Maharashtra Breaking News 15 June 2022 : अलिबाग शहरालगत असलेल्या पीएनपी नाट्यगृहाला आग

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jun 2022 07:34 PM
नुपुर शर्मा यांच्यावर बीड मध्ये गुन्हा दाखल
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण देशभर याचे पडसाद उमटले होते. बीड निपुर शर्मा यांच्या विरोधामध्ये रोष व्यक्त करत बीड मध्ये देखील मुस्लिम बांधवांनी नुपुर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर आता बीडच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये सय्यद अजीम यांच्या फिर्यादीवरून कलम 505 आणि 295 अ नुसार नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर 

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर... पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 250 पदांच्या नियुक्तीसाठी लवकरच परीक्षा होणार आहे. 


 


सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व 
पोलीस शिपाई यांना मिळणार संधी


पोलीस उपनिरीक्षक मर्यादित 
विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा- २०२१चे आयोजन

विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसची विधानभवनात बैठक सुरू

विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसची विधानभवनात बैठक सुरू


बैठकीला काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अस्लम शेख, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड उपस्थित


मागील अर्ध्या तासापासुन विधानभवनात बैठकीला सुरुवात


बैठकी मध्ये आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती बाबत चर्चा सुरू

Aurangabad : काँग्रेसकडून मोदींचा पुतळा जाळला

Aurangabad News: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर ईडीकडून करण्यात येत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये युवक काँग्रेस आक्रमक होताना पाहायला मिळाली. या कारवाईचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीचा संयुक्त पुतळा जाळण्यात आला. यावेळी भाजप विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. 



Alibagh Fire : अलिबाग शहरालगत असलेल्या पीएनपी नाट्यगृहाला आग

अलिबाग शहरालगत असलेल्या पीएनपी नाट्यगृहाला आग लागली आहे. या आगीनंतर परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या १० दिवसात नवी मुंबईत तीन हजार कोरोना रूग्ण..

गेल्या काही दिवसात कोरोनाची संख्या वाढताना दिसत आहे. याचा परिणाम नवी मुंबईतही जाणवू लागला असून दिवसाला २५० ते ३०० कोरोना रूग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे गेल्या १० दिवसात नवी मुंबईत जवळपास तीन हजार कोरोना रूग्णांची भर पडली आहे. कोरोनाची वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता महानगर पालिका कडून  सिडको एग्झिबिशन मधील जंम्बो कोरोना सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. कोरोना लक्षणे आढळून आलेल्या रूग्णांचे घरातच विलगीकरण होत नसेल तर त्यांना या कोरोना सेंटर मध्ये उपचारासाठी ठेवले जात आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी टेस्टींग संख्या वाढविण्यात आली आहे. ज्या सोसायटी मध्ये कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत तेथील सर्व रहिवाशांची कोरोना टेस्ट केली जात आहे. त्याच बरोबर ६० वर्षावरील वयोवृध्दांना बुस्टर ठोस आणि १५ वर्षा पर्यंतच्या विद्यार्थ्यांना  दुसरा ढोस देण्यावर मनपाच्या आरोग्य विभागाने भर दिलाय.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेसाठी भाजपने कंबर कसली, भाजपचे सर्व आमदारही हॉटेलवर थांबणार

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपचे सर्व आमदारही आता हॉटेलवर थांबणार आहेत. 18 तारखेपासून भाजप आमदारांचा हॉटेलवर मुक्काम असणार आहे. हॉटेल ताज प्रेसिडेंनसमध्ये भाजपच्या सर्व आमदारांचा मुक्काम असणार आहे. 

तळकोकणात तीन दिवसांच्या विश्रातीनंतर पुन्हा अनके ठिकाणी मुसळधार पाऊस




Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, वैभववाडी या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मान्सूनने हजरी लावल्यानंतर तिसऱ्याच दिवशी गायब झालेला पाऊस आज पुन्हा सुरु झाला आहे. मात्र समाधानकारक पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 28.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी 151.3 मिमी पाऊस झाला आहे.




 

 


 
Mumbai News : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना हायकोर्टचा दिलासा कायम, 7 जुलैपर्यंत अटक न करण्याचे निर्देश

BJP Leader Narendra Mehta : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना हायकोर्टाने दिलासा कायम ठेवला आहे. मेहता यांना 7 जुलैपर्यंत अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. नरेंद्र मेहता यांच्यावर बेकायदेशीर मार्गानं संपत्ती जमा केल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आरोप असून गुन्हाही दाखल झाला आहे. मेहता हे भाजपाचे मीरा भाईंदर मधले महत्वाचे नेते आहेत. 

