकत असतानाच अचानक भडका उडून हातातील कॅनही उडाली. त्यामुळे जवळ असलेले 11 जण भाजले आहेत. ही घटना आज0 सायंकाळी साडेसहा वाजता घडली. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. 

Akola : अकोल्यात आज 45.5 तापमानाची नोंद

Akola : अकोल्यात आज 45.5 तापमानाची नोंद झाली आहे. 

चंद्रपूर : आज चंद्रपुर चे तापमान 46.6

चंद्रपूर जिल्ह्यात आज नोंदवलेले तापमान हे गेल्या 100 वर्षात एप्रिल महिन्यात नोंदविले गेलेले सर्वाधिक तापमान आहे. आज 46.6 तापमान नोंदविण्यात आले आहे. 

बुलढाणा : गुरांच्या गोठ्याला भीषण आग

दिवसेंदिवस आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत, कडक तापमान असल्याने आगी लागत आहे.मेहकर तालुक्यातील भोसा येथील  शेतकरी प्रभाकर व नितीन खुरद यांच्या गुरांच्या गोठ्याला आज आग लागून गोठ्यात बांधलेल्या सहा बैलांचा व दोन गाईंचा अक्षरशः जळून  कोळसा झाला आहे. यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे.

चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी वाहनासह सराईत चोराकडून सात दुचाकी केल्या जप्त

चंद्रपुरात सध्या अनेक वाहन चोरीच्या घटना घडत आहेत. रामनगर पोलिसांनी वाहनासह सराईत चोराकडून सात दुचाकी केल्या जप्त केल्या आहेत. शहराच्या विविध भागातून या वाहनांची चोरी करण्यात आली होती. 

अहमदनगर : अहमदनगर शहरात उद्यापासून पाच दिवस गर्दी न करण्याचं प्रशासनाचं आवाहन

उद्यापासून पाच दिवस अहमदनगर शहर आणि  जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं प्रशासनाने आवाहन केले आहे. रमजान ईद आणि अक्षयतृतीया या सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. 

मास्क बाबत फेरविचार करावा लागेल : अजित पवार

दिल्ली सारख्या भागात कोरोना डोकं वर काढत आहे. त्यामुळे मास्क बाबत फेरविचार करावा लागेल, असे अजित पवार म्हणाले. 

शरद पवारांवर आरोप करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली

Pune News : बहुजनांचा बुरखा पांघरुन एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसला आहे. पन्नास वर्षाचा त्याचा खेळ राज्यातील पोरांना ओळखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर आरोप करताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली. यावेळी पडळकरांनी पवारांचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख मात्र पवारांकडेच होता. पुण्याच्या कामशेतमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात ते बोलत होते. भाजप आणि आरपीआयने संयुक्तरित्या या महोत्सवाचे आयोजन केलं आहे. यावेळी आरपीआयसह राज्यातील विविध संघटना आणि चळवळी कोणी फोडल्या? असा प्रश्न त्यांनी विचारला. हे काम पन्नास वर्षांपासून बहुजनांचा बुरखा पांघरुन महाराष्ट्रात घुसलेल्या लांडग्याचं असल्याचं पडळकर सुचवत होते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखीन वाढ?राऊतांविरोधातील अवमान याचिकेत मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त तक्रार दाखल

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखीन वाढ?


"न्यायदेवतेच्या हातातील तराजू भंगारातून घेतला" असं विधान राऊत यांनी मीडियाशी बोलताना केल्याचा दावा 


राऊतांविरोधातील अवमान याचिकेत मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त तक्रार दाखल


न्यायालयीन व्यवस्थेबाबत राऊत यांनी पुन्हा अवमानकारक विधान केल्याचा वकिल संघटनेचा आरोप


इंडियन बार असोसिएशकडून अतिरिक्त प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी केलेल्या हल्ल्याप्रकरणी तीन एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी केलेल्या हल्ल्याप्रकरणी तीन एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर 


आरोपी संदीप गोडबोले, अजित मगरे आणि मनोज मुदलीयार यांच्याकडून जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज 


