Maharashtra Breaking News 24th May 2022 : लोकल ट्रेनखाली म्हैस आल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 May 2022 09:15 PM
Beed News Update : बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येची मानवी हक्क आयोगाकडून दखल 

बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येची दखल मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. या प्रकरणात अहवाल सादर करण्याचे आदेश मानवी हक्क आयोगाने साखर आयुक्त आणि बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांना दिले आहेत. 


 गेल्या काही दिवसांपूर्वी बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतकरी नामदेव जाधव यांनी आपला ऊस कारखान्याला जात नसल्याने ऊस पेटवून देऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. याच घटनेची मानवी हक्क आयोगाने  स्वतःहून दखल घेतली असून या प्रकरणात तातडीने अहवाल दाखल करण्याचे आदेश देऊन 13 जून रोजी यावर सुनावणी होणार असून बीडचे जिल्हाधिकारी आणि साखर आयुक्त यांना हजर  राहण्यासाठी समन्स देखील बजावण्यात आले आहे.


बीड जिल्ह्यामध्ये सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर असून अनेकदा शेतकरी यावर तोडगा निघावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे  विनंती करत आहेत. त्यातच आता अतिरिक्त उसाच्या प्रश्नावरून बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मानवी हक्क आयोगाचे समन्स बजावल आहे. 

Rajya sabha Election : संभाजीराजे यांना दिलेलं आश्वासन पाळावं अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत पाणी पाजू ; मराठा समन्वयकांचा इशारा   

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांना उमेदवारी न दिल्यामुळे संभाजी राजे यांचे समर्थक नाराज झाले असून संभाजी राजे यांना संधी द्यावी असे मराठा समन्वयकांनी म्हटले आहे. संभाजीराजे यांना दिलेलं आश्वासन पाळावं अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत पाणी पाजू असा इशारा मराठा समन्वयकांनी दिला आहे.  

 Mumbai News :  मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनखाली म्हैस आल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत

 Mumbai News :  मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेन खाली म्हैस आल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे, लोकल ट्रेन नंतर येणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस, मुंबई एक्सप्रेस आणि पुणे इंदोर एक्सप्रेस रखडल्या आहेत. कर्जतवरून मुंबईकडे येणारी वाहतूक उशिराने सुरू आहे. वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Rajya sabha Election : माझ्यावर टाकलेला विश्वास चांगलं काम करुन सार्थ ठरवेन ; संजय पवार  

"माझ्या नावाची घोषणा झाल्याने खूप आनंद झाला आहे. मला देखील आत्ताच माहिती पडलं. परंतु, मला अजून याबाबत निरोप नाही. उमेदवारी जाहीर झाली असली तर सगळी तयारी करावी लागणार आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो चांगलं काम करुन सार्थ ठरवेन, असे मत संजय पवार यांनी व्यक्त केले आहे. 


"जो शिवसैनिक 30 वर्ष काम करत आहे तो उद्धव ठाकरे यांना देव मानतो. मातोश्रीला मंदिर मानतो, अशा शिवसैनिकाला संधी दिली याबद्दल आभार. मी शाखाप्रमुखापासून सुरुवात करत इथपर्यंत पोहोचलो आहे. मला ही संधी दिली, असं कुठल्या पक्षात घडतं? फक्त शिवसेनेतच घडतं. ज्या लोकांनी मला संधी दिली त्यांचे धन्यवाद, असे संजय पवार यांनी म्हटले आहे. 

Sanjay Raut :  संजय राऊत 28 मे ला कोल्हापूर दौऱ्यावर

Sanjay Raut :  संजय राऊत 28 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. संभाजीराजेंना अंगावर घेतल्यानंतर संजय राऊत कोल्हापुरात येणार आहे. 28 मे रोजी राऊत यांची जाहीर सभा आहे. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने राऊत कोल्हापुरात जाणार आहे.  संजय राऊतांवर संभाजीराजे समर्थक नाराज झाले आहेत

Kolhapur News Update : इचलकरंजीत कापड गाठीने भरलेल्या ट्रकला आग, लाखोंचं नुकसान

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील लायकर मळ्यातील एका बिअर बारजवळ कापडाच्या गाठीने भरलेल्या ट्रकला मंगळवारी दुपारी आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आगीत लाखो रुपये किंमतीच्या कापड गाठी जळून खाक झाल्या आहेत.  

