Sharad Pawar Pm Modi Meet : आमची कटुता शिवसेनेशी (Shiv Sena), राष्ट्रवादीशी (NCP) नाही; सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात सुधीर मुनगंटीवारांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर एबीपी माझाशी बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. 


सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?


भाजप नेते बोलताना म्हणाले की, "भाजप-शिवसेनेत प्रचंड कटुता आहे. तशी कटुता भाजप आणि राष्ट्रवादीत नाही हे नक्की. महाराष्ट्राच्या हितासाठी मोदी आणि पवार यांची भेट झाली असेल तर आनंदच आहे. मोदी-पवार मोठे नेते. त्यांच्यात महाराष्ट्राबाबत राजकीय चर्चा झाली का? हे सांगणं कठीण आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "महाराष्ट्रात सुरु असलेल्या कारवायांचा राजकीय अर्थ लावणं योग्य नाही, हे या भेटीत मोदीजी पवारांना माहिती देऊन समजावू शकतील." 


पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात भेट 


राज्यात ईडीच्या कारवाया सुुरु आहेत. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. त्यातच राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झालीय. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात या दोन्ही नेत्यांची भेट झालीय. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. याआधी 17 जुलै 2021 रोजी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट झाली होती. त्यातच आता महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदी-पवार भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. 


मोदी-पवार भेटीच्या 'या' कारणामुळे रंगल्यात चर्चा 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची ही वन टू वन भेट झाली. दोघांमध्येच  20 ते 25 मिनिटं चर्चा झाली. भेटीचा विषय नेमका समजू शकलेला नाही. पण राजकीय चर्चा झाली असल्याची दाट शक्यता आहे. राज्यातील परिस्थितीबाबत ही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होते तेव्हा त्याची कायम चर्चा होते. आजच्या भेटीचं टायमिंगही महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी, ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. त्याआधी सकाळीच राज्य सरकारने ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात असलेल्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते समजले जाणारे अनिल देशमुख आणि नवाब मलिकदेखील तुरुंगात आहेत.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sharad Pawar meets PM Modi: PM मोदी आणि शरद पवार यांच्यात भेट, चर्चांना उधाण