Maharashtra Breaking News LIVE Updates : अमित ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल, स्वागतासाठी कार्यकत्यांची तुडुंब गर्दी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Apr 2022 08:29 PM
अमित ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल, स्वागतासाठी कार्यकत्यांची तुडुंब गर्दी

औरंगाबादच्या सभेसाठी मनसेची जय्यत तयारी सुरु आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. 

Kolhapur News Update : जीएसटी अधीक्षकांसह निरीक्षकास 50 हजारांची लाच घेताना अटक

जीएसटी अधीक्षकांसह निरीक्षकास 50 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या जयसिंगपूर येथील कायार्लयाबाहेर सीबीआयच्या पथकाने ही कारवाई केली. केंद्रीय जीएसटीचे अधीक्षक महेश नेसरीकर, निरीक्षक अमितकुमार मिश्रा यांना लाच घेताना शुक्रवारी सकाळी रंगेहात पकडले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याकडून 50 हजारांची लाच मागितली होती. संबंधित व्यापाऱ्याने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून दोघांना अटक केली. 

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेविरोधातील याचिका फेटाळली

राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये, म्हणून केलेली याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली. पोलीस प्रशासनाने लावलेल्या अटी पुरेशा असून राजकीय हेतूने केलेली याचिका म्हणून न्यायालयाने याचिका कर्त्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी ही याचिका केली होती.

1 मे रोजी राज ठाकरेंची औरंगाबादेत सभा, जलील यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

औरंगाबादमध्ये 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. जलील आणि पोलीस आयुक्तांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली.     

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या सभेविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. 

Sharad Pawar : मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा झाल्याची माहिती

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा या ठिकाणी तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खा. इम्तियाज जलील पोलीस आयुक्तांना भेटणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील पोलीस आयुक्तांना भेटणार आहेत. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यावर घेतलेल्या भूमिकेला एमआयएमने विरोध केला आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेसाठी यवतमाळ जिल्ह्यातून तीन हजार कार्यकर्ते जाणार; 25 ट्रॅव्हल्ससह 70 खासगी वाहनांचे बुकिंग 

Raj Thackeray :  राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यांवरून राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  च्याच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 1 मे रोजी ही सभा होणार आहे. औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला यवतमाळ जिल्ह्यातून तीन हजार कार्यकते जाणार आहेत. त्यासाठी खासगी 25 ट्रॅव्हल्ससह इतर चारचाकी 70 वाहनांचे बुकिंग करण्यात आले आहे. काही कार्यकर्ते रेल्वेने जाणार आहेत. 

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून 13 मेपर्यंत त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली . भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुख, संजीव पलांडे, कुंदन शिंदे हे साध्य न्यायालयायीन कोठडीत आहेत. सर्वांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढवली आहे. 

मित्रानेच केली मित्राची दगडाने ठेचून हत्या, बदलापूरातील हत्येचा पोलिसांनी केला उलगडा 

Crime News :  बदलापूरात एका 25 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. अखेर या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला आहे. हत्या झालेल्या युवकाच्या मित्रानेच क्षुल्लक कारणावरून दगडाने ठेचून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. 


बदलापूरच्या खरवई तळपाडा या भागात  25 एप्रिल रोजी  एका मोकळ्या जागेत पंचवीस वर्ष युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. हत्येची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत आरोपीचा शोध सुरू केला. हत्या झालेल्या युवकाचे नाव प्रसाद झुंजूर्के आहे. त्याची हत्या कोणी केली याचा शोध लागत नव्हता. अखेर बदलापूर पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे 25 एप्रिल रोजी प्रसादला त्याचा मित्र समसुल करीम सोबत या परिसरात दारू पीत असताना काहींनी पाहिले होते. शिवाय हत्या झाल्यापासून समसुल गायब असल्याचे ही पोलिसांना समजले. त्यामूळे पोलिसांचा समसुलवर संशय बळावला. पोलिसांना तांत्रिक माहितीच्या आधारे तो आंध्र प्रदेशला गेल्याचे समजलं. पोलीस आंध्र प्रदेशला गेल्यानंतर तो पुन्हा कल्याणला येत असल्याचे समजले. कल्याण स्टेशन परिसरात बदलापूर पोलिसांनी सापळा रचून समसुलला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी समसुल करीमला प्रसादच्या हत्ये प्रकरणी अटक केली.

