Maharashtra Breaking News 26 July 2022 : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Jul 2022 11:41 PM
कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंगला मिळणार परवानगी

कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंगला मिळणार परवानगी


खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घेतली भेट


हवाई वाहतूक मंत्रालयाकडून याबाबत तात्काळ अंमलबजावणीचे आदेश


कालच मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या तीन केंद्रीय मंत्र्यांनाही कोल्हापुरात नाईट लँडिंग नसल्यामुळे बेळगावला जाण्याची वेळ आली होती


नाईट लँडिंग परवानगी मिळाल्यानंतर कोल्हापूर विमानतळावरच्या वाहतुकीचा सामान्यांनाही दिलासा

संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार?

संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. प्रवीण राऊत यांना चौकशीसाठी दिल्लीला नेण्याची ईडीला कोर्टाकडून परवानगी देण्यात आली आहे. प्रवीण राऊत यांना काही विशेष अटीशर्तीवर मुंबई सत्र न्यायालयाने दिल्लीला नेण्यास परवानगी दिली आहे. पत्राचाळ प्रकरणी प्रवीण राऊत यांच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत  करावी लागणार आहे.  तसेच दिल्लीला नेण्यापूर्वी ईडीला कोर्टात हमीपत्र देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत. या हमीपत्रात आरोपीला दिल्लीतील चौकशी संपल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात पुन्हा हजर करू असा उल्लेख करणं अनिवार्य आहे.  

Maharashtra News : स्मिता ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

स्मिता ठाकरे यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  सह्याद्री अतिथीगृहवर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.  माझा राजकारणशी काही संबंध नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी या वेळ दिली. 

Maharashtra News : स्मिता ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

स्मिता ठाकरे यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  सह्याद्री अतिथीगृहवर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.  माझा राजकारणशी काही संबंध नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी या वेळ दिली. 

नाशिक शहरातील खड्यांवरून मनसे आक्रमक, मनपासमोर ठिय्या

नाशिक शहरातील खड्यांवरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ढोल ताशे वाजवत मनसे कार्यकर्ते मनपा कार्यालयात दाखल. यावेळी कार्यकर्त्यांनी खड्यांना फुलं आणि अधिकाऱ्यांना काट्यांचा गुच्छ दिला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलकर्त्यांनी ठिया दिला.  

पूरग्रस्त भागात ग्रामस्थांसाठी डॉक्टर्स असोसिएशनने आरोग्य शिबीर; रूग्णांना मोफत औषध वितरण

पुराचे पाणी साचून राहिल्याने यवतमाळच्या वणी तालुक्यातील अनेक गावात जलजन्य आजार व साथीचे रोग पसरायला सुरवात झाली आहे. त्यामुळे या गावांत सामाजिक दायित्व म्हणून डॉक्टर्स असोसिएशनने आरोग्य शिबीर लाऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून रुग्णांना मोफत औषध वितरण सुरू केले आहे. या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यानंतर दूषित पाणी ग्रामस्थांना प्यावे लागले, परिणामी आजार बळावले आहेत. शिवाय पाळीव जनावरांना देखील आजारांची लागण झाल्याने पशुवैद्यकीय तज्ञांनी देखील मोफत उपचार सेवा पूरग्रस्त भागात सुरू केली. खाजगी डॉक्टर्स व वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी रोटरी व क्रांती संघटनेच्या सहकार्याने पूरग्रस्त गावांमध्ये ही मोफत उपचार सेवा देत आहेत.

Nagpur : GPO चौकात कारने अचानक घेतला पेट

नागपूरः शहरातील पोस्ट ऑफिस चौक (GPO) येथे अचानक एका कारने पेट घेतला. बघता बघता काही क्षणातच कार जळून खाक झाली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसून अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी नुकतीच पोहोचली आहे.

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

कुणी पालकमंत्री देता का? आमच्या पुणेकरांना पालकमंत्री देता का? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. या आंदोलनमध्ये शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.  23 दिवसात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ED सरकार तुमचे राजकारण थांबवा अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.  