तिघांचेही जामीन सत्र न्यायालयाने मंजुर केले 


दुसरीकडे, ॲड. जयश्री पाटील यांना देखील अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाकडून मंजूर

Hingoli : हिंगोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांचा शिवसेनेत प्रवेश 

हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस मधील अंतर्गत वाद काही नवीन नाहीत मागील काही दिवसापासून काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे शिवसेनेत प्रवेश करणार ह्या चर्चा होत्या.  या चर्चांना आज कायमचा पूर्णविराम मिळाला आहे . संजय बोंढारे यांनी मुंबईमध्ये नगर विकास मंत्री एकनाथ शिदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे

सिल्व्हर ओक बंगल्यावर झालेलं आंदोलन,  गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांना मोठा दिलासा, मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

सिल्व्हर ओक बंगल्यावर झालेलं आंदोलन,   गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांना मोठा दिलासा,  मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

भोंग्यांवर पहिला आक्षेप बाळासाहेबांनी घेतला होता, हिंदुत्त्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही : मुख्यमंत्री

Mumbai News : हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही. भोंग्यांवर पहिला आक्षेप शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता. विरोधकांना कळले पाहिजे की, शिवसेना म्हणजे काय आणि शिवसेनेची ताकद काय असते ती. यांना मराठीबद्दल प्रेम नाही, हिंदुत्वाबद्दल प्रेम नाही, फक्त स्वतःवर प्रेम आहे. हे आपल्या कर्माने मरणार आहेत, बाकी काही करायची गरज नाही.

Osmanabas News : उस्मानाबादेतील पाथरूड परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचा ऊसतोड मजुरांवर हल्ला

 भूम तालुक्यातील पाथरूड येथील बागलवाडी तलाव परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याने ऊसतोड करणाऱ्या मजुरांवर हल्ला केला. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. पाथरूडच्या जालिंदर खुणे यांच्या शेतात उसाची तोडणी सुरू असताना ऊस तोडणी करत असलेल्या तीन पुरुष आणि एका महिलेसह चार मजुरांवर या बिबट्या सदृश्य प्राण्याने अचानकपणे जोरदार हल्ला चढवला. यामध्ये तीन पुरुष व एक महिला उसतोड मजुर गंभीर जखमा झाल्या आहेत. या जखमींना उपचारासाठी पाथरुड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते त्यानंतर प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, हिंदुत्वाला फुंकर घालण्याचं काम त्यांनी केलं : सदाभाऊ खोत
Ratnagiri News : शिवसेनेने जे कडवं हिंदुत्व धारण केलेलं होतं, ते मुख्यमंत्र्यांचं कडवं हिंदुत्व राहिलेलं नाही. मुख्यमंत्री आता हिरवा शालू पांघरलेल्यांच्या बरोबर त्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांचं हिंदुत्व नामोहरम झालेलं आहे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी आज राजापूरमधील तुळसवडे येथे केली आहे. दरम्यान राज ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भट्टीतून ते तयार झालेलं रसायन आहे. हिंदुत्वाला फुंकर घालण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं आहे, त्याच्या आता ज्वाला भडकलेल्या आहेत. या ज्वालांमध्ये कोण कोण भस्म होतं, हे भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल,असंही सदाभाऊ यावेळी म्हणाले. गेल्या लोकसभेमध्ये लाव रे तो व्हिडिओ असं म्हटलं की राष्ट्रवादीचे सगळे नेते हे माकडासारखे टाळ्या वाजवत होते, आणि आज तेच राज ठाकरे हिंदुत्वाची शाल पांघरुन हिंदुत्वाची भूमिका घेतल्याबरोबर स्टेजवरची टाळ्या वाजवणारी राष्ट्रवादीची माकडं रस्त्यावर उतरुन टाळ्या वाजवत फिरायला लागलेली आहेत. याच्या एवढी शोकांतिका या राजकारणामध्ये असू शकत नाही, अशीही टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.
Yavatmal News : एसटी बसच्या मद्यधुंद वाहकाचा धुमाकूळ