Raj Thackeray : राज ठाकरे पुण्यात पोहोचले, औरंगाबादच्या सभेच्या तयारीचा आढावा घेणार

राज ठाकरे पुण्यात पोहोचले असून आज पुण्यातच त्यांचा मुक्काम आहे. आज मनसे कार्यकर्ते त्यांची भेट घेणार असून औरंगाबादच्या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. 

Amravati News : कृषी मंत्री दादा भुसे यांचा राज ठाकरेंना टोला

Amravati News : राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे हे आज अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्याच्या भोंगा आणि राजकीय वातावरण विषयावर त्यांना प्रश्न केला असता त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला. जे चाललंय ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही.. राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली आहे आणि त्याला काय अटी आहे मी बघितल्या नाही.. राज्याची संस्कृती सर्व समाजाला सर्व घटकांना सोबत घेऊन मार्गक्रमण करण्याची संस्कृती आहे अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली...

Pune Crime : सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यावर पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे : सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यावर पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल


पुनम गुंजाळ यांनी दिली होती तक्रार


सोशल मीडियावर महिला पदाधिकारी यांची केली जात आहे बदनामी



रुपाली ठोंबरे यांच्य विरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ


फरासखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Maharashtra News : पशुसंवर्धन अधिकाऱ्याच्या बदलीसाठी भीक मांगो आंदोलन

Maharashtra News : पशुसंवर्धन अधिकाऱ्याच्या बदलीसाठी युवक काँग्रेसचे भीक मांगो आंदोलन. पंचायत समिती बाभुळगाव येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत झाडे हे लाभार्थ्यांना विनाकारण त्रास असल्याचं दिसून आलं आहे. लाभार्थ्यांना प्रस्ताव मंजुरीसाठी पैशाची मागणी करीत असल्यानं लाभार्थी त्रस्त झाले आहेत. जनावरांचा वैयक्तिक गोठा योजनेच्या मंजुरीच्या फाईलवर सही करण्यासाठी तालुक्यातील लाभार्थ्यांना पैशीची मागणी केल्यानं, युवक काँग्रेसच्या वतीनं आधी गटविकास अधिकारी आणि नंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनं देण्यात आली आहेत. यावेळी भीक मांगो आंदोलन करून निधी संकलीत केला आणि तो निधी पंचायत समिती कार्यालयात जमा करण्यात आला. हा निधी संबंधित अधिकाऱ्यास देण्यात यावा, जेणेकरून सदरचा निधी हा गरीब लाभार्थ्यांची फाइल मंजूर करण्याचा फंड समजून वापरण्यास येईल. अशी विनंती करण्यात आली. हे आंदोलन युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णा ठाकरे, नगरसेवक चंद्रशेखर परचाके, यांच्या पुढाकारात करण्यात आलं आहे.  

औरंगाबादच्या सभेसाठी राज ठाकरे मुंबईहून रवाना, चेंबूरमध्ये स्वागतासाठी मनसैनिक सज्ज

मुंबई : औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईहून रवाना झाले आहेत. राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह आहे. राज ठाकरे रस्ते मार्गाने औरंगाबादला जाणार असल्याने ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. चेंबूरमध्ये मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांचं स्वागत करणार आहेत. इथे राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पुढे रवाना होणार आहे. त्यानंतर नवी मुंबईतही राज ठाकरे यांचं स्वागत केलं जाणार आहे. राज ठाकरे यांचा आजचा मुक्काम पुण्यात असेल.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात चोरी करणाऱ्या महिलांची टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Kolhapur News : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात चोरी करणाऱ्या महिलांची टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरी करताना रंगेहाथ पकडून महिलांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. मंदिरातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षामुळे चोरी करणाऱ्या महिला सापडल्या. राहुल जगताप, अभिजित पाटील आणि सुरक्षारक्षकांनी महिलांना चोरी करताना  पकडलं

राज्यातील सर्व जातीची गणना करावी, माजी खासदार, हरिभाऊ राठोड यांची मागणी

28 एप्रिलला मंत्रिमंडळाला ओबीसी समन्वय मंत्री गट उपसमितीने मंत्रिमंडळाला शिफारस करण्यात आली आहे की, राज्यात ओबेसीची स्वतंत्र गणना करावी. परंतू आमची अनेक दिवसापासून हि मागणी आहे की, केवळ ओबीसींची गणना न करता सर्वच समाजाची जातवार जनगणना करावी, जेणेकरून सर्वांना आरक्षण व सवलती देताना कोणावरही अन्याय होणार नाही. अथवा अवास्तव सवलती देता येणार नाही. मराठा - कुणबी समाजाला सारथीच्या माध्यमातून शैक्षणिक व इतर सवलती देण्यात येत असल्यामुळे त्यांचीही गणना करणे आवश्यक असल्याचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.

