Maharashtra Breaking News 25 May 2022 : राज्यभरातील तब्बल 20 हजार परिचारिका उद्यापासून संपावर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राज्यभरातील तब्बल 20 हजार परिचारिका गुरुवारपासून संपावर जाणार असल्याची बातमी समोर येत आहे. दोन दिवस 1 तासासाठी काम बंद आंदोलन करून देखील प्रशासकीय पातळीवर दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने संपाची हाक देण्यात आली आहे. कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा विरोध आहे. परिचारिकांच्या संपामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातल्या दहा विधानपरिषद जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.20 जूनला निवडणूक होणार आहे.
Sindhdurga Tourism : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील साहसी जलक्रीडा प्रकाराबरोबर सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा उद्या पासून 31 ऑगस्टपर्यत बंद करण्याचे मेरीटाईम बोर्डाने आदेश दिले आहेत. त्यामुळे किनारपट्टीवरील पर्यटनाला आता 'ब्रेक' लागणार आहे.
उल्हासनगरच्या मिलिंद नगर भागात दुचाकी पेटवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. जुन्या वादातून आणि परिसरात दहशद निर्माण करण्याच्या हेतूने या दुचाकी पेटवण्यात आल्या. या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Solapur News : सोलापुरात एल ॲन्ड टी फायनान्सच्या कार्यालयाला विरोधी पक्ष नेत्याने टाळे ठोकले आहे. बोगस कागदपत्रांचा वापर करून 36 पेक्षा जास्त लोकांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याने शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे आक्रमक झाले. एल ॲन्ड टी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे 36 तरुणांच्या नावे 42 लाखाचे बोगस कर्ज काढले होते.
खासदार नवनीत राणा यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. त्यांना हनुमान चालीसा जर कुठेही वाचन केलं तर तिथं येऊन जीवानिशी मारणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. दोन दिवसात तब्बल 50 वेळा अज्ञात व्यक्तीकडून फोन येत असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली. याबाबत वनीत राणा यांनी दिली संसदेतील पोलीस चौकीत तक्रार देखील केली आहे.
नागपूरात हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राणा दांपत्य कार्यकर्त्यांसह अमरावतीला रवाना होतील. अमरावती जिल्ह्यात तिवसा, मोझरी नांदगाव यासह अमरावती शहरात अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत होणार असून रात्री 9 वाजता अमरावती येथील दसरा मैदान जवळच्या हनुमान मंदिरात पुन्हा हनुमान चालीसा पठण केले जाणार आहे.
Maharashtra News : मागील अडीच वर्षांपासून रखडलेल्या महामंडळ नियुक्त्यांबाबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची सायंकाळी महत्त्वाची बैठक आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या घरी बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीमध्ये राज्यसभेच्या निवडणुकांसोबतच, ओबीसी आरक्षण प्रश्ननी चर्चा होण्याची शक्यता आहे.
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार यांची दिल्लीत आयोजित केलेली सभा पुढे ढकलली आहे. दिल्लीत 10 जून ऐवजी 19 जूनला जाहीर सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.
Yavatmal Accident : आर्णी येथील विठोली येथे लग्नाच्या वऱ्हाडाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जण जखमी झाले आहे. लग्नाला जाताना आर्णी ते बोरगांव राज्य महामार्गावर घडली.