Nawab Malik : आमदार नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी तहकूब, याप्रकरणी 29 जुलै रोजी होणार पुढील सुनावणी

Nawab Malik :  आमदार नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी तहकूब करण्यात आली. याप्रकरणी 29 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. तपासयंत्रणेला कोणतेही सबळ पुरावे मिळाले नाहीत म्हणून याप्रकरणात जामीन देण्यात यावा, अशी याचिका मलिकांनी केली आहे. ईडीने मलिकांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे.  


 

नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी तहकूब, विशेष पीएमएलए कोर्टात 29 जुलै रोजी पुढील सुनावणी

Nawab Malik Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी तहकूब झाली आहे. याप्रकरणी 29 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणेला कोणतेही सबळ पुरावे मिळाले नाहीत म्हणून याप्रकरणात जामीन देण्यात यावा, असा दावा मलिकांच्या वतीने करण्यात आला होता. परंतु न्यायालयात ईडीने नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. आता मलिक यांच्या याचिकेवर विशेष पीएमएलए कोर्टात पुढील सुनावणी 29 जुलै रोजी होणार आहे.

बीडमध्ये भरपावसात काँग्रेसचं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन, सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीचा निषेध

Beed News : बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यांना बदनाम करण्यासाठी असं षड्यंत्र रचल जात असल्याचा आरोप काँग्रेसने यावेळी केला. याचाच विरोध करत बीडच्या काँग्रेसने भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन केलं.

मुदत संपल्यानंतरही किणी टोल नाका सुरु असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे आंदोलन
Kolhapur News : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने किणी टोल नाका येथे अभिनव पद्धतीने आंदोलन करत काही काळ टोल नाका बंद करण्यात आला. 2 मे रोजी किणी टोल नाक्याची मुदत संपली असताना देखील टोल नाका सुरु असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर उभे राहून गाड्या सोडल्या.
धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे जिल्हा रुग्णालयाचे आवाहन
Dhule News : धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून सध्या रक्ताच्या केवळ सहा बॅग उपलब्ध आहेत यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलं आहे. धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धुळे आणि इतर जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी येत असतात. या ठिकाणी सिकलसेल आणि थायलेसिमिया या आजाराच्या जवळपास 80 रुग्णांची नोंद असून त्यांना दर महिन्याला मोठ्या प्रमाणात त्याची गरज भासत असते. तसेच कोरोनाच्या काळानंतर अपघातांचे प्रमाण वाढल्याने दररोज 50 ते 60 बॅग रक्ताची गरज भासत आहे. मात्र सध्या या वैद्यकीय महाविद्यालयात केवळ सहा रक्त बॅगा शिल्लक आहेत. अपघातांचे वाढते प्रमाण तसेच दर महिन्याला रुग्णांना लागणारे रक्त यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनानंतर रक्तसंकलनात मोठी घट झाली असून यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे
Nagpur Traffic Police : वाहतूक पोलिसांची दादागिरी; गाडी उचलण्यास विरोध करणाऱ्याला मारहाण

नागपूरः शहरात नो पार्किंग मधून गाडी उचलताना एका चालकाला दुचाकीसह क्रेन ने उचलल्याचे प्रकरण ताजे असताना आता गाडी उचलण्यास विरोध करणाऱ्याला वाहतूक पोलिसांनी मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नागपूर ट्रॉफिक पोलिसांविरोधात नारिक सोशल मीडियावर रोष व्यक्त करत आहेत. शहरातील सक्करदरा भागातील तिरंगा चौकातील एका हॉटेलसमोर दुचाकी पार्क केलेली होती. वाहतूक पोलिसांनी कंत्राट दिलेल्या टोइंग व्हैन ने दुचाकी उचलत असताना हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने त्याला विरोध केला. यावरुन झालेल्या वादानंतर पोलिसाने त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तिथे उपस्थित नागरिकांनी त्यास विरोध करत ही घटना कॅमेऱ्यात चित्रीत केली. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुसरी मुलगी नकोच म्हणून बीडमधील विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात; पती, सासू, डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल

Beed News : दुसऱ्या वेळी मुलगी नको, मुलगाच हवा या हट्टापायी कुटुंबीयांनी एका डॉक्टरला हाताशी धरुन बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केले. गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर पती आणि सासूच्या सांगण्यावरुन त्या डॉक्टरने महिलेचा गर्भपात केला. मुलगी असो वा मुलगा, गर्भपात नको, माझ्या बाळाला मारु नका असा आक्रोश करणाऱ्या मातेकडेही त्या डॉक्टरने दुर्लक्ष केले. अखेर त्या मातेच्या फिर्यादीवरुन पती, सासू, डॉक्टर आणि अन्य एका व्यक्तीवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीवरुन पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, डॉ. स्वामी आणि प्रक्षा कावळे या चौघांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 313, 315, 318, 34, 498-अ, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

वाहतुकीचे नियम मोडून दंड न भरणाऱ्यावर बीड पोलिसांची कारवाई, दंड न भरल्यास खटले दाखल करणार
Beed News : बीडमध्ये तीन कोटी रुपयांचा दंड थकवणाऱ्या 77 हजार वाहनधारकांना वाहतूक पोलिसांनी आता नोटीसा पाठवल्या आहेत. मागील साडेतीन वर्षात वाहनधारकांनी तब्बल तीन कोटी पाच लाख 98 हजार रुपयांचा दंड थकवला आहे. यावर्षी सर्वाधिक 28 कोटी रुपयांच्या दंड वाहनधारकांनी थकवल्याने बीडच्या वाहतूक शाखेने थेट कारवाई करायला सुरुवात केली आहे. यामध्ये अस्ताव्यस्त पार्किंग, हेल्मेटचा वापर न करणे त्याचबरोबर वाहन चालवण्याचा परवाना नसणे यासह अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी ई-चालानद्वारे दंड आकारला होता. त्याच दंडाची वसुली आता पोलिसांनी चालू केली आहे. दंड न भरणाऱ्या वाहन चालकावर खटले दाखल करण्यात असल्याचेही वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

 
बीडच्या माजलगाव शहरात घाणीचे साम्राज्य, कंत्राटदाराने कचरा मुख्य रस्त्यावर टाकला
Beed News : बीडच्या माजलगाव शहरामध्ये स्वच्छता कंत्राटदाराने शहरातून जमा केलेला कचरा हा सिंदफणा नदी पात्रात टाकल्याने सिंदफना नदी प्रदूषित होत असून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे याच ठेकेदाराकडून शहरातला काही कचरा हा मुख्य रस्त्याच्या बाजूला टाकण्यात येत असल्याने ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ओल्या कचऱ्यामधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागली आहे. माजलगावकरांचे आरोग्य धोक्यात आलं असून तात्काळ या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची मागणी देखील नागरिक करत आहेत.
Mumbai Traffic Updates : मुंबई: पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; जोगेश्वरीत मेट्रो कोच नेणारा क्रेन अडकला

Mumbai Traffic Updates : मुंबई: पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. बोरिवलीच्या दिशेने जाणारा मेट्रो कोच नेणारा क्रेन जोगेश्वरीत अडकला आहे. 

केतकी चितळेच्या याचिकेवर सुनावणी

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट करणा-या केतकी चितळेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. केतकीनं तिच्याविरोधात राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे 

Maharashtra Rain Updates : राज्यातील पावसानं अनेक रेकॉर्ड मोडले, जुलै महिन्याच्या 25 दिवसातच 550 मिमी पावसाची नोंद

Maharashtra Rain Updates : आतापर्यंत राज्यात झालेल्या एकूण पावसानुसार राज्यात 38 टक्के अतिरिक्त पाऊस पडलाय. नाशिकचा जुलै महिन्यातील पर्जन्याने 81  वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढलाय. यावर्षी जुलै महिन्याच्या 25 दिवसातच 550 मिमी पाऊस झालाय.

