नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्मच्या अखेरच्या महिन्यांमध्ये पीएम किसान सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती. डिसेंबर 2018-जानेवारी 2029 पासून पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे पात्र शेतकर्यांना एका वर्षामध्ये तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणं 6 हजार रुपयांची रक्कम दिली जाते. पीएम किसान योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून महत्त्वाची पावलं वेळोवेळी उचलण्यात आली आहेत. काही अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम देखील परत घेण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान योजनेत नव्या शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यावेळी नवीन शेतकरी नोंदणी करताना केंद्रानं फार्मर आयडी नोंदवणं आवश्यक केलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक
केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी करताना फार्मर आयडी क्रमांक नोंदवणं बंधनकारक केलं आहे. केंद्रीय कृषी आणि शेतरी कल्याण मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी नोंदवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीसाठी साधारणपणे 2 लाख नव्यानं अर्ज सादर होतात.
फार्मर आयडीमुळं अर्ज सादर करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असल्याची खात्री होते. त्यामुलं पीएम किसान सन्मान निधी योजनेची पडताळणी प्रक्रिया देखील सोपी होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीसाठी नव्यानं अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर जो फार्मर आयडी क्रमांक मिळेल तो पीएम किसान सन्मान निधीच्या अर्जात नोंदवावा लागेल. ही प्रक्रिया सध्या देशातील 10 राज्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे. 1 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेत आतापर्यंत 18 हप्त्यांमध्ये 3.46 लाख कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. या योजनेचा जवळपास 11 कोटी शेतकऱ्यांना 18 हप्त्यांचा लाभ देण्यात आल आहे.18 व्या हप्त्याचा लाभ 9.58 कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसांमध्ये 25 लाख शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करुन घेण्यात आलं आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना आता 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
इतर बातम्या :
टोमॅटोची लाली उतरली! 6 दिवसात दरात 9 रुपयांची घसरण, बळीराजाला फटका तर ग्राहकांना दिलासा