Navneet Rana Ravi Rana News : राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या, शनिवारी होणार सुनावणी

Navneet Rana Ravi Rana News : राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या, शनिवारी होणार सुनावणी

Ahemadnagar News : अहमदनगर- सोलापूर रस्त्यावर चार वाहनांमध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर 10 जण गंभीर





Ahemadnagar News : अहमदनगर- सोलापूर रस्त्यावर कोकणगाव गावच्या शिवारात बोराडे वस्ती जवळ चार वाहनांमध्ये भीषण अपघात झालाय... या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी झालेत... अपघातांमध्ये मालवाहतूक ट्रक हा सोलापूर कडून नगरकडे जात होता, तर इतर तीन वाहने तीन चाकी अॅपे रिक्षा, क्रुझर कंपनीची जीप, आणि टू व्हिलर गाडी ही मिरजगावच्या दिशेने सोलापूरकडे जात होते... या अपघातात कृष्णा मल्हारी बोरुडे आणि सोपान दिनकर काळे या दोघांचा मृत्यू झालाय... तर इतर दहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत सर्वांना नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.


 

 



 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे 11 वाजेच्या दरम्यान शिवतीर्थाहून पुण्याच्या दिशेने निघणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 11 वाजेच्या दरम्यान शिवतीर्थाहून पुण्याच्या दिशेने निघणार  


राज ठाकरे यांचं  मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून स्वागत केले जाणार आहे


मुंबईत अगदी नवी मुंबई पर्यत काही ठिकाणी मनसे कार्यकर्ते राज ठाकरे पुण्याच्या दिशेने जाताना स्वागत करतील


शिवाय काही कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या ताफ्यासोबत पुण्यापर्यंत जाण्याच्या तयारीत आहे


आज पुण्यात राज ठाकरे यांचा मुक्काम असणार आहे, यामध्ये काही पुण्यातील मनसे नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी राज ठाकरे घेतील...कुठलाही जाहीर कार्यक्रम पुण्यात नाही


उद्या सकाळी पुण्याहून राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने निघतील, दुपारपर्यत औरंगाबादला पोहचतील

Raj Thackeray Pune Visit : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सकाळी 11 वाजेच्या दरम्यान त्यांच्या निवासस्थान शिवतीर्थावरहुन पुण्याच्या दिशेने निघणार आहेत.


राज ठाकरे यांचं  मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून स्वागत केले जाणार आहे.


मुंबईत अगदी नवी मुंबई पर्यत काही ठिकाणी मनसे कार्यकर्ते राज ठाकरे पुण्याच्या दिशेने जाताना स्वागत करतील.


शिवाय काही कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या ताफ्यासोबत पुण्यापर्यंत जाण्याच्या तयारीत आहे.


आज पुण्यात राज ठाकरे यांचा मुक्काम असणार आहे, यामध्ये काही पुण्यातील मनसे नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी राज ठाकरे घेतील...कुठलाही जाहीर कार्यक्रम पुण्यात नाही.


उद्या सकाळी पुण्याहून राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने निघतील, दुपारपर्यत औरंगाबादला पोहचतील.

Nanded News : नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

Nanded News : नांदेड जिल्ह्यात 3 मे 2022 रोजीच्या मध्यरात्री पासून शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहेत, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलीय.
 जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 19 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 3 मे 2022 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहेत. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.दरम्यान हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाहीयेत.


अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

Maharashtra News : राणा दांपत्यांच्या जामीन याचिकेला राज्य सरकारचा जोरदार विरोध

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची चांगली सुरुवात, सेन्सेक्सची 330 अंकांची झेप तर निफ्टी 90 अंकांनी वधारला 
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची चांगली सुरुवात, सेन्सेक्सची 330 अंकांची झेप तर निफ्टी 90 अंकांनी वधारला 

 

जागतिक बाजारातील शेअर बाजार वधारल्यानं भारतीय बाजारात तेजी

 

कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा तेजी, तेलाच्या किंमती १०७ डाॅलर प्रति बॅरलवर

 

डाॅलरच्या तुलनेत रुपया ८ पैशांची वृद्धी, रुपया ७६.५३ वर उघडला 

 

मेटल, बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात तेजी

 

ओएनजीसी, सन फार्मा, टाटा स्टीलसारख्या कंपन्यांचे समभाग वधारले
Stock Market Update : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची चांगली सुरुवात, सेन्सेक्सची 330 अंकांची झेप तर निफ्टी 90 अंकांनी वधारला

2019 च्या लोकसभा निवडणुकीत उदय सामंत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत?

रत्नागिरी : राजकारण्यांचे वाद चव्हाट्यावर येत असले, अंतर्गत कुरघोडी दिसून येत असल्या तरी त्यांचं साटंलोटं कशारितीनं असेल याचा काही नेम नाही. दरम्यान, सध्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याची देखील सध्या कोकणात जोरात चर्चा सुरु आहे. त्यावरुन राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तर छुप्यारितीने मदत करत शिवसेनेचे उदय सामंत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत ठरले नाहीत ना? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. कारण, शिवसेनेला 2019 च्या लोकसभेत 52 हजारांचं असलेलं लीड विधानसभेवेळी तोडत कशारितीने राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला याचा पॅटर्न केवळ आम्हा दोघांना ठावूक असल्याचं वक्तव्य उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमात केलं. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया देखील उंचावल्या. मुख्य बाब म्हणजे विधानसभेच्या चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम विजयी झाले. तर, शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांना केवळ 2 हजारांच्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पण, सामंत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेच्या पराभवाला शिवसेनेचे नेतेच तर जबाबदार नाहीत ना? अशी चर्चा देखील आता रंगली आहे. 

तळकोकणात साकारलं महाराष्ट्रातील पाहिलं वाळूशिल्प संग्रहालय

Sindhudurg News : देशातील तिसरं आणि महाराष्ट्रातील पहिलं वाळूशिल्प संग्रहालय कोकणातील वेंगुर्लेतील आरवली सोन्सुरे गावात बनवलं आहे. समुद्रातील आणि खाडीतील सुमारे दोन टन वाळू आणून प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी हे वाळूशिल्प संग्रहालय साकारलं आहे. भक्तीचा संगम तसंच लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी मगर आणि कुत्र्याचं वाळूशिल्प याठिकाणी साकारलं आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना हे वाळूशिल्प संग्रहालय खुलं करण्यात आलं आहे. पर्यटक सुद्ध या वाळूशिल्प संग्रहालयाला भेट देत असून पर्यटकांना हे वाळूशिल्प भावलं आहे. पर्यटन वाढीसाठी हे वाळूशिल्प संग्रहालय साकारलं आहे.

मुलुंडमध्ये व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांच्या धाडीदरम्यान तब्येत बिघडून एकाचा मृत्यू
Mumbai News : मुलुंड पश्चिमेला असलेल्या संगम व्हिडीओ गेम पार्लरवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने टाकलेल्या धाडीमध्ये दिलीप रावजी शेजपाल या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्हिडीओ गेम पार्लरमध्ये जुगार सुरु असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर या शाखेच्या अधिकाऱ्यांनी या पार्लरवर रात्रीच्या वेळी धाड टाकली. त्यावेळी दिलीप हा पार्लरमध्ये होता. अचानक पार्लरवर पोलिसांची धाड पडल्यामुळे दिलीप याच्या छातीत कळ आली आणि त्याची तब्येत बिघडली. तो जागीच बेशुद्ध झाला. त्याला पोलिसांनी महापालिकेच्या अग्रवाल शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु त्या ठिकाणी डॉक्‍टरांनी दिलीपला मृत घोषित केले. पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप होत होता, मात्र असे काहीही झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर कुटुंबानेही बोलण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यात पाच कारखान्यांकडून 21 लाख 54 हजार क्विंटल साखरेचं गाळप
Hingoli News : या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने ऊस लागवडीला शेतकऱ्यांनी पसंती दिली. परिणामी अजूनही कारखान्यांचे गाळप हंगाम सुरुच आहे. या वर्षी हिंगोली जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी 21 लाख 54 हजार क्विंटल विक्रमी साखरेचं गाळप केलं आहे. गाळप करण्यात हिंगोली जिल्ह्यात सर्वात आघाडीवर आहे तो म्हणजे पूर्णा सहकारी साखर कारखाना. या कारखान्याने आतापर्यंत 6 लाख 45 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतलं आहे. अजूनही मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक असल्याने हे कारखाने मे अखेरपर्यंत सुरु राहू शकतात त्यामुळे हे साखरेचे उत्पादन अजून वाढणार आहे.
सांगली शहरात मनसेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन, शेकडो मुस्लीम बांधवांची उपस्थिती
Sangli News : राज्यात भोंग्याच्या राजकारणावरुन वातावरण चांगलंच तापले असताना सांगलीत मनसेकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करुन ऐक्याचा संदेश देण्यात आला. मनसेचे सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला मुस्लीम समाजातील बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मनसेच्या सांगली जिल्हा कार्यालयात ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. या इफ्तार पार्टीला शहरातील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसे भोंग्यांच्या विषयावरुन समाजातील वातावरण बिघडवत नसून मनसेचा केवळ भोंग्याला विरोध आहे. मुस्लीम समाजाच्या विरोधात मनसे नाही, हा आरोप करणाऱ्या विरोधकांना ही मनसेची इफ्तार पार्टी उत्तर आहे, असे मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटलं.