Nawab Malik : मलिकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.  ईडीनं मलिकांच्या जामीनास जोरदार विरोध केला आहे. नवाब मलिक हे सध्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे रूग्णालयात उपचार घेत आहेत. 

आजपासून देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू, खरेदीदारांच्या शर्यतीत 'या' 4 कंपन्या

5G Auction :  टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात भारत आज प्रगतीचं आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे... आजपासून 5-जी स्पेक्ट्रमच्या 9 फ्रिक्वेन्सी बँडचा लिलाव करण्यात येणार आहे. एअरटेल, अदानी डेटा, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यासारख्या कंपन्या या लिलावासाठी शर्यतीत आहेत. 5-जी सुरू झाल्यास इंटरनेट सेवेचा वेग वाढणार आहे मात्र त्यासाठी ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे. सध्या ट्रायकडून भोपाळ, नवी दिल्ली विमानतळ, कांडला पोर्ट आणि बंगळुरु या चार ठिकाणी 5 जीच्या पायलट चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत.

Aarey Car Shed : आरे मेट्रो कारशेड परिसरात कामाला सुरुवात

Aarey Car Shed : मेट्रोच्या बोगी आरे कारशेडमध्ये नेण्यासाठी रस्ते बंद करून वृक्षांच्या फांद्या छाटणीस सुरुवात करण्यात आली आहे. पर्यावरणवाद्यांनी झाडांच्या छाटणीस विरोध केलाय. यामुळे काही पर्यावरणवाद्यांना नोटीस पाठवण्यात आल्या असून काही जणांना ताब्यात घेण्यात आलंय. यामुळे पर्यावरणवादी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

ठाण्यातील कापूरबावडी इथे ट्रक दिशादर्शक बोर्डच्या पोलवर आदळला, ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला अडीच तासाच्यां अथक प्रयत्नांनी बाहेर काढलं

Thane News : घोडबंदर रोडवरुन ठाण्याला येणाऱ्या मार्गावर एक ट्रक दिशादर्शक बोर्डच्या पोलवर आदळला. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात चालक ट्रकमध्येच अडकला होता. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाच्या जवानांनी अडीच तासांच्या प्रयत्नांनी कटर मशील आणि तीन क्रेनच्या सहाय्याने चालकाला बाहेर काढलं.  कापूरबावडी पोलिसांनी ट्रकचालकाला उपचारांसाठी ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मुमताज खान असं चालकाचं नाव असून या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर क्लिनर सहबाज यांच्या दोन्ही पायांच्या बोटांना किरकोळ इजा झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.

भिवंडी शहरातील चावींद्रा रोड इथे वृद्ध महिलेच्या घराचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरले

Bhiwandi News : भिवंडी शहरातील चाविंद्रा रोड इथे राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या घराच्या कुलूप तोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली. ही महिला आपले घर बंद करुन मुलाकडे गेली असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन पलायन केलं. यानंतर वृद्ध महिला घरी आली असता तिला चोरी झाल्याचं समजलं. मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. "वयोवृद्ध असल्याने व्यवस्थित चालता येत नसल्यामुळे मी पोलीस ठाण्यात जाऊ शकत नाही, त्यामुळे गुन्हा दाखल केला नाही, असं या वृद्धेने सांगितलं.