Bhandara News : भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत विजेच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या नुसार भंडारा ,गोंदिया जिल्ह्यात आज सायंकाळच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची दाणादाण झाली. शेतातील काढलेला माल पावसामुळे कसा वाचेल याची कसरत सुरू झाली. जवळपास अर्धा तास आलेल्या या मान्सून पूर्व अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, काही प्रमाणात रब्बी हंगामातील पीक पावसाने भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने महविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक सुरू आहे. बैठकीला राष्ट्रवादीचे जयंत पाटील, उपमुखयमंत्री अजित पवार, शिवसेनेचे दादा भुसे, काँग्रेसचे अस्लम शेख उपस्थित आहे. आगामी काळातील रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यातील हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरवरील मैदानात अमरावती मध्यवर्ती कारागृहातील जेलरच्या मुलाचा एक तरुणी आणि तिच्या चार साथीदारांनी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गिरीधर गायकवाड, वय 21 असे मयत तरुणाच नाव आहे. खून प्रकरणी अनोळखी पाच जणांविरोधात हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मयत तरुणाच्या मोबाईलवर काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास साक्षी पांचाळ नावाच्या तरुणीचा फोन आला. तिला भेटून येतो असं सांगून घरातून गेल्यावर बराच वेळ तो परतला नाही. त्यानंतर अगदी काही मिनिटांनी अमरावतीला जेलर असलेल्या वडिलांचा घरी फोन आला. ग्लायडिंग सेंटर येथील मैदानात गिरीधर याचा खून झाल्याचे सांगितले. तिथे पोलीस गेल्यावर गिरीधर याचा मृतदेह असल्याची ओळख पटली. तर त्याचवेळी तिथे असलेले एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, चार पुरुष आणि एक तरुणी यांनी गिरीधर याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर सासवडच्या दिशेने पळून गेले असल्याचे त्याने सांगितले.
अंबरनाथ तालुक्यातील प्रस्तवित कुशिवली धरणाच्या भू संपादनात मोठा घोटाळा उघड झालाय. या घोटाळ्यात एका नायब तहसीलदारासह 29 जणांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दापश करून त्यांना अटक करण्यात आलीय. या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढणार असून अनेक मोठ्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जातीय.
Kashedi Ghat Accident : मुंबई गोवा महामार्गवरील कशेडी घाटात आंबाबस थांब्यानजीक टँकर उलटून अपघात झाला. क्लिनरचा जागीच मृत्यू झाला असून चालक जखमी झाला आहे.
Washim News : वाशिमच्या मंगरुळपीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक इंगोले यांच्यासह अस्लम जमिल सिद्दीकी या व्यक्तीला एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. काल (24 मे) संध्याकाळी ही घटना घडली असून आज (25 मे) सकाळी गुन्हा दाखल झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती आणि वाशिम यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. तक्रारदाराकडून प्लॉटसमोर अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याने एक लाख रुपयांची लाच मागितली होती.
BJP Morcha: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भाजप कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला होता
BJP Morcha : ओबीसी आरक्षणासाठी भाजपने आज मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
Hingoli News : हिंगोली शहरासह लगत असलेल्या ग्रामीण भागात आज सकाळी अचानक मोबाईलचे नेटवर्क गायब झाले होते. त्यामुळे इंटरनेट सेवा संपूर्णपणे विस्कळीत झाली होती. सकाळीच इंटरनेट सेवा बंद पडल्याने नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला होता तर फोनही लागत नसल्याने एकमेकांशी संपर्क करणे सुद्धा अडचणीचे झाले होते. आज सकाळी 9 वाजल्यापासून हा नेटवर्क प्रॉब्लेम सुरु झाला होता. त्यानंतर सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान नेटवरची सेवा सुरळीत झाल्याने मोबाईल वापरणारे त्याचबरोबर इंटरनेट वापरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Maharashta Pune Crime News: पुण्याच्या तळजाई टेकडीच्या जंगलात धक्कादायक प्रकार घडला आहे. 24 मे रोजी दुपारी एका झाडाला दोरी बांधून गळफास
घेतलेल्या एकाचा मृतदेह सापडला आहे. मात्र या व्यक्तीची ओळख अजूनही स्पष्ट झाली नाही आहे.
OBC Reservation : राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चा भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चावतीने भारत बंदची हाक दिली आहे. याला बारामतीतील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. बारामतीतील दुकाने ही सकाळी 11 वाजेपर्यंत बंद ठेवून भारत बंदला पाठिंबा दिला आहे. ओबीसींची जातिनिहाय जनगणना करावी, जुनी पेन्शन योजना सुरू करावी या सह अन्य मागण्यासाठी हा बंद पुकारला आहे. बंदला बारामती चांगला प्रतिसाद मिळाला व्यापाऱ्यांसह दुकानदारांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवून या आंदोलनात सहभाग नोंदवला याचाच आढावा घेतला आहे.
