मुंबई : मराठी भाषा ही जगातील प्रमुख दहा भाषांपैकी एक आहे. ती सहजासहजी मरणार नाही, नष्ट होणार नाही. पण मराठी भाषा टिकण्यासाठी प्रत्येकाने मराठीत बोललंच पाहिजे. आपल्याला आपल्या भाषेत स्वीकारतील की नाही हा विचार कशाला? शहरी आणि ग्रामीण भाषा असा भेद नको. पाणी म्हटलं काय आणि पानी म्हटलं काय, लगेच गावंडळ म्हणून मोकळे होतात. पण त्यात गावंडळ काय? आपण आपल्या भाषेवर हसणं आधी बंद केलं पाहिजे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावलं.
स्वत:च्या भाषेची लाज बाळगणं आधी बंद करा
तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम राहिलात तर समोरचा तुमची भाषा समजून घेतो. स्वत:च्या भाषेची लाज बाळगणं आधी बंद करा, असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. शनिवारी ही मुलाखत संध्याकाळी 5 वाजता एबीपी माझावर पाहता येणार आहे
मराठी दुकानदार, व्यावसायिक, भाजीवाले वगैरे सगळ्यांनी मराठीत बोलावं
मराठी दुकानदार, व्यावसायिक, भाजीवाले वगैरे सगळ्यांनी मराठीत बोलावं. महात्मा गांधी जेव्हा कधी बोलायचे तेव्हा ते गुजरातीत बोलायचे. टागोरांनी बंगालीमध्ये साहित्य लिहिलं. सत्यजीत रे यांनी एकच हिंदी चित्रपट काढला, बाकी सर्व बंगालीत काढले. त्यामुळे हे आपल्याच भाषेत भीती आहे की मराठीत बोललो की स्वीकारतील की नाही. ही भीती बाळगण्याचं कारण नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
मराठी भाषा हे तुमचं अस्तित्व आहे. ते टिकवणं गरजेचं आहे. मराठी भाषा कशासाठी पाहिजेत हे आम्हाला विचारतात. काय गरज आहे, कशाला पाट्या हव्यात वगैरे असं विचारलं जातं. पण या मूठभर लोकांकडे दुर्लक्ष करायचं असतं, असं राज ठाकरे म्हणाले.
मराठी पाट्यांबाबत अडचण काय?
दक्षिणेतील लोक त्यांच्या भाषेवर ठाम असतात. गुजरातमध्ये गुजराती बोलतात. मग आपल्याला मराठी बोलण्यात, मराठीच्या बोर्डबाबत अडचण काय? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
मराठीत आपण जिथे होतो, ज्या ज्या क्षेत्रात होतो, त्यामध्ये अपवादाने वर गेलो अन्यथा, खालीच येतोय. यामध्ये चित्रपट, संगीत, कला असेल असं का घडतंय प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, "मराठीमध्ये त्या ताकदीचे साहित्यिक बनत नाहीत, कवी बनत नाहीत, त्या ताकदीचे दिग्दर्शक बनत नाहीत. चांगल्या गोष्टी करणारे आहेत, पण तेव्हाचे साहित्यिक, कलाकार, हे समाजावर संस्कार करायचे. ते एक पायरी वरती आहेत हे समाजाला समजायचं. त्यामुळे समाज त्यांचे संस्कार घ्यायचा. ती गोष्ट होती ती हळूहळू कमी झाली".
साहित्यिकांनी व्यक्त व्हा
पूर्वीचे साहित्यिक एखाद्या घटनेवर मतं व्यक्त करायचे. हल्ली मतंच व्यक्त करत नाहीत. महाराष्ट्र हा खूप मोठा आहे. इतर राज्यातील साहित्यिकांनी व्यक्त केलं काय आणि नाही काय याला महत्व नाही, पण महाराष्ट्रातील साहित्य, कलाकार, आर्टिस्टनी त्या त्या घटनांवर व्यक्त व्हायलाच हवं. हे चूक की बरोबर हा विषय नंतरचा पण मत व्यक्त करणं हे तर व्हायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.