नसीम खान यांचा मुंबई काँग्रेसच्या प्रचार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

Congress : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथील नवसंकल्प शिबिर घोषणापत्रातील ‘एक व्यक्ती’ एक पद’ या घोषणेच्या अंमलबजावणीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये सुरुवात झाली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी याची सुरुवात करत मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Nagpur News Update : वडिलांकडून स्वत:च्या दहा वर्षाच्या मुलाची हत्या  

दहा वर्षांचा मुलगा घरी पाणी भरत नाही या कारणावरून क्रूर बापानेच त्याची हत्या केल्याची घटना नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या सुरादेवी या ठिकाणी घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी बापाला अटक केली आहे.  

Rajya sabha Election : संभाजीराजेंच्या उमेदवारीवरुन महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना छावा संघटनेचा इशारा

शिवसेनेकडून छत्रपतींसोबत जो अटी शर्थींचा खेळ सुरू आहे हा महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही आहे. तसेच शिवसेनेच्या व्यक्तिरिक्त बाकी पक्ष जी बघ्याची भूमिका घेत आहेत ते ही महाराष्ट्राला आणि आम्हाला आवडलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेने तात्काळ पाठिंबा जाहीर करावा नाहीतर मतांची बेरीज कशी गोळा करायची हे आम्हाला चांगलेच जमते असा इशारा छावा संघटनेने केला आहे. शिवसेनेने या आधी प्रितिश नंदी, नारायण आठवले, राजकुमार धुत, चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, एकनाथ ठाकूर, भरतकुमार राऊत यांना खासदारकी देताना शिवसेनेत प्रवेश करणे सक्तीचे केले होते का? किंवा शिवबंधन बांधले होते का? मग आता संभाजीराजेंनाच ही अट का? असा सवालही विचारण्यात आला आहे. 

Maharashtra News : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांना उमेदवारी : संजय राऊत

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असून त्यांच्या नावाची अघिकृत घोषणा थोड्याच वेळात करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. 

मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील स्कुबा बोट बुडून दोघांचा मृत्यु

मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील स्कुबा बोट बुडून दोघांचा मृत्यु झाला आहे. तर सहा जण गंभीर आहेत. याप्रकरणी बोट मालक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Navi Mumbai Election : नवी मुंबई मनपा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

Navi Mumbai Election : नवी मुंबई मनपा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर देखील  चर्चा झाली. बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना नेते विजय नाहटा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक उपस्थित होते. 31 मे रोजी जाहीर होणाऱ्या आरक्षणा नंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणार आहे.  बैठकीचा निर्णय प्रदेश पातळीवर पाठवला जाणार आहे.

मादी धामण सापाने दिली 12 अंडी

अंबरनाथमध्ये  एका मादी धामण सापाने 12 अंडी दिली आहेत. प्रकाश गोइल या सर्प मित्राने या मादी सापाला रेस्क्यू करून आणले होते.

Mumbai Crime News : मुलुंडमध्ये शाळेच्या शिपायाकडून साडेपाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

Mumbai Crime News : मुलुंड पूर्व येथील एका प्रसिद्ध शाळेत शाळेच्या शिपायानं पटांगणात खेळण्यास आलेल्या साडेपाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हेमंत दामोदर वैती असं या 51 वर्षीय नराधमाचं नाव आहे. काल संध्याकाळी पाच  वाजताच्या दरम्यान या शाळेच्या पटांगणात ही बाजूलाच रहाणारी पीडित मुलगी एकटीच खेळत होती. या नराधम शिपायाची नजर या एकट्या खेळत असलेल्या मुलीवर पडली. त्यानं या मुलीला बोलावून घेतलं आणि शाळेतील एका खोलीत नेऊन तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. पीडित मुलीनं झालेली सर्व घटना घरी जाऊन आपल्या आईला सांगितली. तिच्या आईनं तात्काळ नवघर पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली. नवघर पोलिसांनी याबाबत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला ठाणे येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. सदर आरोपी हा या शाळेत गेले तीस वर्ष शिपाई म्हणून काम करीत आहे. त्यानं या अगोदर देखील असे काही गुन्हे केलेत का? याची चौकशी आता पोलीस करीत आहेत. 