Nanded News : वन अधिकारी असल्याचं सांगून अनेकांना गंडा घालणारा भामटा नांदेड पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. वन अधिकारी असल्याचं सांगून लोकांची फसवणूक करीत असलेल्या या तोतया वन अधिकाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलंय. वन अधिकारी म्हणून वन विभागाची वर्दी घालून फिरणारा आरोपी कपिल गणपत गायकवाड नांदेड शहरातील कौठा परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलाय. आरोपी कपिल काळे हा हदगाव तालुक्यातील निवघा येथील रहिवासी असून वन विभागाच्या फिरत्या पथकातील अधिकारी म्हणून अंगावर वन विभागातील रेंज फॉरेस्ट ऑफिसर, अधिकाऱ्याची वर्दी घालून, वन विभाग अधिकारी असल्याचे ओळ्खपत्र घेऊन व वाहनावर वन विभाग अधिकारी असल्याचे स्टिकर चिटकवून फिरत होता.
Sindhudurg News : आंबोली घाटात नानापाणी वळणावर ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ वेताळ-बांबर्डे गावातील समीर जाधव दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. ओव्हरटेक करताना ट्रकच्या चाकाखाली मिळाल्याने जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला असून त्याला मानसिक धक्का बसला आहे. हा अपघात रात्रीच्या सुमारास आंबोली नाना पाणी वळणावर घडला.
Shiv Sena MP Sanjay Raut On Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींचा विषय आमच्या दृष्टीनं संपलेला आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही 42 मतांचा कोटा संभाजीराजेंना द्यायला तयार होतो, असंही संजय राऊत म्हणाले. तसेच, संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावं एवढीच आमची अपेक्षा होती, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. संभाजीराजेंना राजकीय पक्षाचं वावडं असण्याचं कारण नाही. कारण यापूर्वीही अनेक लोकांनी, तसेच जे राजघराण्यातील आहेत, त्यांनीदेखील राजकीय पक्षात प्रवेश केला असून राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे संभाजीराजेंनीही शिवसेनेच्या नावावर निवडणूक लढवावी असंही राऊत म्हणाले आहेत.
Sindhudurg News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 28 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा पूर्णतः खासगी असल्याची माहिती मिळत आहे. मालवणमध्ये कार्यकर्त्यांच्या मुलाच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी शरद पवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. हेलिकॉप्टरने मालवण येथे येणार असून ते राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस याच्या मुलाच्या लग्नात सहभागी होऊन लागलीच सांगलीकडे रवाना होणार आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. विरोधकांकडून सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. "बारामतीच्या गड्याच्या अंगात कसले पार्ट घातले होते हे मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार," अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. सांगलीतील आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा शुभारंभ, लोकार्पण सोहळा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बनपुरी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात खोत बोलत होते.
Shooting In Texas : अमेरिकेच्या टेक्सासमधील शाळेत एका तरुणानं अंधाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबारात 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक मुलं गोळीबारात जखमी झाली आहेत. हल्लेखोर तरुण 18 वर्षांचा असून मशीनगननं शाळेत गोळीबार केल्याची माहिती आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 18 वर्षीय हल्लेखोर युवकाचा मृत्यू झाला आहे.
IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) आमने सामने येणार आहेत. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालीफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाची भिडणार आहे. तर, पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपेल. यामुळं आयपीएल 2022 मधील आपलं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. लखनौच्या संघाचं नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करत आहे. तर, आरसीबीच्या संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) संभाळत आहे.