यवतमाळ बसस्थानकावर राजुरा अमरावती एसटी बसच्या मद्यधुंद वाहकाने चांगलाच धुमाकूळ घातला. राजुरा येथून या बस मध्ये बसलेले प्रवासी देखील या दारूच्या नशेत टूल्ल वाहकामुळे चांगलेच वैतागले. अक्षय बट्टे असे या वाहकाचे नाव असून तो एवढा दारू प्यायला होता की प्रवाशांना अव्वाच्या सव्वा रकमेचे तिकीट त्याने फाडून दिले. राजुरा ते अमरावती या प्रवासासाठी चक्क 800 रुपयांचे तिकीट त्याने फाडले. त्यानंतर कशाचेही भान नसलेला हा मद्यपी वाहक बसमध्ये खाली लोळला. अखेरीस यवतमाळमध्ये ही बस थेट अवधुतवाडी पोलीस ठाण्यात आणून वाहतूक नियंत्रकाने तक्रार दाखल केली, त्यानुसार गुन्हा दाखल झाला. मात्र त्याचा प्रवाश्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

Akola news : अकोला महिला सुधारगृहातील सात अल्पवयीन मुलींचं पलायन, खडकी भागातील सुधारगृहातील पहाटेच्या सुमारास घडला प्रकार

अकोला महिला सुधारगृहातील सात अल्पवयीन मुलींचं पलायन. अकोल्यातील खडकी भागातील सुधारगृहातील पहाटेच्या सुमारास घडला प्रकार. यापैकी दोन मुलींना अकोल्यातील खदान पोलिसांनी घेतलं ताब्यात. महिला सुधारगृह प्रशासनाकडून प्रकरण लपवण्याचा प्रयत्न.

नांदेड शहरातील वाजेगाव पोलीस चौकी जवळील भंगार गोडाऊनला भीषण आग, आगीत लाखों रुपयांचे भंगार जळून खाक.

नांदेड शहरातील वाजेगाव पोलीस चौकी जवळील भंगार गोडाऊनला भीषण आग, आगीत लाखों रुपयांचे भंगार जळून खाक. भंगार गोडाऊनला लागलेल्या आगीमुळे वाजेगाव परिसरातील काळ्या धुराचे लोट,भंगार गोडाऊनच्या आगीच्या धुराने प्रदूषण.  

शिवसेना संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांच्या बैठकीसाठी खासदार संजय राऊत, विनायक राऊत सेनाभवनात दाखल 

शिवसेना संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांच्या बैठकीसाठी खासदार संजय राऊत, विनायक राऊत सेनाभवनात दाखल 


बैठक 12 वाजता सुरू होणार आहे


शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे VC द्वारे मार्गदर्शन करणार

राजर्षि शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्ताने कोल्हापूरच्या शाहू मिलमध्ये दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

Kolhapur News : राजर्षि शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्ताने कोल्हापुरात कृतज्ञता पर्व सुरु आहे. याचाच एक भाग म्हणजे कोल्हापूरच्या शाहू मिलमध्ये शाहू महाराज यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शाहू महाराज यांच्या बालपणापासूनच सगळा काळ या चित्रांच्या माध्यमातून समोर आणला आहे.

सांगलीच्या पलूसमध्ये बैलगाडी भरकटून तिघांच्या अंगावर गेली, तिघे जखमी

Sangli News : सांगलीच्या पलूसमध्ये धोंडीराम महाराज यात्रेनिमित्त बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीमधील गाडीचा जु अचानक तुटला आणि गाडी भरकटली आणि तिघांच्या अंगावर गेली. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पलूस शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बैलगाडी शौकीन मोबाईलवर बैलगाडीचे व्हिडीओ घेण्यात मग्न होते. यावेळी हा अपघात झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांविरोधात हायकोर्टात याचिका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांविरोधात हायकोर्टात याचिका


आपल्या पदाचा दुरूपयोग राजकीय लढाईत करत असल्याचा आरोप


इंडियन बार असोसिएशनच्यावतीनं याचिका दाखल


भाजप नेते नारायण राणे आणि गणेश नाईकांविरोधात पदाचा गैरवापर करत आदेश दिल्याचा दावा


चाकणकरांविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्याची याचिकेत मागणी