Gyanvapi Mosque Case : ज्ञानवापी प्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी

Gyanvapi Mosque Case : ज्ञानवापी प्रकरणी आज वारणीसीच्या जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली. आज दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. याप्रकरणी आता 26 मे रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे. सुनावणीनंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन म्हणाले की, "खटला फेटाळण्यासंदर्भात मुस्लिम बाजूच्या आदेश 7 11 सीपीसी अंतर्गत याचिकांवर 26 मे रोजी सुनावणी होईल." न्यायालयानं दोन्ही पक्षांना आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवून आठवडाभरात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

Malvan News : सिंधुदुर्ग:  मालवणमध्ये बोटिंगसाठी गेलेली जय गजानन बोट बुडाली; दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Malvan News : सिंधुदुर्ग:  मालवणमध्ये  जय गजानन बोट बुडाली; दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेली बोट बुडाली, तिघांची प्रकृती गंभीर

Sindhudurg News : मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेली बोट बुडाली. 20 पर्यटक घेऊन स्कुबा डायव्हिंग करुन परतीच्या मार्गावर असताना समुद्र किनाऱ्यापासून जवळ बोट आली असता बोट बुडाली. यामध्ये तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. 

कुतुब मिनार प्रकरणात साकेत कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला, 9 जूनला कोर्ट देणार निकाल

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे हिला 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी; अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गतच्या गुन्ह्यात मिळाली कोठडी

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे हिला 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी; अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गतच्या गुन्ह्यात मिळाली कोठडी. केतकी जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता. 

Maharashtra News : सूर्यावर थुंकल्यानंतर काय होतं, हे मनसेनं विसरू नये; मनसेने व्हायरल केलेल्या फोटोवर राष्ट्रवादीचं उत्तर

Maharashtra News : मनसेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार ब्रुजभूषण सिंहांचे फोटो व्हायरल केलेत. हे फोटो पुण्याच्या मावळमध्ये 2018 साली कुस्ती केलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील आहेत. यावर आता आयोजक सचिन घोटकुले यांनी स्पष्टीकरण दिलंय. कुस्त्यांचा हा आखाडा 2018 साली शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातच आमचे नेते शरद पवार हे महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष असल्याने आम्ही भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष म्हणून ब्रुजभूषण सिंहांना आमंत्रित केले होते. मात्र मनसेने त्यावेळचे फोटो व्हायरल करत, सोशल मीडियावर चुकीच्या अर्थाने पसरवले आहेत. त्यातून पवार साहेबांवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. पण सूर्यावर थुंकल्यानंतर काय होत, हे मनसेने विसरू नये. असा पलटवार आयोजक आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुलेंनी केला आहे. 

Maharashtra News : कुस्तीतल्या कार्यक्रमाचा फोटो, राजकारणाशी त्याचा काहीही संबंध नाही : गृहमंत्री

Maharashtra News : जुनी प्रकरणं उकरून मंदिर-मशीद वाद योग्य नव्हे : गृहमंत्री

Maharashtra News : बॉलिवूड निर्माता अविनाश दास यांची मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव 

Maharashtra News : बॉलिवूड निर्माता अविनाश दास यांची मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव. आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी. 


दास यांच्यावर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा एका महिला आयएएस अधिकारीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


गुजरातच्या अहमदाबाद मध्ये दाखल झाली आहे एफआयआर 


दास यांचा शोध घेत आहेत गुजरात पोलीस 


आपली अटक टाळण्यासाठी दास यांनी हायकोर्टात दाखल केला आहे ट्रांजिस्ट अटकपूर्व जामीन अर्ज

हुबळीजवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसचा अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू, 26 जखमी
Belgoan News : हुबळीजवळील तारीहाळ बाय पास इथे बस आणि ट्रक अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला. नॅशनल ट्रॅव्हलची बस कोल्हापूरहून बंगलोरला निघाली होती. बस चालकाने समोरील ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. यामध्ये ट्रक ड्रायव्हर, क्लिनर आणि बसमधून प्रवास करणारे चार जणांचा मृत्यू झाला. अपघातात पाच जणांनी जागीच प्राण सोडले तर हॉस्पिटलमधे उपचार सुरु असताना बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तांदळाची वाहतूक करणारा ट्रक मुंबईकडे निघाला होता. अपघातातील जखमींना हुबळी येथील हॉस्पिटलमधे हलवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अपघाताचे वृत्त कळताच हुबळी पोलीस आयुक्त लभुराम यांनी अपघात झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
जिल्हा परिषद अध्यक्षांनी लेट लतीफ कर्मचाऱ्यांना सुनावले खडे बोल