Sonia Gandhi ED Enquiry : ईडीच्या चौकशीचा फेरा; नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधींची आज पुन्हा चौकशी

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची दुसऱ्यांदा ईडी (ED) चौकशी केली जाणार आहे. काँग्रेसकडून देशभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तर मुंबईतही मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, आज सोनिया गांधींची (Congress President Sonia Gandhi) दुसऱ्यांदा ईडी चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी ईडीनं गुरुवारी (21 जुलै) सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना सोमवारी म्हणजेच, 25 जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. पण पुन्हा नव्यानं समन्स बजावत  25 ऐवजी 26 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Uddhav Thackeray Interview : शिवसेनेतील बंडाळीनंतर ठाकरेंची पहिली मुलाखत

Uddhav Thackeray Interview : राज्यातील सत्ता संघर्ष अद्याप सुरुच आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आणि राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. तत्काली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि राज्यात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे गटानं भाजपसोबत एकत्र येत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. दोन्हीकडून सातत्यानं आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही जडताना दिसत आहेत. आता शिंदे गटाकडून आमचीच खरी शिवसेना असा दावा केला जात आहे. एवढंच नाहीतर या बंडखोर आमदारांकडून शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरही दावा केला जात आहे. राज्याच्या राजकारणात दिवसागणिक नाट्यमय घडामोडी घडत असताना सध्या चर्चा रंगली आहे ती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसारित होणार..हल्लाबोल..आसूड..गौप्यस्फोट? 


संजय राऊतांनी घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला भाग आज सामनाकडून प्रसारित होणार आहे.  ही मुलाखत 8.30 वाजता प्रसारित होणार आहे.  शिवसेनेतील बंडखोरीनंतरची ही उद्धव ठाकरेंची पहिलीच मुलाखत आहे.


आरे मेट्रो कारशेड परिसरात कामाला सुरुवात


मेट्रोच्या बोगी आरे कारशेडमध्ये नेण्यासाठी रस्ते बंद करून वृक्षांच्या फांद्या छाटणीस सुरुवात करण्यात आली आहे. पर्यावरणवाद्यांनी झाडांच्या छाटणीस विरोध केलाय. यामुळे काही पर्यावरणवाद्यांना नोटीस पाठवण्यात आल्या असून काही जणांना ताब्यात घेण्यात आलंय.   यामुळे पर्यावरणवादी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 


आज दुसऱ्यांदा सोनिया गांधींची ईडी चौकशी


 नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज सोनिया गांधींना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. चौकशीची वेळ निश्चित नाही. याविरोधात काँग्रेसकडून देशभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्लीत संसदेच्या बाहेर आणि आतमध्ये आंदोलन करण्यात येईल.   मुंबईत मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे .  पुणे, वाशिममध्येही आंदोलन होणार आहे.


मलिकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.  ईडीनं मलिकांच्या जामीनास जोरदार विरोध केला आहे. नवाब मलिक हे सध्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे रूग्णालयात उपचार घेत आहेत. 


पावसानं अनेक रेकॉर्ड मोडले


आतापर्यंत झालेल्या एकूण पावसानुसार राज्यात 38 टक्के अतिरिक्त पाऊस पडलाय. नाशिकचा जुलै महिन्यातील पर्जन्याने 81  वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढलाय. यावर्षी जुलै महिन्याच्या 25 दिवसातच 550 मिमी पाऊस झालाय.


केतकी चितळेच्या याचिकेवर सुनावणी


शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट करणा-या केतकी चितळेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. केतकीनं तिच्याविरोधात राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे 


व्यापाऱ्यांचे आजपासून देशव्यापी आंदोलन 


कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं (CAIT) जीएसटी कायदे सुलभ करण्याच्या मागणीसाठी आजपासून देशव्यापी आंदोलन सुरु करणार. भोपाळमधून व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात होईल. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांवर अनावश्यक कर आकारणीचा बोजा आणि क्लिष्ट कर आकारणीच्या नियमांमुळे व्यापाऱ्यांची अडचण होत असल्याचं सीएआयटीकडून स्पष्ट करण्यात आलंय. नुकत्याच फुटवेअर, कापड आणि अनब्रॅंडेड फूड प्रोडक्टवरील जीएसटी कर मागे घेण्याचीही मागणी करण्यात आलीय 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.