 
नांदेडमध्ये देगलूर रोड धनेगाव परिसरात भंगार गोदमाला भीषण आग, तर दुसरीकडे बाफना इथे ट्रक जळून खाक
Nanded News : नांदेड शहरातील देगलूर रोड धनेगाव परिसरात भंगार गोदमाला मध्यरात्री भीषण आग लागली. धनेगाव परिसरातील शेख तयब आणि अब्दुल अज्जु अब्दुल हमीद यांच्या भंगाराच्या गोदामामध्ये ही आग लागली. तर दुसरीकडे बाफना टी पॉईंटजवळ ट्रकला आग लागून तो जळून खाक झाला. नांदेड महापालिका आणि अर्धापूर नगरपंचायतच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी वेळीच धाव घेऊन आग आटोक्यात आणली. भंगार साहित्यात प्लास्टिक आणि बॅटरीचा मोठा साठा असल्याने आग आणखीच भीषण होत होती. तर आग लागलेल्या  भंगारच्या गोदामाला लागूनच रहिवाशी वस्ती, फ्रीजचं गोडाऊन आणि बेकरी असल्याने ती इतर ठिकाणी पसरण्याचीही भीती होती. दरम्यान महापालिका अग्निशमन, अर्धापूर अग्निशन, औद्योगिक वसाहत अग्निशमन दलाने संयुक्त कार्यवाही करत आजूबाजूला आग पोहोचू दिली नाही आणि आग आटोक्यात आणली आहे.
Kolhapur News : डीपीला फोटो लावला नाही म्हणून तरुणीला मारहाण, नैराश्येतून युवतीची आत्महत्या, तरुणावर गुन्हा दाखल

Kolhapur News : डीपीला फोटो लावला नाही म्हणून तरुणीला मारहाण, नैराश्येतून युवतीची आत्महत्या, तरुणावर गुन्हा दाखल, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील धक्कादायक घटना,  किशोर दत्तात्रय सुरंगे असं मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव

Mumbai Crime News : मुलुंडमध्ये व्हिडिओ गेम पार्लरवर मुंबई पोलिसांची धाडी, धाडीदरम्यान एकाचा मृत्यू

Mumbai Crime News : मुलुंड पश्चिमेला असलेल्या संगम व्हिडिओ गेम पार्लर वर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने टाकलेल्या धाडी मध्ये दिलीप रावजी शेजपाल या व्यक्तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्हिडिओ गेम पार्लर मध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर या शाखेच्या अधिकाऱ्यांनी या  पार्लर वर रात्रीच्या वेळेस धाड टाकली. त्यावेळी दिलीप हा पार्लरमध्ये होता. अचानक पार्लर वर पोलिसांची धाड पडल्यामुळे दिलीप याच्या छातीत कळ आणि त्याची तब्येत बिघडली आणि तो जागीच बेशुद्ध झाला. त्याला पोलिसांनी पालिकेच्या अग्रवाल शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.परंतु त्या ठिकाणी डॉक्‍टरांनी दिलीप ला मृत घोषित केले.या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.