BREAKING : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंवर सीबीआयची छापेमारी, भोसले यांच्या घरी आणि कार्यालयात झाडाझडती

बांधकाम व्यावसायिक
अविनाश भोसलेंवर
सीबीआयची छापेमारी
-----------------------
भोसले यांच्या घरी
आणि कार्यालयात
झाडाझडती
--------------------
येस बँक, डीएचएफएल
घोटाळाप्रकरणी मुंबई,
पुणे परिसरात छापेमारी

Mumbai Crime Updates :  अमेरिकेतून मुंबईत कुरियरमधून ड्रग्सची तस्करी, 27 किलो मारीजुआणा ड्रग्स जप्त

Mumbai Crime Updates : मुंबई कस्टमची मोठी कारवाई. अमेरिकेतून मुंबईत कुरियरमधून ड्रग्सची तस्करी होताना कारवाई.


27 किलो मारीजुआणा ड्रग्स जप्त..


मास्टरमाईड असणाऱ्या आरोपीला कस्टमकडून अटक..


आरोपीच्या घरात सुद्धा सर्च ऑपरेशन केल्यानंतर 20 किलो मारीजुआणा ड्रग्स आणि काही प्रमाणात हशीश ड्रग्स जप्त..

महाविकास आघाडी सरकारकडून गिरणी कामगारांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता

अडीच वर्षे पूर्ण करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारकडून गिरणी कामगारांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीत गिरणी कामगारांना घरं लवकरात लवकर मिळावीत याबाबत चर्चा


आगामी काळात लाखांच्या आसपास म्हाडाच्या माध्यमातून गिरणी कामगारांना घरे उपलब्ध होणार


वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा


शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच मंत्री जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित


'एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांची माहिती

नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये एका 12 वर्षीय मुलाने 27 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना

नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये एका 12 वर्षीय मुलाने 27 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे... 


राहुल गायकवाड असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून गुरुवारी रात्री काटोल मधील अण्णाभाऊ साठे नगरात एका लग्नात लावलेल्या डीजेवर नाचण्याच्या वादातून ही घटना घडली आहे... 


12 वर्षीय मुलगा आणि राहुल गायकवाड लग्नातील डीजेवर नाचत असताना धक्का लागल्याने दोघांमध्ये वाद झाले... त्यानंतर 12 वर्षीय मुलाने त्याच्याकडील चाकूने राहुल वार केले... 


गंभीर जखमी झालेल्या राहुला आधी काटोलच्या स्थानिक रुग्णालयात आणि नंतर नागपुरातील "मेयो शासकीय वैद्यकीय रुग्णालयात" दाखल करण्यात आले... त्याठिकाणी काल त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे... 


पोलिसांनी हत्येचे प्रकरण दाखल करत 12 वर्षीय बालकाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले आहे....

Gondia News : मुंडिपार येथे करंट लावून नीलगाय शिकार प्रकरणात 6 शिकाऱ्यांला अटक
गोंदिया जिल्याच्या गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मुंडीपार गावात विजेचा शॉक देऊन नीलगाय शिकार करण्यात आली असून या प्रकरणाचा सुगावा लावण्यात गोरेगाव वनविभागाला अखेर यश आले आहे. यात 6  शिकाऱ्यांना गोरेगाव वनविभागाणे अटक केली आहे. आरोपी मध्ये शंकर वैद्य ,बंसाराम सहारे ,भोजराम येळे ,मनोहर भोयर ,प्रकाश नाईक ,हिवराज  बोटरूगे यांचा समावेश आ 
पुणे पोलीस आयुक्तालयातर्फे मुस्लीम धर्मियांसाठी आझम कॅम्पस ग्राऊंडमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन

Pune News : पुणे पोलीस दल, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून आज संध्याकाळी मुस्लीम धर्मियांसाठी आझम कॅम्पस ग्राऊंडमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे


.