Mumbai News: कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या वादात राज्य सरकारला दिलासा; आदर्श वॉरट पार्क अॅण्ड रिसॉर्ट या खासगी कंपनीचा मालकी हक्क हायकोर्टानं फेटाळला, मात्र अजूनही इतरांच्या मालकी हक्काचा वाद प्रलंबित

Mumbai News:  कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या वादात राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. आदर्श वॉरट पार्क अॅण्ड रिसॉर्ट या खासगी कंपनीचा मालकी हक्क हायकोर्टानं फेटाळला. मात्र अजूनही इतरांच्या मालकी हक्काचा वाद प्रलंबित आहे.
मेट्रो कारशेडच्या कामाकरता राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा मुख्य वाद मिटणं आवश्यक आहे. 

Congress Protest: राहुल गांधींची ईडी चौकशी; दिल्ली पोलिसांकडून काँग्रेस मुख्यालयात घुसून कार्यकर्त्यांना मारहाण, काँग्रेस नेत्यांचा आरोप

Congress Protest : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तिसऱ्या दिवशीदेखील ईडी चौकशी सुरू आहे. या दरम्यान दिल्ली पोलिसांकडून काँग्रेस मुख्यालयात घुसून उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मुख्यालयात प्रवेश करण्यास मज्जाव केला असल्याचाही आरोप करण्यात आला.

सिंधुदुर्गातील आंबोलीत दुर्मिळ झाडांची ओळख पटवून देणारे नामफलक

Sindhudurg News : जैवविविधतेने संपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत दुर्मिळ झाडांची ओळख पटवून देणारे नामफलक लावण्यात आले आहेत. या फलकांवरती त्या झाडाचे नाव, त्याचं शास्त्रीय नाव आणि महत्त्व नमूद करण्यात आले आहे. कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि मलाबर नेचर कॉन्झर्वेशन क्लब आंबोली या निसर्ग संस्थेमार्फत त्या झाडांची ओळख पटवून देणारे हे नामफलक लावण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा वनाविभागाचाही यात समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड, वृक्ष जाळण्याचे प्रकार थांबवण्यासाठी म्हणून या प्रकारे फलक लावण्यात आले आहेत.

Monsoon Updates : तळकोकणात तीन दिवसांच्या विश्राती नंतर पुन्हा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन दिवसांच्या विश्रांती नंतर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, वैभववाडी या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मान्सूनने हजरी लावल्यानंतर तिसऱ्याच दिवशी गायब झालेला पाऊस आज पुन्हा सुरू झाला आहे. मात्र समाधान कारक पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 28.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी 151.3 मिमी पाऊस झाला आहे.

Solapur News : सोलापूर: नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना आता माफ करायला हवं: हाजी अराफात शेख, भाजपचे नेते

Solapur News : सोलापूर: नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना आता माफ करायला हवं अशी प्रतिक्रिया भाजप नेते हाजी अराफात शेख यांनी दिली आहे. कोणत्याही धर्माबाबत बोलणे चुकीचे आहे, नुपूर शर्मा यांचे वक्तव्य चुकीचे आहे. असे वक्तव्य ऐकल्यानंतर आमच्या ही मनाला वेदना होतात. या देशाला बाबरच्या नजरेतून बघू नये तर अजमेरच्या सरकार गरीब नवाज यांच्या नजरेतून बघावं असंही त्यांनी म्हटले. 

Gondiya News : गोंदियात ट्रकची ट्रॅक्टरला धडक; भीषण अपघातात एक ठार, सहा जण गंभीर जखमी. संतप्त नागरीकांकडून ट्रकची जाळपोळ

Gondiya News : गोंदियात ट्रकची ट्रॅक्टरला धडक; भीषण अपघातात एक ठार, सहा जण गंभीर जखमी. संतप्त नागरीकांकडून ट्रकची जाळपोळ करण्यात आली आहे. मुरदाडा येथे ही घटना घडली  असून रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली आहे. 

रत्नागिरीत शाळेच्या पहिल्याच दिवशी जमीन मालकाने विद्यार्थ्यांचा मार्ग रोखला, शाळेच्या जमिनीवर जमीन मालकाने दावा केल्याने विद्यार्थी भर पावसात शाळेबाहेर

Ratnagiri News : शाळेच्या पहिल्याच दिवशी जमीन मालकाने विद्यार्थ्यांचा मार्ग रोखला. शाळेच्या जमिनीवर जमीन मालकाने दावा केल्याने विद्यार्थी भरपावसात शाळेबाहेर उभे राहिले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील रायपाटण गावात हा प्रकार घडला. जिल्हा परिषदेची शाळा माझ्या जागेत आहे, असा दावा जमीन मालकाने केला. तर, शाळेच्या इमारतीचा सात बारा जिल्हा परिषदच्या नावावर असल्याची माहिती तंटामुक्ती अध्यक्षाने दिली. गटशिक्षण आणि इतर अधिकारी गावात दाखल झाले आहेत.

