Bhandara Gondia Loksabha: आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) रणधुमाळीला पूर्व विदर्भापासून (Vidarbha) सुरुवात होणार असून त्याकरिता आता अवघे 5 दिवस शिल्लक राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर विदर्भात (Vidarbha) जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली असून पक्षातील दिग्गजांनीही प्रत्यक्ष मैदानात उतरून मतदारांना साद घातली आहे. अलिकडेच चंद्रपूर (Chandrapur) आणि नागपुरच्या कन्हान येथे पंतप्रधानांच्या (PM Modi In Maharashtra) दोन भव्य सभा पार पडल्यानंतर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देखील विदर्भाचा दौरा करणार आहेत.


पूर्व विदर्भातील महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची आज भंडाऱ्याच्या साकोलीत भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. तर उद्या, 14 एप्रिलला याच ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची देखील भव्य प्रचार सभा होत आहे. त्यामुळे भंडाऱ्यात काँग्रेस पाठोपाठ भाजपची देखील तोफ धडाडनार असून अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यताही वार्तविण्यात येत आहे. एकीकडे राज्याचे राजकारण तापले असले तरी या प्रचार सभांवर अवकाळी पावसाचे सावटही असल्याचे बोलले जात आहे. 


राहुल गांधी यांची आज भंडाऱ्यात सभा


लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा नारळ हा पूर्व विदर्भापासून फुटणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भात येत्या 19 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच जिल्ह्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षानी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत मतदारांपर्यंत पोहचण्याचे कसोशीचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यात अगदी  तळागाळातील कार्यकर्त्यांसह पक्षातील दिग्गजही प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत. अशातच आज, पूर्व विदर्भातील महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भंडाऱ्याच्या साकोलीत आज दुपारी सभा होत आहे.


काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन 


भंडारा-गोंदिया लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्यासह पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली या पाचही लोकसभेच्या उमेदवारांसाठी ही प्रचार सभा साकोलीत होत आहे. या सभेला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते साकोलीत येत आहेत. या सभेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त मागील दोन दिवसांपासून तैनात करण्यात आलेला आहे. या सभेला लाखोच्या संख्येत नागरिक उपस्थित राहतील, असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह मतदारसंघातील साकोलीत ही सभा होत असल्यानं ही सभा यशस्वी करण्यासाठी नाना पटोले मागील आठवडाभरापासून भंडाऱ्यात तळ ठोकून आहेत.


अमित शाह उद्या विदर्भाच्या दौऱ्यावर 


अलिकडेच चंद्रपूर आणि नागपुरच्या कन्हान येथे पंतप्रधानांच्या दोन भव्य सभा पार पडल्यानंतर आता भाजपचे स्टार प्रचारक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उद्या विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ भंडाऱ्याच्या साकोली येथे आयोजित भव्य जाहीर सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत. त्या अनुषंगाने भाजपच्या वतीने जोरदार नियोजन करण्यात आले असून भाजपमधील अनेक दिग्गज या सभेला उपस्थित राहणार आहे. असे असले तरी विदर्भात सलग कोसळणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे सावटही या प्रचार सभेवर असल्याचे बोलले जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या