Amravati News : हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत अमरावतीच्या यावली शहीदमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा

Amravati News : हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत अमरावतीच्या यावली शहीदमध्ये पहाटे पार पडला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा... पहाटे चार वाजेपासुन तुकडोजी महाराजांच्या या जन्मोत्सव सोहळ्याला भजनाने सुरवात झाली होती. तर साडेपाच वाजता तुकडोजी महाराज यांचा पाळणा हलला. मागील सात दिवसापासून यावली शहीद या गावी तुकडोजी महाराज यांच्या ग्रामजयंती महोत्सवाला प्रारंभ झाला होता.. कोरोना नंतर पहिल्यांदा  तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा पार पडत असल्याने दरवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर गुरुदेव भक्तांनी या जन्मोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली होती..या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर देखील उपस्थित होत्या

Ahmednagar News Latest Updates : अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी 






Ahmednagar News Latest Updates : अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी..
 


अहमदनगर- करंजी घाटातील जंगलाला आग; वनसंपदा आणि वन्यजीव जळून खाक.

 

अहमदनगर- ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये आणलेले सव्वा तीन लाख चोरले, तारकपूरच्या सिटी केअर हॉस्पिटलसमोरील घटना.

 

अहमदनगर- नगरला होणार पहिला राष्ट्रीय पर्यावरण लघुपट महोत्सव,रंगभूमीचे कृष्णा बेलगावकर यांची माहिती.

 

अहमदनगर- अहमदनगरमध्ये बारा वर्षांतील उच्चांकी तापमान, पारा 44 अंशावर, नगरकर हैराण.

 

अहमदनगर-  नगर ते आष्टी रेल्वे मार्गावर 7 मे पासून रेल्वे धावणार , केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती.


 

 



 


बुलढाण्याचा पारा तब्बल 43 वर्षांनंतर 42 अंशावर, हिल स्टेशन बनलं हॉट स्टेशन

Buldhana News : बुलढाणा शहर हे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखल जात असे आणि त्यामुळेच इंग्रजांनी बुलडाणा हे जिल्हा मुख्यालय केल होतं. शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले नागरिक देखील उन्हाळ्यात काही दिवस हे 'हिल स्टेशन' असलेल्या बुलढाण्यात घालवत असतात. बुलढाणा शहर हे अजिंठा पर्वतरांगाच्या उंचावर असून ज्ञानगंगा अभयारण्याने संपूर्ण शहराला वेढा दिलेला आहे. त्यामुळेच या शहराचे आजपर्यंतचे तापमान जास्तीत जास्त 38 अंश सेल्सिअसपर्यंत जात होते. मात्र यावेळी एप्रिल महिन्यातच उन्हाचा पारा हा 42 अंशाच्या वर गेला आहे. शासकीय नोंदी नुसार 1981 पासून म्हणजे तब्बल 43 वर्षानंतर तापमान पहिल्यांदाच 42 अंशाच्या वर गेलं आहे. त्यामुळे जीवाची लाही लाही होताना दिसत आहे. त्यामुळे आता हिल स्टेशन असलेलं बुलढाणा आता हॉट स्टेशन बनलं आहे असं म्हणण्याची वेळ आली आहे.

Kamgar Din : कामगार दिनीच मुंबईच्या आझाद मैदानावर कामगारांचा मोर्चा धडकणार

कामगार दिनीच मुंबईच्या आझाद मैदानावर कामगारांचा मोर्चा धडकणार आहे. यासाठी पुणे-मुंबई दुचाकी रॅली ही काढली जाणार आहे. जाचक कामगार कायदे रद्द करावेत या मागणीसाठी ही रॅली काढली जात आहे. कामगार नगरी समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमधून या रॅलीला निघेल. रविवारी सकाळी सहा वाजता ही रॅली निघेल. कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदमांनी अशी माहिती दिली. त्यामुळे आम्ही कामगार दिन साजरा न करता, केंद्र सरकारचा याद्वारे निषेध व्यक्त करण्यात येईल.