Maharashtra School : कल्याण: शाळेकडून विद्यार्थ्यांचे ढोलताशे लेझिम पथकांच्या गजरात स्वागत

Maharashtra School : Kalyan News : दोन वर्ष ऑनलाइनच्या गराड्यात अडकेलेले विद्यार्थी पहिल्यांदाच जून महिन्यात शाळेत आले. कल्याण पूर्वेकडील  प्रज्ञा भावे शाळेने मुलांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. प्रवेशद्वार फुगे, फुलांनी सजवलले होते. लेझिम, ढोलताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना वही पेन देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह दिसून येत होता. तर पश्चिमेकडील बालक मंदिर शाळेत देखील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश उत्सव आयोजित करण्यात आला होता. बालक मंदिर शाळेत आज अनेक चिमुकल्यांचा पहिला दिवस होता. पहिल्यांदाच चिमुकले शाळेत आले होते. या मुलांच्या स्वागतासाठी शिक्षकानी तयारी केली होती. या चिमुकल्यांचे रडणे, शिक्षकांचं समजावणं, मुलांचा किलबिलाट यामुळे शाळा दोन वर्षांनंतर गजबजून गेल्याचं दिसून आलं.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्राकडे सकारात्मक प्रस्ताव : सूत्र

Maratha Bhasha : मराठीला अभिजात भाषेला दर्जा देण्यासाठी केंद्राकडे सकारात्मक प्रस्ताव, गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिफारस : सूत्र

रिफायनरी प्रकल्प कोकणातच व्हावा, नारायण राणेंचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र

Ratnagiri News : रिफायनरी प्रकल्प कोकणातच व्हावा, असा मजकूर असलेलं पत्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांना लिहिलं आहे. रिफायनरी प्रकल्पाचं काम मार्गी लावण्यासाठी लवकरात लवकर हालचाली व्हाव्यात असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय लघु सुक्ष्म उद्योग रिफायनरी प्रकल्पासाठी संपूर्ण योगदान देण्यास तयार आहे.प्रकल्पाच्या रोडमॅपसाठी सर्व इंधन कंपन्या आणि मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली जावी, असा उल्लेख राणे यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

Maharashtra School Open : धुळे: तब्बल दोन वर्षानंतर शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत

Maharashtra School Open Dhule :  धुळे:  कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आजपासून अखेर सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळांचा परिसर गजबजून गेला. धुळे शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेले शिक्षण आता ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहे.  त्यामुळे आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद वाढून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढण्यास मदत होणार असल्याची भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली.

Buldhana News : बुलढाणा: देऊळगाव साकरशाजवळ अवैधपणे गाई घेऊन जाणाऱ्या दोन पिकअप ट्रक अज्ञात जमावाने जाळले, दोन ट्रक चालकांना जमावाकडून जबर मारहाण

Buldhana News : बुलढाणा: देऊळगाव साकरशाजवळ अवैधपणे गाई घेऊन जाणाऱ्या दोन पिकअप ट्रक अज्ञात जमावाने जाळले, दोन ट्रक चालकांना जमावाकडून जबर मारहाणl. मध्यरात्रीची घटना 

RBI Board : RBI बोर्डात आनंद महिंद्रा, पंकज पटेल आणि आणखी दोन उद्योगपतींचा समावेश

RBI Board: केंद्र सरकारने उद्योजक आनंद महिंद्रा , पंकज आर पटेल आणि वेणू श्रीनिवासन या उद्योजकांचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या  संचालक मंडळावर समावेश केला आहे. क्लिक करा वाचा सविस्तर बातमी

Aaditya Thackeray : आज आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा, शिवसेनेकडून जय्यत तयारी

Aaditya Thackeray : राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर असून आज ते अयोध्येत दाखल होणार आहेत. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचं मात्र अयोध्येत स्वागत केलं जाणार आहे. या दौऱ्याच्या वेळी आदित्या ठाकरे हनुमान गढीचं दर्शन घेणार असून प्रभू श्री रामाचं दर्शन करणार आहेत.  क्लिक करा वाचा सविस्तर बातमी

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..


आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


आज आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा
राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर असून आज ते अयोध्येत दाखल होणार आहेत. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचं मात्र अयोध्येत स्वागत केलं जाणार आहे. या दौऱ्याच्या वेळी आदित्या ठाकरे हनुमान गढीचं दर्शन घेणार असून प्रभू श्री रामाचं दर्शन करणार आहेत. संध्याकाळी 6.45 वाजता शरयू नदीच्या घाटावर आरती करणार आहेत. 


आज सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधींची चौकशी सुरु राहणार
सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधींना आज सलग तिसऱ्या दिवशी ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस राहुल गांधींची नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी चौकशी झाली. दोन्ही दिवस सुमारे 10 तास त्यांची चौकशी  करण्यात आली. 


