Nitin Gadkari In Ramtek: देशात काँग्रेसला (Congress) गेल्या साठ वर्षाहून अधिकच्या कार्यकाळात जो विकास करता आला नाही तो पंतप्रधानांच्या नेतृत्वात उण्यापुऱ्या दहा वर्षात या देशात झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वात विदर्भातील जनतेच्या वतीने मी पंतप्रधानांना हा विश्वास देऊ इच्छितो की विदर्भातील (Vidarbha) पूर्णच्या पूर्ण दहाही जागा महायुती (Mahayuti) मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) बोलताना व्यक्त केलाय. आज नागपुरातील कन्हान येथे होत असलेल्या पंतप्रधानांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. 


संविधानात बदल करण्याचे पाप काँग्रेसने केलं


गेल्या दहा वर्षाच्या काळात नागपूर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. मात्र विकासकामांमुळे आमच्यावर टीका करता येत नसल्याने विरोधक अप्रचार करत फिरत आहेत. काँग्रेसचे असे म्हणणे आहे की, भाजपने देशात 400 जागांवर विजयी मिळवला तर ते देशाच्या संविधानामध्ये बदल करतील. मात्र पंतप्रधानांसह महायुतीतील प्रत्येक नेत्यांचे असे मानणे आहे की, देशाचे संविधान हे आमच्यासाठी सर्वोच्च आणि अतिशय पवित्र आहे. त्यामुळे त्यात कदापि बदल केला जाणार नाही. मात्र खऱ्याअर्थाने या देशाचे संविधान तोडण्याचे पाप या देशातील काँग्रेसनेच केले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात तब्बल 80 वेळा या देशाच्या संविधानात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे हे पाप काँग्रेसनेच केल्याचा आरोपही  नितीन गडकरींनी काँग्रेसवर केलाय. 


आणीबाणीच्या वेळेस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वात असे काही निर्णय झाले की या देशातील लोकशाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर निघाली होती. काँग्रेसला गेल्या साठ वर्षाच्या कार्यकाळात जो विकास करता आला नाही तो पंतप्रधानांच्या नेतृत्वात उण्यापुऱ्या दहा वर्षात या देशात झाला आहे. आम्ही या देशातील व्यक्तीची जात, धर्म, पंथ आणि वर्ण यापेक्षा त्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे. आज 'सबका साथ सबका विकास' या पंतप्रधानांच्या घोषणेने आपला देश पुढे मार्गक्रमण करत असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.


दहा वर्षात विदर्भाचा चेहरा मोहरा बदलला 


राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या राज्यासाठी झाले आहेत. सोबतच विदर्भात अनेक तीर्थक्षेत्र आणि व्याघ्र प्रकल्पांचा मोठा विकास झाला आहे. त्यामुळे मी आज विश्वास देऊ इच्छितो ज्यावेळी परिसरात पर्यटनाचा विकास होतो, त्यावेळी तेथे रोजगाराच्याही अनेक संधी उपलब्ध होत असतात.


देशातील अनेक योजना जात-पात न पाहता सबका साथ सबका विकास या हेतूने तळागाळातील नागरिकांचा विकास या सरकारने केला आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपण जलद गतीने सरसावले असून आज देशातील तिसरी महासत्ता होण्याच्या मार्गावर आपण जातो आहे. त्यामुळे विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा मोदींच्या मागे उभे राहण्याची वेळ आली असल्याचे आवाहनही गडकरींनी केले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या