Bhavana Gawali News : शिवसेना खासदार भावना गवळी यांना EDचं समन्स, पुढील आठवड्यात हजर होण्याचे आदेश

Bhavana Gawali News : शिवसेना खासदार भावना गवळी यांना EDचं समन्स, पुढील आठवड्यात हजर होण्याचे आदेश, जर हजर राहिल्या नाहीत तर ईडी NBWसाठी कोर्टात जाण्याची शक्यता, महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये झालेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करणार 

पार्श्वभूमी

Important days in 29th April : एप्रिल महिना सुरु आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 29 एप्रिलचे दिनविशेष.


1848 : चित्रकार राजा रवि वर्मा यांचा जन्म. 


राजा रवि वर्मा हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रकार होते. रवि वर्मा यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाश्चात्त्य कलेतील वास्तववादी तंत्र आणि तैलरंगाचे माध्यम वापरून भारतीय महाकाव्यांतील प्रसंग आणि धार्मिक विषय रंगविले. या त्यांच्या तजेलदार आणि अभिनव आविष्कारमुळे त्यांना भारतीय तैलरंगचित्रणाचे आद्य जनक मानले जाते. कलेच्या क्षेत्रात राजा रविवर्मांना मिळालेली मान्यता तसेच त्यांची प्रतिभा आणि कार्य बघून सातवे एडवर्ड यांनी‘कैसर-इ-हिंद’हे सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला. 


1867 : भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म.


डॉ. शंकर आबाजी भिसे हे भारतीय अनुप्रयुक्त संशोधक होते. 1893 मध्ये शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी 'द सायंटिफिक क्लब' ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि संस्थेतर्फे त्यांनी 1894 मध्ये विविध कलासंग्रह हे मासिक सुरू केले. त्यांनी ‘भिसोटाइप’ या यंत्राचा शोध लावला. इंग्‍लंड आणि अमेरिका येथील यंत्रतज्ञांनी त्यांना 'हिंदुस्थानचे एडिसन' असे संबोधिले होते


1891 : भारतीदासन, कवी यांचा जन्म. 


1891- भारतीदासन हे 20 व्या शतकातील तमिळ कवी आणि बुद्धिवादी लेखक होते. सुब्रह्मण्य भारतींच्या प्रभावळीतील एक अग्रगण्य तमिळ कवी. त्यांनी तमिळमध्ये काव्य (भावगीते, कथाकाव्ये आणि पद्यनाट्ये), नाटक, कादंबरी, पटकथा इ. प्रकारांत लेखन केले.


1979 : भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि लेखक राजा महेंद्र प्रताप यांचे निधन.


राजा महेंद्र प्रताप सिंग हे स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, लेखक, क्रांतिकारक, समाजसुधारक आणि भारताचे महान दानशूर होते. ते 'आर्यन पेशवा' या नावाने प्रसिद्ध होते आणि भारताच्या हंगामी सरकारचे अध्यक्ष होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात 1940 मध्ये जपानमध्ये 'भारतीय कार्यकारी मंडळ' स्थापन केले. 1911 च्या बाल्कन युद्धातही त्यांनी आपल्या महाविद्यालयीन मित्रांसह भाग घेतला होता. भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले आहे.


2020 : सुप्रसिद्ध भारतीय अभिनेते इरफान खान यांचे कर्करोगाने निधन. 


प्रसिद्ध भारतीय अभिनेते इरफान खान यांचे पूर्ण नाव साहेबजादे इरफान अली खान असे आहे. त्यांनी जय हनुमान (1998) या मालिकेत वाल्मिकी ऋषींची भूमिका केली. स्लमडॉग मिलेनिअर (2008) या ऑस्कर आणि इतर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या चित्रपटात त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली. अंग्रेजी मिडीयम (2020) हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट ठरला. चित्रपटातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने 2011 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मनित केले.  


आंतरराष्ट्रीय नृत्य दिन 


आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस हा 29 एप्रिल रोजी कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, नृत्य कलेबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जाणारा नृत्याचा जागतिक उत्सव आहे. आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था (आयटीआय) ही संयुक्त राष्ट्रांच्या शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक संघटनेची (युनेस्को) भागीदार असलेली स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने 1982 पासून 29 एप्रिल हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर केले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.