राष्ट्रपतीपदासंदर्भात ममता बॅनर्जींनी बोलावली बैठक
राष्ट्रपतीपदाबाबत चर्चेसाठी ममता बॅनर्जींनी 22 पक्षांची बैठक बोलावली आहे. यासाठी शरद पवारांसह देशभरातील नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. राष्ट्रपतीपदाबाबत विरोधी पक्षाची एकजूट करण्यासाठी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील 22 पक्षांतील सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत राष्ट्रपती पदासाठी नेमका कोण उमेदवार असेल हे स्पष्ट होणार आहे. बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे आणि त्यांनीच विरोधी पक्षांतील नेत्यांना पत्र लिहिलं आहे. सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, स्टॅलिन, के चंद्रशेखर राव, नवीन पटनायक, अखिलेश यादव, शरद पवार, केजरीवाल, लालू प्रसाद यादव यांच्यासह 22 नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. 


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी होणार
18 जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी होणार आहे. 29 जूनपर्यंत नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. 18 जुलैला मतदान होईल. तर 21 जुलैला मतमोजणी होणार आहे. जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तरच मतदानाची वेळ येईल. 24 जुलैला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे. 


आजपासून प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरु होणार आहेत. पहिली ते दहावीच्या शाळा आजपासून सुरु होतील. 


भाजपचा फडणवीस, दानवेंच्या नेतृत्वात जालन्यात जल आक्रोश मोर्चा
जालना शहरालातील पाणी प्रश्न, रखडलेल्या विकास कामासह इतर मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील मामा चौकातून हा मोर्चा निघून नागरपालिकेवर धडकणार आहे. या मोर्चाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत.


अनिल परब यांना ईडीचं समन्स
अनिल परब यांना ईडीचं समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांना आज पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. याआधी 26 मे ला ईडीच्या पथकानं अनिल परबांच्या घरी येऊन त्यांची चौकशी केली होती. आता परत त्यांना समन्स बजावण्यात आला आहे. 


मलिक आणि देशमुखांना विधानपरिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी मिळणार?
मलिक आणि देशमुखांना विधानपरिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. दोघांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज एकत्रित सुनावणी होणार आहे. 20 तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या मतदानाच्या परवानगीसाठी देशमुख आणि मलिकांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. मलिक आणि देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. राज्यसभेच्या मतदानासाठी न्यायालयानं या दोघांना परवानगी नाकारली होती.


सुहास कांदेंच्या याचिकेवर आज सुनावणी
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यसभा निवडणुकीत त्यांचे मतदान रद्द करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कांदेंनी आव्हान दिलंय. "निवडणूक आयोगाने माझी बाजू न ऐकताच निर्णय दिला आहे तो मला मान्य नाही", असा दावा कांदेंनी केलाय. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.


केतकी चितळेच्या याचिकेवर आज सुनावणी
केतकी चितळेच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. न्यायालयानं यावरुन राज्य सरकारला खडसावलं होतं. सोशल मीडिया पोस्टवरून गुन्हे दाखल करत जाणं योग्य आहे का?, महिनाभर एका तरूणाला तुरूंगात डांबून ठेवणं हे पद्मविभूषण शरद पवारांना तरी आवडेल का? असे सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केले आहेत. आता गुन्हा रद्द करत या तरूणांना वाईट मार्गापासून परावृत्त करायला हवं, असं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय. शरद पवारांविरोधात पोस्ट करणाऱ्या नाशिकमधील तरूणाची गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. याचसंदर्भात मराठी कलाकार केतकी चितळेच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.


कांजूरमार्ग मेट्रो कारशेड संदर्भातील एका याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार
एका खासगी कंपनीला बहाल केलेल्या मालकी अधिकाराला राज्य सरकारकडून आव्हान देण्यात आलंय. मालकी हक्काचा आदेश न्यायालयाची दिशाभूल करून मिळवल्याचा राज्य सरकारचा आरोप आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये कांजूरमार्ग परिसरातील 6 हजार एकर जमीन 'आदर्श वॉटर पार्क अँड रिसॉर्ट' या खासगी कंपनीला देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते. या जागेवर केंद्र सरकारनंही आपला मालकी हक्क सांगितल्यानं मेट्रो कारशेडच्या कामाला न्यायालयानं स्थगिती दिली आहे- अमेय 


राणा दांपत्य आज सत्र न्यायालयात हजर राहणार
हनुमान चालीसा प्रकरण आणि राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत राणा दांपत्य मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार आहे. खासदार नवनीत राणांनी मुंबई पोलिसांनी अटकेत असताना आक्षेपार्ह वागणूक दिल्याची तक्रार लोकसभा विशेषाधिकार समितीकडे केली होती. या प्रकरणी या समितीनं राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, डीजीपी रजनीश सेठ, पोलिस कमिशनर संजय पांडेंना बोलावलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.