Bhandra News : शिक्षक सेवानिवृत्त झाला तरी आपली शिस्त कधीही विसरत नाही. याची प्रचिती भंडारा जिल्हा परिषदेत पाहायला मिळाली असून, आपल्या कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेले विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष  गंगाधर जीभकाटे यांनी चक्क जिल्हा परिषदेतील लेटलतीफ कर्मचाऱ्यांची क्लास लावली आहे. यावेळी स्वतः जिल्हा परिषद कार्यलयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर एका खुर्चीवर बसून त्यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्याना खडे बोल सुनावले असून वेळेत येण्याची तंबी सुद्धा दिली आहे. दरम्यान सतत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही करणार असल्याचा इशाराही  त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे जवळपास सर्वच कर्मचारी दिड तास उशिरा येत असल्याचे निदर्शनात आले आहे.

IPL 2022 : गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने

IPL 2022 : गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज (24 मे) पहिला क्वालीफायर सामना खेळला जाणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून थेट अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. कारण, या सामन्यात पराभूत झालेला संघाला एलिमिनेटर सामन्यात विजयी झालेल्या संघासोबत क्वालीफायरचा दुसरा सामना खेळावा लागणार आहे. क्वालीफायर- 2 मध्ये जिंकणारा संघ क्वालीफायर-1 मध्ये जिंकलेल्या संघाशी अंतिम सामना खेळेल.

Gyanvapi Mosque : वाराणसी कोर्ट आज सुनावणार निकाल

Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. न्यायालय मंगळवारी दुपारी 2 वाजता निकाल सुनावणार आहे. तसेच पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हेसुद्धा मंगळवारीच सांगण्यात येणार आहे. तसंच याबाबतच्या अन्य पुरवणी याचिकांवरही विचार करण्याचे न्यायालयाने ठरवले आहे. दरम्यान, न्यायालयीन सुनावणी सुरू होण्यापूर्वी न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुनावणीच्या वेळी पक्षकार आणि वकिलांनाच प्रवेश देण्यात आला होता. सर्वेक्षणासाठी यापूर्वी नियुक्त केलेले न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांचेही नाव यादीत नसताना त्यांना परत पाठण्यात आले.

PM Modi : पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याशी करणार चर्चा

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, उद्या (24 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी क्वाड समिटमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जपानमध्ये क्वाड नेत्यांची दुसरी ​​शिखर परिषद होत आहे. या परिषदेत चारही देशांच्या नेत्यांकडून विकासाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलली जातील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


वाराणसी कोर्ट आज सुनावणार निकाल


ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. न्यायालय मंगळवारी दुपारी 2 वाजता निकाल सुनावणार आहे. तसेच पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हेसुद्धा मंगळवारीच सांगण्यात येणार आहे. तसंच याबाबतच्या अन्य पुरवणी याचिकांवरही विचार करण्याचे न्यायालयाने ठरवले आहे. दरम्यान, न्यायालयीन सुनावणी सुरू होण्यापूर्वी न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुनावणीच्या वेळी पक्षकार आणि वकिलांनाच प्रवेश देण्यात आला होता. सर्वेक्षणासाठी यापूर्वी नियुक्त केलेले न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांचेही नाव यादीत नसताना त्यांना परत पाठण्यात आले.


पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याशी करणार चर्चा


 पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, उद्या (24 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी क्वाड समिटमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जपानमध्ये क्वाड नेत्यांची दुसरी ​​शिखर परिषद होत आहे. या परिषदेत चारही देशांच्या नेत्यांकडून विकासाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलली जातील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.


गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स  आमनेसामने


गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज (24 मे) पहिला क्वालीफायर सामना खेळला जाणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून थेट अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. कारण, या सामन्यात पराभूत झालेला संघाला एलिमिनेटर सामन्यात विजयी झालेल्या संघासोबत क्वालीफायरचा दुसरा सामना खेळावा लागणार आहे. क्वालीफायर- 2 मध्ये जिंकणारा संघ क्वालीफायर-1 मध्ये जिंकलेल्या संघाशी अंतिम सामना खेळेल.


एथर इंडस्ट्रीजचा आयपीओ आज बाजारात


रसायनांची निर्मिती करणाऱ्या 'इथर इंडस्ट्रीज' ची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या 24 मेपासून खुली होत असून गुंतवणूकदारांना 26 मेपर्यंत अर्ज करता येईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.