पार्श्वभूमी






मुंबई: आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत. हे खरं असलं तरी पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी. या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


राज ठाकरे औरंगाबादसाठी रवाना, येत्या 48 तासात ‘राज’गर्जना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल पुण्यामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी औरंगाबादच्या सभेचा आढावा घेतला. राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी  होणार असून त्यासाठी 100 ते 200 गुरुजी आणि पुरोहित यांच्या उपस्थित हा विधी होणारल आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजता राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते औरंगाबादसाठी रवाना होणार आहेत. राज ठाकरेंच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. आयुक्तालयात कार्यालयात राज ठाकरेंच्या सभा स्थळाच्या सीसीटीव्हीचा ऍक्सेस असणार असल्याने पोलीस आयुक्त सभेवर लक्ष ठेवून असणार आहेत. 


राज ठाकरे औरंगाबादला जाताना वाटेत छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू इथल्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.  तसेच राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादला जाताना नगर जिल्ह्यातील नेवासा इथे त्यांचं स्वागत होण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते नेवासा फाट्याहून राज ठाकरेंसोबत औरंगाबादला रवाना होतील.   
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जिल्हा प्रमुखांसोबत बैठक
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडून बैठकांचा सपाटा सुरू आहे. खासदार, प्रवक्त्यांच्या बैठकीनंतर आज सर्व जिल्हा प्रमुखांची तातडीची बैठक बोलवली आहे. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे ऑनलाईनच्या माध्यमातून  जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.
 
वंचित बहुजन आघाडीकडून 'शांती मार्च'चे आयोजन, पोलिसांकडे परवानगी मागितली
 राज ठाकरेंच्या सभेच्या दिवशीच वंचितचा शांती मार्च आहे. याला आता पोलीस परवानगी देणार का नाही हे आज समजेल. वंचित बहुजन आघाडीने औरंगाबादमध्ये 'शांती मार्च' काढण्यासाठी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. 1 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता क्रांती चौक ते भडकल गेट येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढणार असल्याचा पत्रात उल्लेख आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणापासून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा जाणार असून या मार्चला परवानगी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 
 
महाविकास आघाडीची आज निर्धार सभा
राज्यातील राजकीय परिस्थितीत सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी महाविकास आघाडीकडून निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही सभा पुण्यातील अलका चौकात संध्याकाळी होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.
 
राणा दांम्पत्याच्या जामीनावर आज फैसला होणार 
राणा दापंत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यासंबंधित जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आमदार रवी राणा यांच्या विरोधात 17 केसेस आहे तर खासदार नवनीत राणांविरोधात 6 केसेस आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांचा या जामीनाला विरोध आहे. राणा दाम्पत्य बाहेर पडल्यावर पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान, गुरुवारी राणा दाम्पत्यानं घरचं जेवण मिळण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला. 


अजित पवार सोलापूर दौऱ्यावर 
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील अनगर नगरपंचायत निर्मिती बद्दल शेतकरी मेळावा घेण्यात आला आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या गावात हा मेळावा होतोय. सकाळी 10 वाजता होणाऱ्या मेळाव्यास अजित पवार उपस्थित राहतील.


लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे निवृत्त होणार
लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे हे आज निवृत्त होणार आहेत. ते सकाळी 9 वाजता नॅशनल वॉर मेमोरियल या ठिकाणी जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर ते 9.30 वाजता गार्ड ऑफ ऑनर स्वीकारणार आहेत. त्यानंतर ते जनरल मनोज पांडे यांच्याकडे पदभार देतील


या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण आज
ज्योतिषशास्त्रात शनिचारी अमावस्येच्या दिवशी, 2022 मधील पहिले सूर्यग्रहण ही एक मोठी खगोलीय घटना मानली जाते. हिंदू कॅलेंडर आणि खगोलशास्त्रज्ञांच्या मते, हे सूर्यग्रहण आंशिक असेल आणि भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळही वैध ठरणार नाही. मात्र, सूर्यग्रहण आणि शनिचरी अमावस्या एकाच दिवशी असल्याने जनजीवनावर मोठा परिणाम होणार आहे.


आज आयपीएलच्या मैदानात डबर हेडर
आज आयपीएलमध्ये दोन सामने होणार आहेत. दुपारी 3.30 वाजता आरसीबी आणि गुजरात यांच्यामध्ये लढत होणार आहे. तर दुसरा सामना हा मुंबई आणि राजस्थानमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. 


 






- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.