Petrol-Diesel News : मध्य प्रदेशमध्ये आज संध्याकाळी 7 ते 9 या दरम्यान पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी अबकारी कराच्या नावाखाली जो अॅडव्हान्स घेतला आहे, तो अॅडव्हान्स आता दर कमी झाल्यानंतर परत करण्यात यावा अशी मागणी पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनची केली आहे. त्यामुळे ही बंदची हाक देण्यात आली आहे.
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावरून भारतात परत येणार आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी क्वॉड देशांच्या प्रमुखांची भेट घेतली. या दौऱ्यामध्ये मोदींनी जपानच्या प्रमुख उद्योगपतींची भेट घेतली.
Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी मशीद प्रकरणी न्यायालयात आता आणखी एक याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. माहितीनुसार, दाखल करण्यात आलेल्या नव्या याचिकेत ज्ञानवापी परिसर हिंदूंच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे. विश्व वैदिक सनातन संस्थेचे सरचिटणीस किरणसिंह बिसेन यांनी ही याचिका दाखल केली आहे.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांचे नाव फायनल केले आहे. आज संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने संजय पवार यांचे नाव फायनल केल्याचं संजय राऊत यांनी आज सांगितलं.
संभाजीराजे छत्रपतींनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे संभाजीराजेंची नेमकी भूमिका काय हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
वाराणसी- ज्ञानवापीशी संबंधीत दुसऱ्या याचिकेवर आज सुनावणी
ज्ञानवापीशी संबंधीत दुसऱ्या याचिकेवर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. ज्यात ज्ञानवापीचा पूर्ण ताबा हिंदूना द्या, विश्वेश्वरच्या नियमित पूजेची परवानगी द्यावी, ज्ञानवापी परिसरात मुसलमानांना बंदी घालण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या याचिकेवर आज दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. दरम्यान, या संबंधिच्या एका याचिकेची सुनावणी ही 26 रोजी होणार आहे.
हिंदू पक्षाची काय भूमिका आहे?
1. शृंगार गौरीच्या रोजच्या पूजेची मागणी.
2. वाजुखान्यात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या पूजेची मागणी.
3. नंदीच्या उत्तरेकडील भिंत तोडून डेब्रिज हटवण्याची मागणी.
4. शिवलिंगाची लांबी, रुंदी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षणाची मागणी.
5. वाळूखान्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी.
मुस्लिम पक्षाची बाजू
1. वजूखाना सील करण्यास विरोध
2. 1991 कायद्यांतर्गत ज्ञानवापी सर्वेक्षण आणि खटल्यावर प्रश्नचिन्ह.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावरून आज भारतात परतणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावरून भारतात परत येणार आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी क्वॉड देशांच्या प्रमुखांची भेट घेतली. या दौऱ्यामध्ये मोदींनी जपानच्या प्रमुख उद्योगपतींची भेट घेतली.
आज सकाळी 11 वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक
ऑल इंडीया बॅकवर्ड अँण्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लाईज फेडरेशनची भारत बंदची हाक
केंद्र सरकारकडून विविध मागासवर्गीयांच्या जनगणनेला नकार दिल्या विरोधात ऑल इंडीया बॅकवर्ड अँण्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लाईज फेडरेशनने आज भारत बंदची हाक दिली आहे.
मध्य प्रदेशमध्ये आज संध्याकाळी 7 ते 9 मध्ये पेट्रोलपंप बंद
मध्य प्रदेशमध्ये आज संध्याकाळी 7 ते 9 या दरम्यान पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी अबकारी कराच्या नावाखाली जो अॅडव्हान्स घेतला आहे, तो अॅडव्हान्स आता दर कमी झाल्यानंतर परत करण्यात यावा अशी मागणी पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनची केली आहे. त्यामुळे ही बंदची हाक देण्यात आली आहे.
लखनौ आणि बंगळुरू यांच्यात आज लढत
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) आमने सामने येणार आहेत. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालीफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाची भिडणार आहे. तर, पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपेल. यामुळं आयपीएल 2022 मधील आपलं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. लखनौच्या संघाचं नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करत आहे. तर, आरसीबीच्या संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) संभाळत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -